Monday, July 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजश्री सदस्यांचा उत्साह शिगेला, महाराष्ट्र भूषण सोहळ्याची जय्यत तयारी

श्री सदस्यांचा उत्साह शिगेला, महाराष्ट्र भूषण सोहळ्याची जय्यत तयारी

नवी मुंबई: उद्या होणाऱ्या महाराष्ट्रभूषण सोहळ्यासाठी श्री सदस्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये याची जोरदार तयारी सुरू आहे. डॉक्टर दत्तात्रय नारायण धर्माधिकारी म्हणजेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

दरम्यान, तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त श्री सदस्य या सोहळ्यास उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. या सोहळ्यातील मुख्य मंच हा एखाद्या किल्ल्याच्या प्रतिकृतीप्रमाणे असेल. या मुख्य स्टेजच्या दोन्ही बाजूला केवळ व्हीआयपी आमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर समोर श्री सदस्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जबाबदारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. उदय सामंत यांनी आज सकाळपासून झालेल्या कामांचा आढावा सेंट्रल पार्क येथे येऊन घेतला.

वाहतूकीत बदल

दरम्यान, या सोहळ्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. १५ एप्रिल रोजी रात्री १ वाजल्यापासून ते १७ एप्रिलच्या सकाळी १० वाजेपर्यंत खारघर येथील कोपरा ब्रिज खालील अंडर पासमधून स्वर्ण गंगा चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने हिरानंदानी ब्रिज सिग्नल वरुन युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे नियोजित वाहनतळाकडे वळवण्यात येणार आहेत.

प्रवेश बंद:

दिनांक १५ एप्रिलला दुपारी २ वाजल्या पासून ते दिनांक १७ एप्रिलला सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई –पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता कार्यक्रम संपेपर्यंत बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग:

पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगा चौकाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल येथून यु टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजकडे जावून कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जाऊन पुढे जाऊ शकतील.

ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही.

उद्याच्या सोहळ्याची तयारी

  • या सोहळ्यासाठी ५० टक्के लोक रेल्वेने येतील असा अंदाज आहे. ते आल्यानंतर त्यांना रेल्वे स्थानका पासून मैदानात येण्यासाठी खास बसेस आहेत.
  • सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे १० हजार टॉयलेट्स उभारण्यात आल्याची माहिती आहे.
  • लोकांच्या वस्तू हरवल्या तर त्यासाठी लॉस्ट अँड फाऊंड ॲप तयार करण्यात आले आहे.
  • सर्व लोक आल्यानं मोबाईल रेंज नसेल तर त्यासाठी १३ विविध कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आले आहेत.
  • साप तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी सर्प मित्र तैनात करण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.
  • पाण्याची व्यवस्था म्हणून सिडकोने १२ नळ मैदानात दिले आहेत.
  • येण्याजाण्यासाठी ३ दिवसांत ३ रस्ते बांधण्यात आले आहेत.
  • ७० अँब्युलन्स, त्यात १६ कार्डीयक आहेत, एक छोटे हॉस्पिटल देखील तात्पुरते ठेवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -