Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रमहत्वाची बातमी

या मुंबई-गोवा हायवेचे करायचे काय?

मंत्र्यांच्या हवाई पाहणीवर मुंबई हायकोर्टाने ओढले ताशेरे


मुंबई : सध्या कोणत्याही समस्येची पाहणी हे हवाई पद्धतीने करण्याची फॅशन आली आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.


नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची हवाई पाहणी केली. परंतू त्यांनी आणि राज्य सरकारनेही वारंवार डेडलाईन दिल्यानंतरही अजूनही या कामाची डेडलाईन पूर्ण झालेली नाही. यावरुन हायकोर्टाने आपले मत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली.


आम्हाला प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने मनात आणले तर या महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्याचे काम काही दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते, असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले.


तसेच याबाबत राज्य सरकारने आपले मत लवकरात लवकर व्यक्त करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.


गेल्या १३ वर्षापासून मुंबई-गोवा हायवेचे काम रखडले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कोकणातील वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली.


या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून याचे काम केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. सध्या हा रस्ता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेला आहे.

Comments
Add Comment