Categories: रिलॅक्स

देवाचा स्वतःचा देश!

Share
  • मनातले कवडसे: रूपाली हिर्लेकर

जसजशी मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी जवळ येते तसतसे एप्रिल महिन्यापासूनच सफरीला जाण्याचे बेत शिजू लागतात. आरक्षण मिळवण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातात. विमान, रेल्वे, बस… मिळेल त्या वाहनाने आपलं नियोजित पर्यटन स्थळ गाठण्याची जणू चढाओढ सुरू होते. गेल्या वर्षी आम्ही अशीच अचानक केरळची सफर करायचं ठरवलं. दिवस थोडेच शिल्लक असल्याने अर्ध्याच जागांचं आरक्षण मिळालं. पण आम्ही एवढ्याने हार थोडीच मानणार होतो! कारण आमचा जायचा निर्धार केरळी नारळासारखा अगदी पक्का होता… आणि अहो आश्चर्यम्! निघता निघता ऐनवेळी आमची सगळी आरक्षणं पूर्ण निश्चित झाली आणि आम्ही निश्चिंतपणे केरळकडे रवाना झालो.

God’s Own country म्हणजे देवाचा स्वतःचा देश, असं केरळबद्दल जे बोललं जातं, ते तिथे जाऊन मला शंभर टक्के पटलं. कारण केरळच्या प्रत्येक गोष्टीत निसर्ग आणि निसर्गात एक सुंदर गोष्ट दडलेली होती. आम्ही रेल्वेने सलग अठरा तास प्रवास केल्यानंतर कोचिन स्टेशनवर उतरलो. बाहेर पडताच लख्ख प्रकाशात हिरवी झाडं दृष्टीस पडली तेव्हाच कळलं की, आता पुढील पाच दिवस आमची ट्रिप एकदम मस्त होणार आहे. हॉटेलवर सामान टाकून जरा फ्रेश झालो आणि लगेचच जेवायला गेलो. हॉटेलच्या प्रवेशद्वाराचं पारंपरिक नक्षीकाम, आतमधील भिंतीवर कोरीवकाम केलेले पुतळे, एकीकडे हीsss भली मोठी समई, त्या समईला केलेली सुंदर गजऱ्याची सजावट हे सारं तिथलं वातावरण पाहून मन प्रसन्न होऊन प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळाला. मग त्या हॉटेलमध्ये ऑथेंटिक फूड म्हणजेच इडली-सांबर येताच त्यावर ताव मारला. सांबार भुरकून पिताना फार मजा आली. आमचं पहिलं पाहण्याचं ठिकाण होतं, कोचिनमधील सेंट फ्रान्सिस चर्च. चर्चमध्ये आत शिरताच कमालीची शांतता अनुभवली. सर्वजण तल्लीनतेने प्रार्थना करत होते. आम्हीही त्यात सामील झालो. चर्च पाहून झाल्यावर चालत चालतच लगेच आम्ही कोची बीचवर गेलो. त्या दिवशी आंशिक सूर्यग्रहण असल्याने सूर्य अर्धचंद्राकार दिसला. ते दुर्मीळ दृश्य केरळ ट्रिपच्या आठवणींशी कायमचं जोडलं गेलं.

आम्हाला केरळ दाखवण्यासाठी जो ड्रायव्हर होता तो इंग्लिश छान बोलत होता. केरळमध्ये तेथील लोकभाषा मल्याळम् मुख्यतः बोलली जाते. पण इंग्रजीलाही तिथे महत्त्व आहे. आमचा ड्रायव्हर मध्ये मध्ये हिंदीतूनही बोलत होता. माझा मुलगा ड्रायव्हरकडून मल्याळम भाषेतली वाक्य शिकण्याचा प्रयत्न करत होता. थोडं शिकून झाल्यावर आम्ही ठरवलं की, इंग्रजीमध्ये मी प्रश्न विचारणार आणि तो मला मल्याळममध्ये त्याचं भाषांतर करून सांगणार. मग मी पहिला प्रश्न विचारला,
‘what is your name?’ तर तो म्हणाला,
‘तेरु वंदा?’
‘Where are you from?’
तो बोलला, ‘निगम एविदे एनुनान.’
‘Where are you going?’
तर त्याने प्रश्नाचं उत्तरच दिलं की, ‘यंगड मुन्नार.’
वास्तविक त्याने फक्त भाषांतर करायचं, असं ठरलं होतं आणि त्याने उत्तरच देऊन टाकलं होतं. एकूण या खेळात आमची करमणूक बाकी छान झाली आणि या निमित्ताने आम्हाला तिथल्या स्थानिक भाषेची म्हणजे मल्याळमची थोडी फार तोंडओळखही झाली.

जसं जसं मुन्नार जवळ येऊ लागलं, तसतसा वातावरणात सुखद गारवा जाणवू लागला. आपण थंड हवेच्या ठिकाणी आता आलेलो आहोत, हे कळलं. आजूबाजूला हिरवा रंग नुसता ओसंडून वाहत होता. मुन्नारच्या टेकडीवर पोहोचता पोहोचता रात्र झाली. उपाहारगृहात नारळाच्या रसातील चिकन करी आणि राईस खाऊन आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो आणि उद्या कुठे कुठे जायचं याचे भरपूर प्लॅन करून झोपी गेलो.

सकाळी लवकर तयार होऊन चहाचे मळे पाहायला निघालो. चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाचं जिथे शूटिंग झालं होतं, ती जागा आम्हाला दाखविण्यात आली. तिथे सर्वांनी मनसोक्त रील्स, फोटो काढून ते ठिकाण आठवणीत बंदिस्त केलं. चहाच्या मळ्यातून फिरताना चहाच्या पानांचा मस्त सुवास जाणवत होता. एका ओळीतली रोपं आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली लागवड पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं.

ये हसी वादियाँ
ये खुला आसमां…

गाण्याची धून आठवून पावलं जागीच थिरकू लागली. वाटलं आपण स्वर्गात, तर आलो नाही ना! इतकं नयनरम्य दृश्य आम्ही आजवर कधीच पाहिलं नव्हतं. मग चहाच्या फॅक्टरीमध्ये गेलो. चहाच्या पानांपासून ते थेट चहा पावडर बनवणाऱ्या यंत्राचं काम पाहिलं आणि एका व्हीडिओतून चहाचा इतिहासही आम्हाला समजला.

तिथून पुढे वॉटरफॉल पॉइंट होता. खोल दरीत झेपावणारा फेसाळता पांढरा शुभ्र धबधबा पाहताना निसर्गाच्या एका नितांत सुंदर आविष्काराची अनुभूती मिळाली. तिथून पुढे एको पॉइंट आहे. आपलाच आवाज परावर्तित होऊन पुन्हा ऐकताना खूप मजा वाटली. केरळचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे एलिफंट राईड. हत्तीवर बसून सफरीचा अनुभव खूपच थरारक वाटला. हत्तीने सोंडेमध्ये पाणी घेऊन एका मुलाला आंघोळ घातली. मग सोंडेने त्याला हारही घातला. त्या मुलानेही हत्तीला न घाबरता हलकेच प्रेमाने कुरवाळलं. हत्ती व माणूस या नात्यातला हा जिव्हाळा अत्यंत हृद्य होता. केरळच्या जादुई पेटीत आमच्यासाठी आणखीही बरीच सुखद आश्चर्य दडलेली होती… पण त्याबद्दल आता पुढील भागात.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

5 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

6 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

7 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

8 hours ago