रॉयल्सच्या फलंदाजीला रोखण्याचे टायटन्ससमोर आव्हान
- ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- वेळ : सायंकाळी ७.३० वा.
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला राजस्थान रॉयल्स आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी मुकाबला होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल्सना पहिल्या स्थानावरून खाली खेचण्यासाठी पंड्याचा टायटन्स संघ त्यांच्याशी दोन हात करेल.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ चांगलेच फॉर्मात आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना गमावला आहे. त्यामुळे सहा गुणांसह हे दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या तीन संघांमध्ये आहेत. यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन ही तिकडी राजस्थानसाठी विशेष कामगिरी करत आहे. शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल त्यांच्या मदतीला आहेत. ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन अशी वेगवान-फिरकी गोलंदाजीचे संतुलन संघात आहे.
दुसरीकडे गुजरातचा संघही चांगल्या लयीत आहे. शुभमन गिलने यंदाच्या हंगामात आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. रिंकू सिंहच्या तडाख्यामुळे कोलकाताविरुद्ध घशातला घास त्यांनी गमावला आहे. हा एकमेव सामना ते पराभूत झाले असून उर्वरित तिन्ही सामन्यांत त्यांनी सरशी मारली आहे. गोलंदाजीत राशिद खान, मोहम्मद शमी हे दोन हिरे त्यांच्या ताफ्यात असून ते अपेक्षित कामगिरी करत आहेत. त्यामुळे एक सामना वगळता गुजरातचा आतापर्यंतचा प्रवास मनाजोगता झाला आहे. राजस्थानची फलंदाजी तगडी मानली जात आहे. गुजरातच्या गोलंदाजीसमोर तेच प्रमुख आव्हान असेल. त्यात गुजरात यशस्वी झाला, तर निम्मी लढाई त्यांनी तिथेच जिंकलेली असेल.