-
नंदकुमार पाटील: कर्टन प्लीज
जगामध्ये महाराष्ट्र हे असे राज्य आहे, जिथे नाट्यकला हा प्रेक्षक आणि कलाकारांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या अनेक दशकांपासून मराठी नाटकाचे अन्य भाषेत अनुकरण होताना दिसते. आता परिस्थिती थोडी बदललेली आहे. अन्य भाषिक गाजलेली नाटकेसुद्धा मराठी रंगभूमीवर होताना दिसतात. रंगभूमीवर आणखी एक बदल झालेला आहे, तो म्हणजे नाटक सादर करणारे त्या त्या भाषेतले लोकप्रिय कलाकार असायलाच हवे, असा आग्रह धरणारा प्रेक्षकवर्ग हा आता विरळ झालेला आहे. कलाकार सराईतपणे अन्य भाषा बोलत असेल, तर प्रेक्षकांनी त्या कलाकाराचे स्वागत केले आहे. संदेश कुलकर्णी यांनी लिहिलेले, दिग्दर्शित केलेले ‘पुन:श्च हनिमून’ या मराठी नाटकाबरोबर हिंदीतसुद्धा ‘फिर से हनिमून’ या शीर्षकात हेच नाटक सादर केले जात आहे. ज्यात संदेश यांच्याबरोबर अमृता सुभाष हे काम करतात. मराठी नाटकाला फार मोठी परंपरा आहे. संगीत नाटकापासून ती चालत आलेली आहे. प्रायोगिक, व्यवसायिक असे विविध प्रयोग करीत या नाटकांनी उंच पताका फडकवत ठेवलेली आहे. काही दशकांपूर्वी प्रौढांसाठी असलेल्या नाटकांची लाट लक्षात घेतल्यानंतर मराठी रंगभूमीचे काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. आतासुद्धा ठरावीक प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून तकलादू नाटके लिहिली जात आहेत. जोपर्यंत प्रगल्भ, सक्षम, बुद्धीचा कस दाखवणारे लेखक या मराठी रंगभूमीवर ठामपणे उभे आहेत, तोपर्यंत चिंता करावी. असे रंगमंचावर काही घडेल, असे वाटत नाही. मालिका, चित्रपट, वेबसीरिज याच्यासह स्वतःला स्थिर करू शकतील, अशी अनेक माध्यमे उपलब्ध असतानासुद्धा काही लेखक नाटकाच्या प्रेमापोटी प्रयत्न करत असतात. ‘पुन:श्च हनिमून’ हे नाटक त्यापैकी एक आहे. अभिनय, लेखनदृष्ट्या हे नाटक काही पावलं पुढे आहे. प्रतिमा आणि प्रतिभा यांचे सुरेख दर्शन घडवणाऱ्या या नाटकाची निर्मिती स्क्रिप्टटीझ क्रिएशन्स आणि रंगाई या संस्थेने केलेली आहे.
नाटकात सुकन्या देशपांडे आणि सुहास देशपांडे या उभयतांची कथा आहे. या दोघांच्या मागे प्रचंड कामाचा व्याप आहे. त्यामुळे पती-पत्नी असतानासुद्धा हवा तसा सुसंवाद त्यांच्यात झालेला नाही. आता वेळ काढून त्यांनी कितीतरी वर्षांनंतर पुन्हा हनिमूनला जाण्याचे ठरवलेले आहे. त्यासाठी विवाहबद्ध झाल्यानंतर ज्या माथेरानच्या हॉटेलमध्ये ते हनिमूनला आले होते तेच हॉटेल, तिच रूम मिळावी हा सुकन्याचा हट्ट होता. ते हॉटेलमध्ये पोहोचतात. पण मनाची घालमेल त्यांना स्वस्थ काही बसू देत नाही. विचारांचे काहूर डोक्यात घोळत असतात. ते लेखकाने या कथेत आणलेले आहे. प्रत्यक्षातल्या जीवनापेक्षा स्वप्नवत जीवन त्यांना ताब्यात घेते. त्यामुळे माणसाची वृत्ती-प्रवृत्ती, स्वार्थी वागणूक, समाजव्यवस्था, व्यक्ती यात ते भरकटले जातात. त्यांचा या उभयतांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम यात अधोरेखित केला आहे. हॉटेलची रूम इथेही कथा घडत असली तरी दोघांचे मन तसेच इतर पात्राची चंचल आणि आभासी विश्वात विहार करणारे आहे. त्यामुळे कसरत करून नेपथ्य उभारणे या गोष्टीला या नाटकात फारसे महत्त्व दिलेले नाही. भारुडात, लोकनाट्यात, पथनाट्यात एक गिरकी मारली की, थोडासा संवाद साधला की, आजूबाजूची योग्य जागा, ठिकाण निश्चित होते. तसा काहीसा प्रयत्न या नाटकात दिग्दर्शकाने केला आहे आणि नेपथ्यकार मीरा वेलणकर यांनी ती संकल्पना या रंगमंचाच्या चौकटीत उभारलेली आहे. हॉटेलचे रिसेप्शन, न्यूज रूम, स्टेशन, मेकअप रूम, हॉटेलची रूम या साऱ्या गोष्टी येथे संकल्पना वापरून आणलेल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना थोडे सतर्क राहूनच हे नाटक पाहावे लागणार आहे. आता पुरुष किंवा स्त्री सांगायला माणूस असले तरी मानसिक, शारीरिक, सामाजिक गरज या पूर्णपणे वेगळ्या आहेत. लेखकांनी त्याचा सूक्ष्म अभ्यास करून हे नाटक लिहिलेले आहे. डोळस अभ्यास, समाजाचे, नात्याचे अवलोकन म्हणजेच ‘पुन:श्च हनिमून’ हे नाटक सांगता येईल.
नाटकाचे शीर्षक ‘पुन:श्च हनिमून’ आहे म्हणताना प्रेक्षकांनी स्वतःचे अंदाज बांधून या नाटकाला येऊ नये. स्वतंत्र विचारसरणीचे हे नाटक आहे. लेखनाने जसे ते प्रगल्भ आहे तसे ते अभिनयानेसुद्धा समृद्ध आहे. ही किमया कथेतल्या पती-पत्नी म्हणून वावरणाऱ्या अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी या गुणी कलाकारांनी केली आहे. सुकन्यांची व्यक्तिरेखा अमृता सुभाष यांनी केली आहे. त्यांचे नाव प्रेक्षकांना नाटक पाहायला लावण्यासाठी पुरेसे आहे. सुकन्याच्या भूमिकेत अनेक व्यक्तिमत्त्व डोकावताना दिसतात, ते उत्स्फूर्त आणि सहजपणे त्यांनी साकार केलेली आहेत.
लेखकासाठी जसे हे नाटक पाहा, असे सांगावेसे वाटते, तसे अमृता सुभाष यांच्यासाठी हे नाटक आवर्जून पाहा, असे सांगणारे आहे. सुहासची व्यक्तिरेखा स्वतः संदेश कुलकर्णी यांनी केली आहे. भूमिकेत अभिनयातल्या विविध छटा ते उत्तमपणे दाखवतात. याशिवाय या नाटकात अमित फाळके, मंगेश काकड यांच्या भूमिका आहेत. त्यांनीसुद्धा आपल्या भूमिकेत विविध व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत. नरेंद्र भिडे यांनी विषयाला साधेल, असे संगीत दिलेले आहे. अाशुतोष पराडकर यांची प्रकाशयोजना व श्वेता बापट यांची वेशभूषा नाटक प्रभावी होण्यासाठी योग्य ठरलेली आहे.