- ओंजळ: पल्लवी अष्टेकर
दोन कॅफे सध्या आग्रा व लखनऊ या शहरात चालविले जात आहेत. या कॅफेमध्ये काम करण्यापूर्वी या स्त्रियांचे आयुष्य ॲसिड हल्ल्यामुळे एकलकोंडे व दुःखी होते.
लहानपणी माझ्या आईसोबत सांगलीच्या बाजारात मी फिरायचे. हिरव्यागार ताज्या भाज्या, फळे तिथे मुबलक असायची. बाजाराच्या मध्यभागी एक सुंदर मारुतीचे देऊळ होते. भाजी मंडईतल्या बायका, त्यांची लगबग, संसारासाठी चार पैसे मिळवण्याची धडपड यातून खूप शिकायला मिळायचे. संक्रांतीच्या काळात बोरे, रेवड्या, शेंगदाण्याची चिक्की यांचा ढीग असायचा. काही बायका तिळगुळाचे दागिने करून विकायच्या. मुख्य बाजारात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची दुकाने होती. या दुकानात लोकांची झुंबड उडायची.
तेव्हा मी कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला या शाळेत शिकत होते. आमच्या गणिताच्या देशपांडे बाई फारच हौशी होत्या. दरवर्षी डिसेंबरच्या आसपास शाळेत स्नेहसंमेलन व्हायचे. आम्हा मुलींचा त्यात उत्साहाने सहभाग असायचा. आम्हा पोरींना त्या काळात दागिन्यांची फार ओढ होती. मोत्यांचे दागिने, काचेच्या बांगड्या, बिंदी, मॅचिंग कर्णफुले म्हणजे आमची चैनी असायची. एकदा मी सातवीत असताना शाळेत घागरींचा नाच बसविला होता. त्यासाठी सुंदर, लांबसडक केसांच्या मुली निवडण्यात आल्या. माझे केस काही वेणी घालण्याएवढे लांब नव्हते. पण नाचात भाग घ्यायची हौस दांडगी. मी देशपांडेबाईंना माझी इच्छा बोलून दाखवली. बाईंनी हो-नाही करत मला नाचात, तर सहभागी करून घेतले, पण एका अटीवर! नाचाच्या आधी दोन-तीन दिवस बाईंनी मला बाजारातून गंगावण आणायला सांगितले. मी माझ्या मैत्रिणीसोबत जाऊन बाजारात गंगावण शोधले. पण ते तेव्हा कुठल्याच दुकानात मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी देशपांडे बाईंच्या तासाला आमची नाचाची प्रॅक्टिस सुरू करण्याआधी मी बाईंना म्हटले, मला गंगावण मिळाले नाही. तशा त्या म्हणाल्या, “मग राहू दे मी दुसऱ्या मुलीला
नाचात घेते.”
तेव्हा मला रडू फुटले व मी बाकावर जाऊन रडत बसले. बाईदेखील थोड्या अंतर्मुख झाल्या. नाचाची प्रॅक्टिस संपल्यावर त्यांनी मला जवळ बोलावले. मायेने थोपटत त्या मला म्हणाल्या, “बाळा, बाह्य-सौंदर्य हे तात्पुरते असते. या पंधरा-वीस दिवसांत आपले स्नेहसंमेलन संपूनही जाईल. पण तुला आयुष्यात उपयोगी पडतील असे दागिने सांगते. सहनशीलता, दया, क्षमा, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता. त्यामुळे लहान-सहान गोष्टींनी मन खट्टू करून घेऊ नकोस. कदाचित मोठी झाल्यावर तुला माझ्या या वाक्यांचे महत्त्व कळेल.” तेव्हा आम्हा मुलींना वाटायला लागले की, दागिने घातले किच आपण सुंदर दिसतो, असे नाही. खरंच अजूनही हा प्रसंग माझ्या मनावर ठसला आहे.
एकदा रस्त्यावरून फिरता-फिरता मला एक काका-काकू दिसले. हे जोडपे वारंवार दिसू लागले, तसे मी स्मितहास्य देऊ लागले. काकूंना कोड होते. काका नेहमीसारखेच. आमच्या जुजबी गप्पा होऊ लागल्या. काकूंनी मला घरी येण्याचे निमंत्रण दिले. एके दिवशी ठरवून मी त्यांच्या घरी गेले. मध्यमवर्गीय घरात असते तसे वातावरण. काकूंनी माझ्यासमोर गरमागरम बटाटे वडे व खोबऱ्याची चटणी आणली. त्यांच्या अगत्याने मी भारावून गेले. मला काकूंशी-काकांशी खूप काही बोलायचे होते, ते जणू त्यांनी ओळखले. “अगं, इतरांना पडला तसाच प्रश्न तुला पडला असेल ना? आमची जोडी अशी कशी?” काकांनीही मंद स्मित केले.
काकू सांगू लागल्या, “माझे मिस्टर देवमाणूस. जे सर्वसामान्य माणसांना जमणार नाही ते यांनी करून दाखविले. माझ्या कोडामुळे मी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या शिक्षणानंतर मी एका वाचनालयात नोकरी करत असताना तुझ्या काकांशी माझी ओळख झाली. आमचा प्रेमविवाह आहे. माझ्या सासरच्या माणसांचा या विवाहाला खूप विरोध होता. पण हे डगमगले नाहीत. नंतर सर्वांचा विरोध मावळला. आम्हाला एक मुलगी आहे. ती एम. ए. करतेय. वीणा तिचे नाव!”
वीणा ही माझ्यासोबत येऊन गप्पा करू लागली. “बाबांच्या दृष्टीने बाह्य सौंदर्याला फार महत्त्व नाही. आईचा लाघवी स्वभाव, बुद्धिमानीपणा त्यांनी पाहिला व धाडसाने हा निर्णय घेतला. सुखाने संसार कसा करावा याचा आई-बाबा आदर्श आहेत.” वीणा म्हणाली. खरोखरंच या जोडप्याचे मला खूप कौतुक वाटते. स्वतःच्या मताशी ठाम मितभाषी काका, बोलक्या काकू व वीणा हे एक वेगळच कुटुंब मला पाहायला मिळालं.
‘शिरोज हँगआऊट’ नावाचा एक कॅफे चाणव फाऊंडेशन या संस्थेमार्फत चालविला जातो. मुख्य म्हणजे ज्या तरुणींवर ॲसिड हल्ला होऊन त्या या प्राणघातक हल्ल्यातून वाचल्या आहेत त्यांच्यामार्फत. आग्रा येथील एक हॉटेल या तरुणींसाठी २०१४ मध्ये अलोक दीक्षित या व्यक्तीने उघडले आहे. असे दोन कॅफे सध्या आग्रा व लखनऊ या शहरात चालविले जातात. या कॅफेमध्ये काम करण्यापूर्वी या स्त्रियांचे आयुष्य ॲसिड हल्ल्यामुळे एकलकोंडे व दुःखी होते. अभ्यासपूर्ण सर्वेक्षणातून असे लक्षात आले की, या तरुणींवर त्यांच्या परिचितांमार्फत हे हल्ले झाले. याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक संबंधावर झाला आहे. काही तरुणींना चेहऱ्यावरील विद्रुपतेमुळे असंख्य सर्जरीजना सामोरे जावे लागले.
कधी-कधी घरातील मंडळी, तर कधी सामाजिक दबावामुळे शांत राहाणे त्यांना भाग पडले आहे. या सर्व कारणांसाठी शिरोज हँगआऊट या स्त्रियांना त्यांचे सामाजिक स्थान मिळवून देते. शिवाय आत्मसन्मानाने जगण्यासाठी उपजीविकेचे साधनही! आग्रा येथील रेस्टॉरंटमध्ये २०१९ पर्यंत नऊ स्त्रिया, तर लखनऊ येथील रेस्टॉरंटमध्ये बारा स्त्रिया काम करत होत्या. सामाजिक परिवर्तनाची ही पायरी त्यामुळे नक्कीच महत्त्वपूर्ण ठरते. आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी ताजमहाल पाहण्याची इच्छा असते, त्या बरोबरीने या रेस्टॉरंटला जरूर भेट द्या. मला देखील आयुष्यात एकदा तरी तिथे जाण्याची इच्छा आहे. तुमच्यातील चांगले आंतरिक गुणच तुम्हाला आयुष्यात उभे राहण्यास मदत करतात यात शंका नाही.