Monday, October 20, 2025
Happy Diwali

राहुल गांधी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटणार नाहीत

राहुल गांधी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटणार नाहीत

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांचा असा कोणताही प्रोग्राम ठरलेला नाही, असे म्हणत या भेटीबाबतची शक्यता तूर्तास तरी फेटाळून लावली आहे. मात्र राहुल गांधी भाजपविरुद्ध विरोधकांची मोट बांधत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीबाबत अजून काहीही ठरलेले नाही. परवा नितीश कुमार, तेजस्वी यादव राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. मात्र राहुल गांधी हे मुंबईत येणार असल्याचा कोणताही प्रोग्राम सध्या तरी नाही.

सावरकरांच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडीतील धूसफुस चव्हाट्यावर आली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर काँग्रेसकडूनही नाराजीचे सूर उमटल्याचे बोलण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत.

Comments
Add Comment