वीरेंद्र सेहवागचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ५ चेंडूंत ५ षटकार ठोकणारा रिंकू सिंह केकेआरसाठी फिनिशरच्या भूमिकेत दिसू लागला आहे. त्याच्याकडून संघाला आता जास्त आशा आहेत, असे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.
वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवागने रिंकूची तुलना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीशी केली आहे. सेहवाग म्हणाला की, ‘सचिन तेंडुलकर जेव्हा खेळायचा तेव्हा त्याच्याकडूनही अशीच अपेक्षा होती. ९० च्या दशकात सचिनकडून अपेक्षा होती की तो संघाला विजय मिळवून देईल. धोनीने सामना संपवायला सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडूनही तीच अपेक्षा समोर आली. आता केकेआर संघाला रिंकूकडूनही तशीच अपेक्षा वाटू लागली आहे. आंद्रे रसेल यापूर्वी केकेआरसाठी असेच करायचा.’
पुढे सेहवागने म्हणाला की, ‘रिंकूने ५ चेंडूंत ५ षटकार मारून जी आश्चर्यकारक खेळी केली आहे, ती आता तो कधीही करू शकणार नाही. क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. रिंकू देखील पुन्हा हे करू शकणार नाही. कदाचित हा विक्रम मोडीत निघू शकतो पण रिंकू आपल्या कारकिर्दीत त्याची पुनरावृत्ती कधीच करू शकणार नाही.