Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआदिमायेचा अवतार - भगवतीदेवी

आदिमायेचा अवतार – भगवतीदेवी

  • कोकणी बाणा सतीश पाटणकर
दागिने मागणाऱ्याने मंगलकार्यानंतर दागिने परडीत भरून देवीला परत द्यायचे असत. कालांतराने एका ग्रामस्थाने देवीचे दागिने परत केले नाहीत. तेव्हापासून ही प्रथा बंद झाल्याची आख्यायिका आहे.

कोकण हे देवभूमी म्हणून मान्यता पावले आहे. त्याची निर्मिती भगवान परशुरामांनी केली अशी लोकांची दृढ धारणा आहे. तेथे पावलोपावली विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी अनेक देवदेवतांची मंदिरे पाहण्यास मिळतात. ती तेथील श्रद्धा व संस्कृती यांचे प्रतीक आहे.

प्रत्येक गावात ग्रामदैवत असणे हा तेथील भाविकतेचा स्थायीभाव असून, परमेश्वरी शक्तीची विविध रूपात भक्तिभावाने व श्रद्धेने जोपासना केली जाते. आजही तेथे अस्तित्वात असणाऱ्या गावरहाटीच्या अधीन राहूनच सर्व धार्मिक सण, उत्सव व व्रतवैकल्ये साजरे करण्याची परंपरा पाळली जाते. ती मंदिरे माणसांना परस्परांशी जोडण्याचे काम नकळत करत असतात. मंदिर विश्वस्त मंडळ, बारा पाचाचे मानकरी, पुजारी, सेवेकरी व अन्य निशानदार ही माणसे कार्यरत असतात. धामापूर गावास आध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे. तेथील भगवती देवी हे जागृत देवस्थान आहे. आदिमायेचा अवतार व स्थानिकांच्या अढळ श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ती भगवतीदेवी!
कोकणातील धामापूर एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरुवातीला आपल्याला दिसते ते येथील भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर भगवती देवीचे दर्शन घडते. १६ व्या शतकात

इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले. जवळच बत्तीस पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला. १९५२ साली तलावावर कायमस्वरूपी बंधारा बांधला आहे. सुमारे ४७५ वर्षांहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या देवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे.

गावातील ग्रामस्थ व बंधाऱ्याचे रक्षण ही देवीच करते, अशी भावना आहे. धरणामागील तलाव हे राज्यातील सिंधुदुर्ग सर्वात मोठे तलाव आहे. सरोवरात वर्षभर पाणी येते आणि ते वर्षभर भरलेले असते. सर्वात कमी पायऱ्यांच्या वर असलेल्या धरणाची उंची ११ मीटर (३६ फूट) आहे, तर लांबी २७१ मीटर (८८९ फूट) आहे. मातीच्या काठाने दरी बांधून तयार केलेले, धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असली तरी, त्यात वर्षभर पाणी असते आणि गाळ वाहून जाण्याची प्रवृत्ती दिसून येत नाही. ते सुमारे ५०० एकर क्षेत्राला पाणी देते, त्यापैकी चाळीस बागा आणि उर्वरित भाताची जमीन आहेत. मालवण येथील म्हापण, धामापूर आणि पेंडूर जंगल हे कान्होजी आंग्रे यांनी १६८० च्या सुमारास पेरले होते आणि त्यांच्या सर्व प्रदेशात त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी वनसंवर्धनाची कडक अंमलबजावणी केली. हा अहवाल धामापूर तलावासारख्या लेंटिक इकोसिस्टमला प्लँक्टन्सची समृद्ध जैवविविधता दर्शवतो. जलीय परिसंस्थेचे अन्न जाळे तयार करण्यात सूक्ष्म विविधता असलेल्या प्लँक्टन्सची महत्त्वाची भूमिका असते. झूप्लँक्टनच्या तुलनेत, धामापूर तलावामध्ये फायटोप्लाँक्टनचे प्रमाण अधिक आहे.

पूर्वेकडे काळसे गावचे सुमारे ४० हेक्टरचे जंगल व पश्चिमेकडे धामापूरचे ५७.४७ हेक्टरचे जंगल या दोन्ही जंगलांनी वेढलेल्या निसर्गरम्य भागात ३६ हेक्टरपर्यंत पसरलेला धामापूरचा विस्तृत तलाव आहे. या तलावाला १६ व्या शतकात बांधकामाच्या वेळी मोठा बांध बांधून त्यावर देवीच्या मंदिरामध्ये भगवतीची पाषाणात कोरलेली सुमारे चार फूट उंचीची सुबक मूर्ती आहे. पुराणात महिषासूरमर्दिनीचे जे वर्णन करण्यात आले आहे, ते वर्णन तंतोतंत येथील मूर्तीला लागू पडते. देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत. तर दुसऱ्या हातात शक्तीची आयुधे आहेत. यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पाहावयास मिळतो. भगवतीची मूर्ती चतुर्भूज असून विविध आभुषणांनी युक्त आहे. देवी भगवतीचे मंदिर कौलारू असले तरीही मूळ गाभारा दगडी आहे.

हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. शके १८२७ ला सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची नोंद सापडते. प्राचीन काळी लग्नकार्यादी मंगल प्रसंगी कोणास दागिन्यांची जरूरी लागल्यास भगवती देवी त्यास दागिने पुरवित असे. दागिने मागण्याचा विधी असा असे की, ते दागिने मागणाऱ्यास एका परडीत फुले व दागिन्यांची यादी ठेवून ती परडी तलावात सोडावी लागे. परडी तलावात सोडल्यानंतर ती परडी पाण्यात जात असे व दुसऱ्या दिवशी ती परडी दागिन्यांसह भरून तलावाच्या काठावर येत असे. दागिने मागणाऱ्याने मंगलकार्य झाल्यानंतर सर्वच्या सर्व दागिने परडीत भरून परत तलावात देवीला परत द्यायचे असत. ही प्रथा अशीच चालू असताना कालांतराने गावातील एका ग्रामस्थाने देवीचे दागिने परत केले नाही. तेव्हापासून ही प्रथा बंद झाल्याची आख्यायिका आहे.

आंध्र प्रदेशमधल्या तीन साइट्स आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाला प्रथमच हेरिटेज इरिगेशन साईट्सचा हा जागतिक सन्मान मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीची झाडे आहेत.

 

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -