
हैदराबाद: सीबीआयने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (CM Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली आहे. माजी खासदार विवेकानंद रेड्डी हत्या प्रकरणातील ही ४८ तासांत सीबीआयने केलेली दुसरी अटक आहे. याआधी तपास यंत्रणेने कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचा जवळचा सहकारी गज्जला उदय कुमार याला अटक केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी म्हणजेच १५ मार्च २०१९ रोजी रात्री विवेकानंद रेड्डी यांच्या पुलिवेंदुला येथील निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ते घरात एकटेच होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात होता, परंतु जुलै २०२० मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
वायएस भास्कर रेड्डी यांच्याविरुद्ध पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी कडप्पा लोकसभेतून विद्यमान अविनाश रेड्डी यांच्याऐवजी स्वत:साठी किंवा वायएस शर्मिला (मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण) किंवा वायएस विजयम्मा (जगन मोहन रेड्डी यांची आई) यांच्यासाठी संसदीय निवडणुकीचे तिकीट मागत होते.