ब्रुकचा शतकी धडाका
कोलकाता (वृत्तसंस्था) : हॅरी ब्रुकच्या नाबाद शतकी झंझावातामुळे दोनशे धावांचा टप्पा ओलांडलेल्या सनरायझर्स हैदराबादसमोर कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. मात्र नितिश राणा आणि रिंकू सिंहने विजयासाठी जीव ओतला. अखेर विजयाने मान वळवलीच. मयांक मार्कंडेची अप्रतिम गोलंदाजी हैदराबादच्या विजयात विशेष ठरली.
मोठे लक्ष्य पाहून प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर आणि सुनिल नरेन ही तिकडी आल्यापावली परत गेली. त्यामुळे अवघ्या २० धावांवर ३ फलंदाज बाद अशी निराशाजनक सुरुवात कोलकाताने केली. नारायण जगादेसन आणि कर्णधार नितिश राणा यांनी धावांची गती कमी होऊ दिली नाही. परंतु संघाची धावसंख्या ८२ असताना नारायण जगादेसनच्या रुपाने कोलकाताला चौथा धक्का बसला.
आंद्रे रसेलने याही सामन्यात नाराज केले. मात्र नितिश राणाने रिंकू सिंहच्या जोडीने धावगती तशी बरी ठेवली होती. परंतु धावा आणि चेंडू यातील अंतर वाढत गेल्याने धावांचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नात सेट झालेल्या नितिशने आपली विकेट गमावली. नितिशने संघातर्फे सर्वाधिक ७५ धावा जोडल्या. त्यानंतर रिंकू सिंहने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने ३१ चेंडूंत नाबाद ५८ धावा फटकवल्या. पण विजयासाठी ही खेळी अपूर्ण होती. कोलकाताला २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात २०५ धावा जमवता आल्या. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २७ धावा देत २ बळी मिळवले. हैदराबादने २३ धावांनी सामना खिशात घातला.
सनराईजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांच्याच होम ग्राऊंडवर २० षटकांत ४ बाद २२८ धावा ठोकल्या. यात सलामीवीर हॅरी ब्रुकने ५५ चेंडूंत ठोकलेल्या १०० धावांचा मोठा वाटा होता. हॅरी ब्रुकने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने १२ चौकार आणि ३ षटकार लगावत नाबाद १०० धावा केल्या. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे पहिले शतक ठरले. हॅरी ब्रुक, एडन मारक्रम यांनी षटकार आणि चौकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्यांनी कोलकाताच्या एकाही गोलंदाजांना सोडले नाही.
एडन मारक्रमनेही कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने २६ चेंडूंत ५० धावा तडकावल्या. अभिषेक शर्माने १७ चेंडूंत ३२ धावा जोडल्या. कोलकाताने आपल्या गोलंदाजीत १२ अतिरिक्त धावा दिल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३, तर वरूण चक्रवर्तीने १ विकेट घेतली.