-
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
अभय कुलकर्णीने अनेक जाहिराती, मालिका, चित्रपटामध्ये अभिनयाची मुशाफिरी केली आहे. त्याच्या फिल्मी करिअरमध्ये, जीवनामध्ये अनेक टर्निंग पॉइंट आलेले आहेत. आपल्या टर्निंग पॉइंट विषयी अभय म्हणाला, ‘मला १९९१ साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एन.एस.डी. दिल्लीमध्ये प्रवेश मिळाला, हा माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरला. एन.एस.डी. ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. तेथे आशिया खंडातून लोक आलेले असतात, अनेकांची संस्कृती पाहायला मिळते. आपल्याला आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करावे लागते, त्यातून आपल्याला कळते की, आपल्याला अभिनयाची किती जाणं आहे, अभिनय कलेबद्दल किती माहिती आहे. आपण इतरांकडून बरेच काही शिकतो, आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून येतो.
दुसरा माझा टर्निंग पॉइंट होता तो म्हणजे मला मिळालेला पहिला मराठी चित्रपट. दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा चित्रपट, ‘लाहा’, ‘लाहा’ ही शॉर्ट फिल्म होती. लाहा म्हणजे एकत्र येऊन बनवूया. लाहा ही सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा आंदोलनावर आधारित होती. ३१ मे १९९४ रोजी आम्ही शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी नर्मदेच्या खोऱ्यात गेलो.
९ जूनच्या आत आम्हाला ती फिल्म पूर्ण करायची होती. कारण तेव्हा पाऊस येणार होता. स्क्रिप्ट तयार नव्हती. माझं ‘भुऱ्या’ नावाची व्यक्तिरेखा होती, त्याचं जीवन त्यात दाखविण्यात येणार होतं. तेथे मला आदिवासींचं जीवन जवळून पाहायला मिळाले. ते आत्मनिर्भर झालेले आहेत, फक्त मीठ ते बाहेरून आणत होते. कारण नर्मदेच्या खोऱ्यात मीठ तयार होत नाही. बाकी तेलापासून सर्व इतर खाद्य पदार्थ तेथे बनविले जात. त्यांच्यामध्ये एकोपा आहे. त्यांच्यामध्ये बारटल व्यवस्था होती. बारटल व्यवस्था म्हणजे तू मला गहू दे, मी तुला तांदूळ देतो, अशा प्रकारच्या खाण्याच्या वस्तूंची देवाण-घेवाण. त्यांच्या एकोप्यामध्ये धर्म, जात येत नाही. माणुसकी महत्त्वाची. व्यवहाराला तेथे पैसा नव्हता, त्यामुळे तेथे श्रीमंत व गरीब हा भेदभाव नव्हता. सारे एकमेकांच्या मदतीला धावून येत होते. तेथे आम्ही अन्न खाल्ले, अन्न म्हणजे काय, तर मक्याचा घाटा. मक्याचा घाटा म्हणजे भरडलेले मक्याच्या कणसांचे दाणे घेऊन त्यात मीठ घालून पाणी ओतायचे व शिजवायचे. त्यानंतर खायचे. बाजरीची भाकरी घेऊन त्यावर मिरचीची भुकटी घ्यायची व तीच खायची. तिथे वीज नव्हती. जीपीएसमुळे आपण स्मरणशक्ती वापरत नाही.
शहरामध्ये आपण विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. तेथे आम्हाला हापेश्वर नावाचं गाव दिसलं, त्या गावांमध्ये आम्हाला पांडवांच्या काळातल एक शंकराचे मंदिर आढळले. नर्मदा नदीला आपण देव मानतो, तिची परिक्रमा करतो; परंतु त्याच नर्मदेवर जगणाऱ्या लोकांना विस्थापित करून बाहेर टाकले जाते, केवळ राजकारणामुळे हे मला तिथे पाहायला मिळाले. जंगल पुरामध्ये वाहून जातात, त्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. सगळी जमीन भकास झालेली आहे. झाडेच नसल्यामुळे माती धरून ठेवली जात नाही. पर्यावरणावर याचा विपरित परिणाम होतोय. आपण शहरी आहोत याचा अभिमान बाळगायचा की लाज वाटावी? शहरीकरणामुळे जग जवळ आलेल आहे; परंतु माणसांचा माणसाशी असलेला संपर्क तुटलेला आहे. आपण व्हॉट्सॲपवरून लग्नपत्रिका, एखाद्याच्या मृत्यूबद्दल बातमी पाठवतो. आपल्याकडे वेळ आहे कुठे?
त्यानंतर दिग्दर्शिका सुमित्रा भावे सोबत दुसरा चित्रपट मी केला, त्याचं नाव होतं ‘सहअध्यायन’ यामध्ये आंधळ्या मुलाची गोष्ट होती. ती भूमिका करणारा मुलगा खरोखरच आंधळा होता. साताऱ्यात कोरेगाव येथे आम्ही या चित्रपटाचे शूटिंग केले होते. तो अंध मुलांच्या शाळेत शिकत नव्हता, नॉर्मल मुलांच्या शाळेत शिकत होता. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. नॉर्मल कोण, अॅबनॉर्मल कोण? हे ओळखणे फार कठीण झालेले आहे. आपल्याला डोळे असून जर कळत नसेल, तर आपण आंधळेच आहोत, नाही का?
नाशिकमधील, ‘माई लेले श्रवण केंद्र’ यांच्यासाठी, ‘डॉ. बाळ रडत नाही’ ही शॉर्ट फिल्म केली. त्यामध्ये मूकबधीर (दिव्यांग) मुलासोबत काम करण्याची संधी मिळाली. दिव्यांग व्यक्तीमध्ये सिक्स सेन्स खूप पॉवरफुल असते. त्याच्या सहाय्याने ते जीवनात यशस्वी होतात. लेखक जयंत पवार यांच्या कथेवरून समीर पाटील दिग्दर्शित ‘भाऊ-बहीण’ हा चित्रपट केला. त्यामध्ये किशोर कदम, मनोज जोशी, राजन भिसे, मेधा मांजरेकर यांच्यासोबत काम केले.
माझा पहिला हिंदी चित्रपट, ‘जिंदगी जिंदाबाद (१९९५) दिग्दर्शिका सुमित्रा भावे सोबत होता, त्यामध्ये मला अभिनेते ओम पुरी, मिता वशिष्ट, मिलिंद गुणाजी, उत्तरा बावकर, सुलभा देशपांडे, अभिराम भडकमकर, नीना कुलकर्णी यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘रुस्तम’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केले. माझं अजून एक टर्निंग पॉइंट म्हणजे मला मिळालेल्या मालिका होय. दिग्दर्शक श्याम बेनेगल सोबत मला काम करण्याचं स्वप्न होत. ‘संचिधान’ या मालिकेत त्यांच्या सोबत काम करून माझे हे स्वप्न पूर्ण झालं. प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाडसोबत ‘अंतराल’ ही मालिका केली.
माझं पुढचं टर्निंग पॉइंट म्हणजे जाहिरात क्षेत्रात झालेलं पदार्पण. मला आजही आठवतंय माझा एक मित्र गजराज राव, जो आता मोठा कलाकार झाला आहे, त्याने ‘बँडिट क्वीन, बधाई हो.’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयी सोबत दिल्लीला थिएटर करायचा. त्याची १९९१ साली दिल्लीला भेट झाली होती. पंधरा वर्षांनी २००५ साली मी पहिली ‘गुड नाइट ६३ रिफिल पॅक’ची जाहिरात केली. सध्या बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘माझा’ या शीतपेयाची जाहिरात गाजत आहे. सर्जनशील अभिनेता आमिर खान सोबत वक्रू नावाच्या चप्पलेची जाहिरात केली. न्यूबर्ग या पॅथोलॉजी लॅबची जाहिरात क्रिकेटर एम. एस. धोनीसोबत केली. ‘डाबर टूथ पेस्ट’ची जाहिरात अभिनेते अजय देवगणसोबत केली. एका इलेक्ट्रिक स्कूटरची जाहिरात अभिनेता हृतिक रोशनसोबत केली. नवरत्न तेलची जाहिरात अभिनेता शाहरुख खानसोबत केली. भारतीय क्रिकेट टीममधील गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत एका क्रिकेट अॅपची जाहिरात केली. विवो, कॅडबरी, स्निकर, योगी डॉट कॉम अशा भरपूर जाहिराती केल्या. आयुष्यात टर्निंग पॉइंट आल्यामुळेच मला इतकं सारं काम करण्याची संधी मिळाली व यापुढेदेखील मिळेल, अशी मी आशा बाळगतो.