- विशेष: डॉ. यशोधरा वराळे
‘युगयात्रा’ हे नाटक बाबासाहेब व माईसाहेबांना खूप आवडले. नाटकानंतर बाबासाहेबांचे व्याख्यान सुरू झाले. त्यावेळी बाबासाहेबांनी औरंगाबादमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयला “मिलिंद महाविद्यालय “ हे नाव दिले.
“फाटलेल्या आकाशाला ठिगळ
लावता येत नाही म्हणून
हताश न होता, निराश न होता
नवीन आकाश निर्माण करणाऱ्या
महामानवास कोटी कोटी प्रणाम.”
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित ठेवले गेले. यासाठी त्यांना नेहमी परिस्थितीशी झगडावे लागले, संघर्ष करावा लागला. यातूनच परिवर्तनाचा इतिहास घडला आणि आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणजेच ‘ज्ञानाचे प्रतीक’ म्हणून संबोधले जाते. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
कोणताही इतिहास घडण्यामागे अनेक कारणे असतात. त्यामध्ये संघर्ष, जिद्द, यातना, अन्याय अशा भावनांनी तो पेटून उठलेला असतो. माणूस म्हणून माणसांना जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या क्रांती केल्या, त्यातूनच इतिहास घडून आज आपल्याला सर्व सुखसोयी समृद्ध असे जीवनमान लाभले आहे. या त्यांच्या ऐतिहासिक क्रांतीमध्ये त्यांच्या मागे खंबीरपणे प्रत्येक कार्यात साथ देणारे बाबांचे अनेक निष्ठावंत व प्रामाणिक सहकारी होते. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा अंतिम आदेश समजून तो पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तनमनधनाने झटणारे माझे आजोबा कालकथित बळवंतराव हणमंतराव वराळे हेही होते. जवळजवळ ३४ वर्षे ते सतत बाबासाहेबांच्या सोबत राहून बाबासाहेबांच्या परिस स्पर्शाने आम्हा वराळे कुटुंबीयांचे आयुष्य हे चार पिढ्यांनी उजळून गेले. एखादा इतिहास पुन्हा पुन्हा घडला, तर ती इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणजेच तोच वारसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत असे पिढ्यानपिढ्या ते संक्रमित होते, याला ऐतिहासिक पुनरावृत्ती म्हणता येईल. आज जवळजवळ १२० वर्षे हा ऐतिहासिक वारसा दोन्ही कुटुंबीयांनी तोच स्नेह, विश्वास, प्रेम, माय, आपुलकीने जपला आहे आणि मी या कुटुंबातील एक सदस्य आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात आजोबांनी मोलाची साथ दिली. विशेषतः बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात आजोबांचा मोलाचा वाट आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच शिक्षण घेण्यासाठी झगडत. त्यांनी अनेक उच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यांना शिक्षणानेच स्वतःचा सर्वांगीण विकास होऊ शकतो व समाजाचाही विकास होऊ शकतो, हे ज्ञात झाले व शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे, हे ओळखून त्यांनी सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी ते झटले आणि त्यांनी शिक्षणाची द्वारे आपल्यासाठी खुली केली. यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये स्थापन केली. बाबासाहेबांच्या मते, ‘शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने शुद्ध होतात. शाळा म्हणजे देशाचा उत्तम नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.’ या शाळा, महाविद्यालयामध्येच शिक्षण घेऊन आज आपल्या समाजामध्ये अनेक लोक उच्चशिक्षित होऊन उच्चपदावर विराजमान आहेत. आज शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, क्रीडा, अंतराळ प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती आहे ती बाबासाहेबांचीच देण आहे. बाबासाहेब म्हणतात, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचे श्रेय फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच जाते. बाबासाहेबांनी आम्हाला पटवून दिले, ‘शिक्षणाने आपण सर्व काही साध्य करू शकतो. शिक्षणाने शहाणपण येते, सद्सद्विवेक बुद्धीने विचार करू शकतो, माणुसकी जपता येते.’
बाबासाहेब म्हणतात, ‘फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय.’ बाबासाहेबांनी सर्वप्रथम मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. बाबासाहेबांचा मिलिंद महाविद्यालयावर खास लोभ होता. ते नेहमी म्हणत असत. “मिलिंद इज माय पेट चाइल्ड,” मिलिंद हे माझे आवडते बाळ आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी, प्रगतीसाठी बाबासाहेबांनी खूपच परिश्रम घेतले होते. या कॉलेजचे नामकरण हे बाबासाहेबांनीच केले. यावेळचा प्रसंग…
असे झाले ‘मिलिंद’चे नामकरण
माझे काका कालकथित न्यायमूर्ती भालचंद्र बळवंतराव वराळे हे मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत होते. आम्ही त्यांना आण्णा म्हणत असे. त्यावेळी त्यांनी प्राचार्य चिटणीसांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बौद्ध धम्माचा, त्यांच्या वाङ्मयाचा, कलांचा, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ‘बोधी मंडळ’ नावाचे एक अभ्यास मंडळ स्थापन केले होते. प्राचार्य चिटणीस या मंडळाचे अध्यक्ष होते. ते आमच्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख. प्रा. आर. एस. गुप्ते हे कार्याध्यक्ष होते व आण्णा (न्या. भालचंद्र वराळे) हे कार्यवाह होते. या मंडळातर्फे आण्णा व्याख्यानांचे, चर्चेचे निबंध वाचण्याचे कार्यक्रम आयोजित करत असत. त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम औरंगाबादला महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यावरील एका प्रशस्थ हॉलमध्येच होता. महाविद्यालयाच्या मंडळातर्फे बाबासाहेबांनी भगवान बुद्धावर, बुद्ध धम्मावर एक व्याख्यान द्यावे अशी सर्वांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार आण्णा व प्राचार्य चिटणीस बाबासाहेबांना भेटले व त्यांना त्यांच्या बोधी मंडळातर्फे भ. बुद्धावर, त्यांच्या धम्मावर एक व्याख्यान द्यावे, अशी आग्रहाची विनंती केली. पण, बाबासाहेबांनी प्रकृती अस्वास्थाच्या कारणावरून नकार दिला. पण, काही दिवसांनी आण्णांनी पुन्हा त्यांना भेटून व्याख्यान देण्याची विनंती केली. त्यांनी पुन्हा नकार दिला. पण आण्णांनी चिकाटी सोडली नाही. काही दिवसांनी आण्णा त्यांना भेटले व काही वेळ तरी व्याख्यान द्यावे असे म्हटले. मग त्यांनी होकार दिला. मग आण्णांनी त्यांना कोणत्या दिवशी व कोणत्या वेळेला त्यांचे व्याख्यान आयोजित करू, असे विचारले. त्यावार ते म्हणाले, ते तुमच्या सोयीने ठरव. मग काकांनी त्यांचे व्याख्यान प्राचार्य चिटणीस व प्रा. गुप्ते यांच्याशी चर्चा करून एक दिवस ठरविला. ठरलेल्या दिवसाच्या आधी चार दिवस आण्णा बाबासाहेबांना भेटले, ते म्हणाले, ‘अरे अद्याप वेळ आहे, एवढी घाई कशासाठी करतोस?’ आण्णा म्हणाले, “ केवळ आपणास आठवण करून देण्यासाठी आलो आहे.’ मग व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आण्णा त्यांना भेटले, तेव्हा ते आण्णांवर चिडले, म्हणाले, “माझी प्रकृती बरी नाही, मी येऊ शकणार नाही. व्याख्यान देऊ शकणार नाही.” आण्णा खूप नाराज झाले, पण त्यांना म्हणाले, “ बाबा उद्या आपल्याला बरे वाटल्यावर व्याख्यान द्या.’’ आण्णांनी आग्रह धरला. नंतर बाबा व्याख्यान देण्यासाठी तयार झाले.
त्यावेळी प्राचार्य चिटणीस सरांनी लिहिलेलं “युगयात्रा’’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे सूत्रसंचालन डॉ. म. ना. वानखडे यांनी केले. त्यामध्ये प्रमुख भूमिका डॉ. शहारे, प्रभाकर (काका), इंदुमती (आत्या), निकाळजे, डोंबरे, माने असे अनेक कलाकार होते. आण्णांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते. हे नाटक १९५५ साली सर्वप्रथम मिलिंद महाविद्यालयात सादर करण्यात आले. हे नाटक बाबासाहेब व माईसाहेबांना खूप आवडले. नाटकानंतर बाबासाहेबांचे व्याख्यान सुरू झाले. त्यावेळी बाबासाहेबांनी औरंगाबादमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयला “मिलिंद महाविद्यालय “ हे नाव दिले. तेव्हा बाबासाहेबांनी एक कथा सांगितली, ते म्हणाले, “ प्राचीन काळी ग्रीस देशात मिलेंडर नावाचा ग्रीक राजा होता. तो केवळ राजाच नव्हता तर तो विद्वान व तत्त्वज्ञानीही होता. या मिलेंडरने पंडितांशी, धर्मवेत्यांशी, तत्त्वज्ञान्यांशी वादविवाद करण्याचे ठरविले व त्याने या वादविवादात अशी अट घातली की, जो कोणी त्याचा वादविवादामध्ये पराभव करील त्याचे तो शिष्यत्व पत्करेल. पण त्याने जर कोणाचा पराभव केला, तर त्या पराभूत व्यक्तीने त्यांचे शिष्यत्व स्वीकारावे. ही अट घालून तो जगभर वादविवाद करीत फिरला. त्या वादविवादामध्ये त्याने अनेक प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. मग तो वादविवाद करण्यासाठी हिंदुस्थानात आला. तेथे सुद्धा त्याने अनेक पंडितांचा, विद्वानांचा वादविवादामध्ये पराभव केला. मग त्याचे आव्हान स्वीकारण्यास कोणीच तयार होईना, काही बुद्धानुयायांना हे आव्हान नागसेन या विद्वान बौद्ध भिक्खूने स्वीकारावे असे वाटले. म्हणून त्यांनी नागसेनाला मिलेंडरबरोबर वादविवाद करण्यास विनंती केली. त्याने ती विनंती स्वीकारली व मिलेंडरबरोबर वादविवाद केला. तो बरेच दिवस चालला आणि शेवटी या वादात नागसेनाने मिलेंडरचा पराभव केला. ठरलेल्या अटीप्रमाणे मिलेंडरने नागसेनाचे शिष्यत्व पत्करले. नंतर त्याने बौद्ध धम्म स्वीकारला व मिलेंडरचे नाव बदलून ते “मिलिंद” असे झाले. “ही गोष्ट सांगून बाबा म्हणाले, या गोष्टीवरून मिलिंद व नागसेनामधला “बौद्धिक प्रामाणिकपणा” हा गुण दिसून येतो. याच गुणांना तुम्ही प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी महत्त्व दिले पाहिजे. ते पुढे म्हणाले, “ तुम्ही शिक्षकांनी नागसेनासारखे आदर्श गुरू व्हायला हवे व विद्यार्थ्यांनी राजा मिलिंदसारखे शिष्य व्हायला हवे. त्यांचा आदर्श तुमच्या नजरेसमोर सतत असावा म्हणून आजपासून मी या महाविद्यालयाचे नाव “मिलिंद महाविद्यालय” असे ठेवतो. व ज्या परिसरात हे महाविद्यालय वसले आहे त्या परिसराला “नागसेनवन” हे नांव देतो. एक उत्कृष्ट व्याख्यान ऐकण्याचा योग्य उपस्थितांना आला. व्याख्यान संपल्यावर बाबासाहेब आण्णांकडे वळून म्हणाले, “ काय रे, आता तरी तुझे समाधान झाले ना?” आण्णा अगदी देहभान हरपून गेले होते. त्यांच्या तोंडातून आनंदामुळे शब्द फुटेनात. आण्णा म्हणाले, “बाबा ज्या महाविद्यालयाचे आपण संस्थापक आहेत व ज्या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे त्या महाविद्यालयाचे नामकरण आपल्या भाषणाद्वारे व्हावे व तेही मी आयोजित केलेल्या सभेमध्ये व्हावे, यापेक्षा माझे भाग्य कोणते? माझ्या आयुष्यातला हा सुवर्णदिन आहे” त्या दिवसापर्यंत आमचे महाविद्यालय पी.ई.एस कॉलेज म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीज महाविद्यालय म्हणून ओळखले जात होते. पण, त्या दिवसापासून ते “मिलिंद महाविद्यालय” म्हणून प्रसिद्ध झाले व महाविद्यालयचा परिसर नागसेनवन म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला.
(लेखिका डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा येथे प्रभारी प्राचार्य आहेत.)