-
संवाद: गुरुनाथ तेंडुलकर
औषध उपचारांनी आजार बरा होण्यासारखा नव्हता. शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. पण खर्च मुलाच्या वडिलांना झेपण्यासारखा नव्हता.
तुम्ही ही कथा कदाचित वाचलेली, ऐकलेली असेल. तरीही सांगतो… संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास दोन संन्यासी एका गावाहून आपल्या मठात जाण्यासाठी निघाले होते. गावातून मठात जाण्याच्या वाटेवर एक लहानशी नदी होती. हे दोघंजण जेव्हा नदीकिनारी आले तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता. अंधारून यायला सुरुवात झाली होती. किनाऱ्यावरच्या माणसांकडे चौकशी केल्यानंतर समजलं की, शेवटची होडी निघून गेलीय. आता काय करायचं?
‘चला पोहत जाऊया.’ दोन्ही संन्यासी एकदम म्हणाले.
ते दोघं पोहून जाण्यासाठी नदीत उडी मारणार तेवढ्यात एक तरुण स्त्री आरडाओरडा करीत त्यांच्या दिशेनं धावत येताना दिसली. नदीत उडी मारण्याच्या तयारीत असलेले ते दोघे संन्यासी एकदम थांबले. ती बाई त्यांच्याजवळ आली. हात जोडून, धापा टाकीत म्हणाली,
‘कृपया मला पलीकडे घेऊन चला. मी या गावात आजारी आईला भेटण्यासाठी माहेरी आले होते.
आईबरोबर बोलण्यात मला वेळेचं भान उरलं नाही. पण मला पलीकडे, माझ्या घरी जायलाच हवं. माझा लहान मुलगा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल. कृपा करा आणि मला पैलतीरी घेऊन चला. मला नीट पोहता येत नाहीये. मला मदत करा.’
‘ठीक आहे. तू माझ्या पाठीला मिठी मारून बस. मी पोहत पोहत पलीकडे जाणारच आहे.’ त्या दोन संन्याशांपैकी तरुण संन्यासी म्हणाला.
दुसऱ्याला मात्र ही कल्पना तेवढीशी पसंत पडली नाही. त्याने नाराजीने त्या तरुण संन्याशाकडे पाहिलं, पण त्या तरुण संन्याशानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या बाईला म्हणाला, ‘हं चला. मारा माझ्या पाठीला मिठी.
त्या बाईनं त्या संन्याशाच्या पाठीला मिठी मारली. गळ्यात हात टाकले आणि त्याला बिलगली. संन्याशाने पाण्यात उडी मारली आणि पोहोत पोहत पलीकडे पोहोचला. त्या बाईला किनाऱ्यावर सोडली. संन्याशाला नमस्कार करून, धन्यवाद देऊन ती बाई तिच्या घरी निघून गेली. किनाऱ्यावरून चालत चालत दोघे संन्याशी मठात गेले. रात्र झाली. नेहमीचं आन्हिकं आटोपून दोघंजण झोपले. मध्यरात्रीनंतर त्या तरुण संन्याशाला जाग आली. कुणीतरी आपल्याला हलवून जागं करतोय हे त्याच्या ध्यानात आलं. जागा होऊन त्यानं पाहिलं तर दुसरा संन्याशी त्याला हलवून जागा करीत होता.
“काय रे? काय झालं?’ तरुण संन्याशाने विचारलं.
‘तू केलंस ते योग्य नाही केलंस.’ त्या प्रौढ संन्याशाच्या नाकपुड्या रागानं थरथरत होत्या. “काय योग्य नाही केलं?’ तरुण संन्याशानं अबोधपणे विचारलं.
‘हे वर मलाच विचारतोयस? अरे आपण संन्याशी. ब्रह्मचारी. स्त्रीची सावली देखील आपल्या अंगावर पडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी आणि तू त्या बाईला खुशाल पाठीवरून घेऊन नदी
पार केलीस?’
‘कोण बाई? कोणती नदी?’
‘वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. आज संध्याकाळी ज्या बाईला तू पाठीवर घेऊन नदी पार केली तिच्याबद्दल बोलतोय मी.’ संन्याशी संतापानं म्हणाला.
“हं हं ती बाई होय. अरे मी तर त्या बाईला किनाऱ्यावर सोडून दिली. पण तू तर तिला तुझ्या मनातून उचलून इथवर आणलीस. झोपेतही ती तुझ्या बरोबर आहेच की.’ तरुण संन्याशी मिश्किलीनं म्हणाला आणि डोक्यावरून पांघरूण घेऊन पुन्हा गाढ झोपला.
दोन संन्याशांची ही कथा मी एका पुस्तकात वाचली. तुम्हीही ही कथा वाचली असेल. तुम्हालाही त्या तरुण संन्याशाचं कौतुक वाटलं असेल. अडचणीत असलेल्या त्या तरुण स्त्रीला ज्याने पाठीवरून पैलतीरावर पोहोचवली तो खरा संन्यासी असं तुम्हीही म्हणाल. पण ही कथा केवळ त्या दोन संन्याशांपुरती मर्यादित नाहीये. त्या दोन संन्याशांच्या इतकंच किंबहुना काकणभर सरस असं आणखी एक महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे ती स्त्री.
ज्या तरुण संन्याशाने आपलं ब्रह्मचर्यव्रत क्षणभर बाजूला ठेवून त्या तरुण स्त्रीला पाठीवर घेतली त्या संन्याशापेक्षाही मला ती स्त्री अधिक धैर्यवान वाटते. नीट विचार करा. ती स्त्री संन्याशाच्या पाठीवरून नदी ओलांडून पलीकडे गेली. तिला आपला पतिव्रता धर्म वगैरे काहीही आड आला नाही. तिचं माहेर नदीच्या एका बाजूला होतं. तिथल्या लोकांनी तिला पाहिलं होतं. नदीच्या पलीकडच्या बाजूला तिचं सासर होतं. तिथल्या कुणी पाहिलं तर… नवऱ्याला, सासू सासऱ्यांना सांगितलं तर, पाहिलं तर पाहिलं. सांगितलं तर सांगितलं.
त्या बाईने ‘लोक काय म्हणतील?’ याची पर्वा केली नाही.
पलीकडे जाणं तिला आवश्यक होतं. रात्र होण्याआधी घरी पोहोचणं ही तिची गरज होती. ती गरज भागविण्यासाठी तिनं त्या संन्याशाची मदत घेतली. तरुण संन्याशाने त्या स्त्रीला स्पर्श करताना जसा विचार केला नाही तसाच विचार त्या स्त्रीनंदेखील अपरिचित तरुण संन्याशाला स्पर्श करताना विचार केला नाही. तसा विचार केला असता तर ती पलीकडे पोहोचू शकलीच नसती.
आपलं कार्य साधून घेताना प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पना तिनं आड येऊ दिल्या नाहीत. म्हणून मला त्या स्त्रीच्या धाडसाचं कौतुक करावसं वाटतं. आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आढळेल की माणसं इतरांकडून मदत घेताना फार संकोच करतात. मदत देताना पुढे सरसावणारी अनेक माणसं मदत घेताना मात्र मागे राहतात म्हणून त्यांची कामं अडतात.
वास्तविक या समाजात अनेक चांगली माणसं आहेत. चांगल्या कामासाठी मदत करणाऱ्या धर्मदाय संस्था आहेत. चांगले धनिक लोक आहेत. पण, पण आपणच संकोच करतो. ‘कसं मागायचं?’ म्हणून मागे राहातो आणि वेळेवर मदत न मिळाल्यामुळे अनेकदा संधी आपल्या हातातून निसटून जाते.
दहा वर्षांपूर्वी घडलेली एक सत्य घटना सांगतो.
मी काम करत असलेल्या एच.डी.एफ.सी. कंपनीतल्या एका साहेबांच्या ड्रायव्हरच्या मुलाची तब्यत बरी नसायची. मुंबईच्या दोन-तीन डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या केल्या. अखेरीस केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन काही चाचण्या केल्या त्यावेळी त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदान झालं. केवळ औषध उपचारांनी हा आजार बरा होण्यासारखा नव्हता. त्यासाठी शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. शस्त्राक्रियेसाठी लागणारा खर्च त्या मुलाच्या वडिलांना झेपण्यासारखा नव्हता.
एक प्रयत्न करावा म्हणून मी स्वतः केईएम रुग्णालयाच्या कार्डियाक विभागाचे प्रमुख डॉक्टर द्वारकानाथ कुलकर्णी यांना भेटलो. त्यांना पेशंटच्या घरची सर्व परिस्थिती समजावून सांगितली. एवढा खर्च पेशंटच्या वडिलांना पेलवणार नाही हे सांगितलं आणि डॉक्टर कुलकर्णींनी ताबडतोब केईएम हॉस्पिटलच्या सोशल वर्करना फोन केला. तिथल्या राजेश कांबळेसाहेबांनी सहा-आठ चॅरिटेबल ट्रस्टना ‘या पेशंटला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.’ अशा अर्थाची पत्रे दिली. त्यानंतर आम्ही त्या सर्व ट्रस्टच्या माणसांना जाऊन भेटलो. त्यांना हव्या त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि… आणि आठपैकी पाच सेवाभावी संस्थांनी त्या पेशंटच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत देऊ केली.
जर… जर आम्ही डॉक्टर द्वारकानाथ कुलकर्णीकडे मदतीसाठी तोंडच उघडलं नसतं तर… म्हणूनच तर म्हणतात ना, मदत मागा. मदत मिळेल…!