-
अनुराधा देशपांडे : मुंबई ग्राहक पंचायत
झाल्या बहू होतीलही बहू, परंतु या सम हीच’ असा ज्याचा अभिमानाने उल्लेख करावा अशी मुंबई ग्राहक पंचायतीची ‘ग्राहक पंचायत पेठ’ १४ ते २० एप्रिल ह्या कालावधीत गोरेगाव येथील जवाहर नगर हॉलमध्ये संपन्न होत आहे. आकर्षक वस्त्रप्रवरणे, पर्सेस, चादरी, ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू, खेळणी अशा असंख्य नावीन्यपूर्ण वस्तूंनी गजबजलेली ही पेठ असेल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ‘झाल्या बहू’ ह्या उक्ती मागे मोठा इतिहास आहे. १९७४ साल. बाजारात नफेखोरी, भेसळ, वजन मापातील फसवणूक ह्या अनुचित प्रथांनी धुमाकूळ घातलेला होता. ग्राहकांना वारेमाप लुबाडले जात होते. त्याचे एकमेव कारण म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये असे म्हणजे ग्राहक संघटित नव्हता. ‘कोणीही यावे आणि टपली मारून जावे’ अशी दयनीय अवस्था ग्राहकांची होती. ह्या अन्यायाविरुद्ध उभे ठाकले ते कै. बिंदुमाधव जोशी. पुण्यात ह्या अन्यायाविरुद्ध पहिले पाऊल उचलले ते स्व. मा. बिंदुमाधव जोशी ग्राहक चळवळीच्या माध्यमातून. बिंदुमाधव जोशी हे ह्या ग्राहक चळवळीचे प्रणेते. त्यांना साथ लाभली ती सुप्रसिद्ध संगीतकार कै. मा. सुधीर फडके (बाबूजी) ह्यांची. पुण्यात ग्राहक चळवळीचे बीजारोपण केलेले हे रोपटे खऱ्या अर्थाने रुजले ते मुंबईत. मुंबईत ह्या रोपट्याची रुजवात केली बाबूजींनी आणि मुंबई ग्राहक पंचायत ह्या स्वयंसेवी संघटनेची स्थापना झाली. ग्राहकांना संघटित करण्यासाठी माध्यम निवडले गेले ते अभिनव वितरण व्यवस्थेचे. संस्थेच्या सदस्यांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर जीवनावश्यक वस्तू रास्त दरांत, उत्तम दर्जाच्या वस्तू संघपोच पुरवणारी वितरण व्यवस्था सुरू झाली आणि हा वृक्ष बहरू लागला. ग्राहकांच्या शोषण मुक्तीच्या दिशेने उचललेले हे संघटनेचे पाऊल होते.
या वितरणातून मासिक वाणसामान मिळत होते पण ज्याची प्रत्यक्ष निवड करून खरेदी व्हायला हवी अशा वस्तू ह्या पद्धतीत नव्हत्या. आणि १९७८ साल उजाडले ते एक नवीन कल्पना घेऊन. तत्कालीन संस्थेच्या खरेदी अध्यक्षा कै. प्रतिभाताई गोडबोले यांच्या संकल्पनेतून पहिली छोटेखानी साडी पेठ आकाराला आली. एका अर्थाने ह्या ‘ग्राहक पेठ’ संकल्पनेची जननी ‘मुंबई ग्राहक पंचायत.’ एका छोट्याशा संकल्पनेतून आकाराला आलेल्या ह्या पहिल्या-वहिल्या ग्राहक पेठेने आज विशाल वटवृक्षाचे स्वरूप धारण केले आहे. ह्याची मुळे ही ह्या वटवृक्षाप्रमाणे खोलवर रुजलेली आहेत. सुरुवातीला फक्त दादर येथे आयोजित होणाऱ्या ग्राहक पेठेची व्याप्ती नंतर ठाणे, बोरिवलीपर्यंत पसरली आणि आता तर केवळ मुंबई, ठाणेच नाही तर मुंबई बाहेर पुणे, अलिबाग, नाशिक, पालघर इथेही ह्या पेठांचे आयोजन संस्थेतर्फे होत आहे. ह्या पेठांच्या यशस्विततेची नक्कल करण्याचे अनेक प्रयत्न एव्हढे झाले की, शेवटी संस्थेने ह्या उपक्रमाला ‘ग्राहक पेठ’ असे न संबोधता ‘ग्राहक पंचायत पेठ’ हे नाव धारण केले. कारण पेठांची नक्कल बाजारपेठेत होऊ लागली पण पंचायत पेठेने अंगीकारलेल्या उचित प्रथांचा आग्रह मात्र हे ग्राहक पेठांचे आयोजक घेत नाहीत.
खरे तर उचित प्रथांचा आग्रह धरून उत्तम व्यवसाय करता येतो हे फक्त मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. इथे ग्राहकाला योग्य पावती देण्याचे बंधन प्रत्येक विक्रेत्यावर असते. ‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही’ अशी ग्राहकाला जाचक ठरणारी एकतर्फी अट पावतीवर छापता येत नाही. ग्राहक पंचायत पेठेत फक्त स्वदेशी उत्पादनेच ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. ह्या सर्वच उपक्रमाला एक वैचारिक बैठक आहे. इथे छोट्या उत्पादकांना त्यांची दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ दिले जाते. उचित प्रथा पाळूनही उत्तम व्यवसाय करता येतो ह्याची शिकवण अगदी सुरुवातीपासूनच इथे मिळते. पेठ समितीच्या कठोर परीक्षणातून दर्जेदार उत्पादनेच रास्त किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचतात. कुठेही किमतीची घासाघीस करण्याची वेळ येतच नाही. पंचायत पेठांमध्ये फक्त स्वदेशी उत्पादनेच विक्री करण्याचे बंधन विक्रेत्यांवर असते. जर बाहेरची परदेशी बनावटीची उत्पादने, विशेषतः चिनी उत्पादने अशा पंचायत पेठेतून विक्रीसाठी आली तर एकतर त्याची खात्री नाही आणि दुसरे म्हणजे स्वदेशी उत्पादक पुढे कसे येणार? देशांतर्गत उद्योगाला चालना आणि देशाचा पैसा देशातच राहायला हवा हा त्यामागचा उद्देश. ‘ग्राहक पंचायत पेठांचे’ वेगळेपण हे इथून सुरुवात होते. ह्या पेठांचा उद्देश हा नफेखोरीचा नाही. ग्राहकांना त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य मिळाले पाहिजे, त्यांची फसवणूक होता कामा नये याकडे पुरेपूर लक्ष दिले जाते. एखाद्या ग्राहक संस्थेने ग्राहकांसाठी आयोजित केलेली ही पंचायत पेठ आहे. इथे केवळ खरेदी-विक्रीचा व्यवहार नाही. ग्राहकांना त्यांच्या हक्काबद्दल जागृत करण्याचे काम ह्या पंचायत पेठा करतात. त्यासाठी प्रत्येक पंचायत पेठेत ‘जागो ग्राहक जागो’ हा ग्राहकांना सजग करणारा उपक्रम राबविला जातो. ह्यासाठी विविध सरकारी यंत्रणांना निमंत्रित केले जाते. वजन मापातील फसवणूक, अन्नधान्यातील भेसळ ओळखणे, दूध भेसळ कशी ओळखावी ह्याचेही प्रात्यक्षिक दाखवले जाते. BIS यंत्रणेचे अधिकारी ग्राहक संरक्षणासाठी विविध मानांकने कशी असतात ह्याची माहिती ग्राहकांना देतात. पंचायत पेठांचे वेगळेपण इथेच दिसते.
पंचायत पेठांचे आयोजन करताना संस्था सामाजिक भान विसरत नाही. समाजात मूक, बधिर, अपंग, मतिमंद वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांनाही व्यासपीठ देण्याचा उपक्रम इथे राबवला जातो. कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य स्टॉल अशा संस्थांना दिले जातात.आज बाजारपेठेत ग्राहक पेठांचे पेव फुटलंय. गल्लोगल्ली कोणत्याही मोसमांत जिथे-तिथे भव्य ग्राहक पेठांचे फलक झळकताना दिसतात. ठिकठिकाणी मॉल उभे राहिले आहेत. ऑनलाइन शॉपिंगचा तर सुळसुळाट झालाय पण जर इथे खरेदी केलेल्या वस्तूची पावतीच ग्राहकांकडे नसेल किंवा विक्री पश्चात सेवेच्या नावाने ठणठणाट असेल तर ग्राहकाला त्याच्या पैशाचे कसे काय मोल मिळणार? चोखंदळ ग्राहकांसाठी चोखंदळ खरेदीचा आनंद लुटायचा असेल, तर समस्त ग्राहकांनी १४ ते २० एप्रिल २०२३ ह्या कालावधीत गोरेगाव येथे ‘जवाहर नगर हॉल’मध्ये यायला हवे. हो आणि येताना आपल्या बच्चे कंपनीलाही घेऊन यावे. चोखंदळ खरेदी कशी करावी, उत्पादनातील असली-नकलीचा फरक कसा ओळखावा ह्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आमचे कार्यकर्ते तयार आहेत. कारण आजचा बाल ग्राहक उद्याचा सुजाण, सजग ग्राहक करण्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे उद्दिष्ट आहे.