Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलसहाय्यक घनश्याम

सहाय्यक घनश्याम

  • कथा: प्रा. देवबा पाटील
घनश्यामचे जांभळे खाणे बाजूलाच राहिले. त्या बाईच्या डोक्याला खोक पडून मोठी जखम झाली होती व त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते. घनश्यामने पटकन एक चिंधी फाडली व प्रथम तिची जखम बांधली.

डोंगरकुशीत वसलेले जामनगर नावाचे एक छोटेसे गाव होते. याच गावात घनश्याम नावाचा एक मुलगा त्याच्या आईसह राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने घनश्याम बालपणापासून मजुरीची सारी छोटी-मोठी कामे करीत आपल्या आईला घरखर्चासाठी हातभार लावीत असे.

घनश्यामच्या गावाजवळूनच तालुक्याच्या शहरांना जोडणारा मुख्य रस्ता जात होता. त्या रस्त्याचे खडीकरण होऊन बरीच वर्ष झालेले असल्याने आता त्यावरील खूपसे छोटे छोटे गिट्टीचे दगड उघडे पडलेले होते. मुख्य रस्ता असल्याने आजूबाजूच्या साऱ्या गावांतील वाहतूक त्याच रस्त्याने असायची. त्यामुळे त्या रस्त्याने नेहमीकरिता वाहनांची खूप वर्दळ असायची.

या रस्त्याच्या दुतर्फा निंब, बाभूळ, बोरं, चिंचा, जांभळं, गोंधण, शिसम, पिंपळ, वड वगैरे वेगवेगळ्या प्रकारची भरपूर झाडे होती. ते उन्हाळ्यातील शेवटचे व पावसाळ्याच्या आधीचे जांभळांचे दिवस होते. त्याला गावात त्याच्या एका मित्राकडून ह्या मुख्य रस्त्यावरील जांभळांच्या झाडांची जांभळे पिकल्याची बातमी कळाली. घनश्यामला ती मधुर, रसाळ, जांभळी जांभळी जांभळे खूप खूप आवडायची. ती जांभळे खायला जाण्याचा त्या दोघांनी एक दिवस बेत केला. पण ऐनवेळेवर त्या मित्राला दुसरेच महत्त्वाचे काम निघाल्याने त्या दिवशी एकटा घनश्यामच आपल्या जांभुळखाणे मोहिमेवर निघाला. घनश्याम आपला मस्तपैकी रमतगमत रस्त्याने चालला होता. रस्त्याने निरनिराळ्या वाहनांची भन्नाट ये-जा सुरू होती. तो जांभळांच्या झाडांजवळ पोहोचला. दुरूनच त्याला तेथे एक कृश बाई जांभळे पाडतांना दिसली. एका उंच बांबूला समोर ताराचा आकडा बांधलेला होता. त्याने ती पिकलेल्या जांभळांचे घोस बरोबर पकडायची व तोडायची नि खाली पाडायची. खाली पडलेली जांभळे वेचून बाजूला ठेवलेल्या आपल्या टोपलीत टाकायची.

ती आपली जांभळं पाडून वेचण्याच्या कामात गर्क होती. इतक्यात रस्त्याने एक कार भरधाव वेगाने जणू काही त्या ओबडधोबड रस्त्यावरून उड्या मारत, धुरळा उडवीत धावत आली. त्या कारच्या चाकाच्या टायरने रस्त्यावरील एक गिट्टीचा दगड जोराने उडाला आणि नेमका त्या जांभळे पाडणा­ऱ्या बाईच्या डोक्याला लागला. कार तर आपल्या वेगात निघून गेली, पण इकडे ‘वं माय वं’ म्हणत नि डोक्याला हात लावत ती बाई मटकन खालीच बसली.

ते बघून घनश्यामचे जांभळे खाणे बाजूलाच राहिले. तो त्या बाईकडे धावला. त्याने बघितले तर त्या बाईच्या डोक्याला खोक पडून मोठी जखम झाली होती व त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते. त्याने पटकन तिच्याच फाटक्या लुगड्याची एक चिंधी फाडली व प्रथम तिची जखम बांधली. त्याने तिला त्याच झाडाच्या सावलीत नीट निजविले व रस्त्याकडे बघू लागला. एवढ्यात त्याला रस्त्याने एक मेटॅडोर येताना दिसली. घनश्यामने तिला हात दिला. चालकाने गाडी थांबवली. घनश्यामने पटकन त्याला झालेली परिस्थिती समजावून सांगितली व आपल्या गावच्या दवाखान्यापर्यंत त्या बाईला गाडीत घेऊन चलण्याची विनंती केली.

चालक समजदार होता. त्याने गाडी थोडी बाजूला लावली व दोघांनी मिळून त्या बाईला उचलून गाडीत आणले. त्याने गाडी सुरू केली व सोनगावच्या सरकारी दवाखान्यासमोर आणून थांबवली. पुन्हा त्या बाईला गाडीतून काढले व उचलून दवाखान्यात भरती केले. घनश्यामने डॉक्टरांना घडलेली गोष्ट थोडक्यात सांगताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी ताबडतोब त्या बाईवर उपचार सुरू केले.
त्या बाईला गाडीतून काढून दवाखान्यात नेताना कुणीतरी पाहिल्याने घनश्यामने कोण्या तरी बाईला मेटॅडोरमधून दवाखान्यात आणले ही बातमी

वा­ऱ्यासारखी घनश्यामच्या घरी पोहोचली. काय झाले हे बघायला घनश्यामची आई ताबडतोब दवाखान्यात हजर झाली. जेव्हा तिला मेटॅडोरवाल्याकडून आपल्या मुलाची कर्तबगारी समजली तेव्हा तिला आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला. थोड्याच वेळात ती बाई शुद्धीवर आली. ती तर घनश्यामला देवच मानू लागली. ती शेजारच्या गावातीलच एक गरीब मजूर बाई होती. तिने सांगितल्यानुसार घनश्यामने तिच्या गावी तिच्या पतीला निरोप पाठविला. तिच्या घरची मंडळी येईपर्यंत घनश्याम व त्याची आई तिच्याजवळ दवाखान्यातच थांबले. तिचे पती आल्यानंतर घनश्याम व त्याची आई आपल्या घरी निघून आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -