बंगळूरु-दिल्लीत आज लढत
- ठिकाण : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु
- वेळ : दुपारी ३.३० वाजता
बंगळूरु (वृत्तसंस्था) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ शनिवारी आमनेसामने आहेत. यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सलग दोन, तर दिल्ली कॅपिटल्सने सर्व चारही सामन्यांत पराभवाची चव चाखली आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ पराभवांचा सिलसिला संपवून पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे पराभवांची कोंडी फोडून विजयी मार्गावर पुनरागमन करण्यासाठी बंगळूरु मैदानात उतरेल.
कॅपिटल्स यंदाच्या हंगामात खराब पॅचमधून जात आहेत, कारण एकही सामना न जिंकल्यामुळे ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे चारही लीग सामने गमावले आहेत. दिल्लीच्या संघाला त्यांच्या फलंदाजी युनिटने निराश केले आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर धावांमध्ये सातत्य राखत आहे; परंतु त्यात योग्य स्ट्राइक रेट राखण्यात तो अपयशी ठरला आहे. तसेच दिल्लीचे इतर फलंदाजही सातत्य राखण्यासाठी धडपडत आहेत.
दुसरीकडे कॅपिटल्सप्रमाणेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुलाही आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. तीन साखळी सामन्यांतून दोन पराभवांसह, संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. बंगळूरुने त्यांच्या शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावा दिल्या. त्याचा फटका संघाला बसला.
बंगळूरुने मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र संघ अपेक्षेप्रमाणे खेळण्यात अपयशी ठरला आणि पुढील दोन सामने कोलकाताविरुद्ध ८१ धावांनी आणि लखनऊविरुद्ध एका विकेटने पराभूत झाले.
हेड तो हेड रेकॉर्ड पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे पारडे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जड आहे. दोन्ही संघ एकूण २९ वेळा आमने-सामने आले असून त्यात बंगळूरु १८ सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे, तर कॅपिटल्सने १० सामने जिंकले व उरलेल्या एका सामन्यात हवामानामुळे कोणताही निकाल लागला नाही. गेल्या वर्षी लीगमध्ये दोन्ही संघ फक्त एकदाच एकमेकांशी भिडले होते. ज्यात आरसीबीने १६ धावांनी विजय मिळवला होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसचा आतापर्यंतचा हंगाम चांगला राहिला आहे. तीन सामन्यांत ८७.५० च्या सरासरीने १७५ धावांसह तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा आणि एकूण पाचवा सर्वोच्च धावा करणारा खेळाडू आहे. मागील सामन्यात त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ७९ धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेलही फॉर्मात आहेत. त्यामुळे दिल्लीसमोरील आव्हान सोपे नसेल.
दिल्ली कॅपिटल्सला चार पराभवांचा सामना करावा लागला असला, तरी त्यांचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करत आहे. वॉर्नरने चार सामन्यांत ५२.२५ च्या सरासरीने एकूण २०९ धावा केल्या आहेत. त्याला टूर्नामेंटमध्ये फक्त एकच गोष्ट सुधारणे आवश्यक आहे ती म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट.
शनिवारच्या सामन्यासाठी बंगळूरुला फेव्हरिट मानले जात आहे. कारण, दोन्ही संघांची तुलना केल्यास, बंगळूरुची बाजू दिल्लीच्या तुलनेत अधिक भक्कम दिसत आहे. शिवाय यंदाच्या हंगामात त्यांचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने सलग चार सामने गमावले असून त्यांना एकत्र येऊन सर्वच स्तरावर आपला खेळ सुधारावा लागणार आहे.