- रवींद्र तांबे
आज १४ एप्रिल अर्थात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती. त्यानिमित्ताने देशातील तमाम तरुणांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा थोडक्यात घेतलेला आढावा.
आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या मते, “जे शिक्षण आपल्याला सक्षम बनवत नाही किंवा समानता आणि नैतिकतेचे धडे शिकवत नाही ते शिक्षण नाही.” म्हणजे यावरून बाबासाहेबांची दूरदृष्टी काय होती ते सहज लक्षात येते. तेव्हा देशातील तरुणांनी आत्मपरीक्षण करावे. म्हणजे बाबासाहेबांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची खरी ओळख होईल. केवळ जयंती साजरी केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. त्यासाठी बाबासाहेबांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान आत्मसात करावे लागेल. आज पदवीधर होऊन सुद्धा नोकरीची हमी नाही मग सांगा हे शिक्षण काय कामाचे?
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. आधुनिक भारतातील सर्वात सुशिक्षित लोकांमध्ये त्यांची गणना होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिष्ठित अशा कोलंबिया विद्यापीठ आणि प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुशल वक्ते, लेखक आणि ज्ञानी अभ्यासक म्हणून केवळ देशात नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे अभ्यासाचे क्षेत्र केवळ अर्थशास्त्र आणि कायदा यापुरते मर्यादित नव्हते तर शिक्षण, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, संविधान, धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयांवरही त्यांचा पूर्ण अभ्यास होता. तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. शिक्षणाशी आयुष्यभर जोडलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच एक तत्त्वज्ञानी होते. आपल्या समाजातील शिक्षणाचे स्वरूप आणि प्रगती समजून घेण्यासाठी त्यांच्या शिक्षणाविषयीच्या विचारांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षणाविषयीच्या त्यांच्या मुख्य कल्पना आहेत त्या आजच्या विद्यार्थ्यांनी व विशेषत: तरुणांनी आत्मसात कराव्यात. त्यांनी शिक्षणाचा विचार करतात त्यांचा मुख्य उद्देश व्यक्तीचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणे होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील जातिवाद, अस्पृश्यता, सामाजिक भेदभाव, सामाजिक विषमता आणि महिला असमानता इत्यादींचे कट्टर विरोधक होते. भारतीय समाजातील विद्यमान सामाजिक विषमता आणि सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी समता, स्वतंत्र आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे अशी त्यांची धारणा होती. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे लोकशाहीप्रधान देशाने कोणताही भेदभाव न करता आपल्या समाजातील सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. आज आपल्या देशात आपल्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेता येत नाही ही शोकांतिका आहे.
२० जुलै, १९४२ रोजी नागपूर येथे जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “मी समाजाच्या प्रगतीचे मोजमाप स्त्रियांच्या प्रगतीच्या प्रमाणात करतो.” देशाची निम्मी लोकसंख्या अशिक्षित राहिली, तर जगातील कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक असल्याने ते स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. समाजाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या विकासासाठी महिलांचे शिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, ‘शिक्षण हे पुरुषांइतकेच स्त्रियांसाठीही आवश्यक आहे.
शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे एखाद्या व्यक्तीला उपजीविकेसाठी सक्षम बनवणे होय. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केले की, माणसाच्या जीवनात रोजगार किंवा उपजीविका मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचा असा विश्वास होता की, शिक्षण तेव्हाच पूर्ण मानले जाईल जेव्हा त्याच्याशी काही कौशल्ये जोडली जातील आणि अशा कौशल्यामुळे व्यक्तीसाठी काही रोजगार निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी तंत्रशिक्षणावर भर दिला आणि समाजातील मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी ते आवश्यक मानले.
तेव्हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आवश्यक असतात. चांगले शिक्षक असतील तर आपण चांगले विद्यार्थी घडवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांना शिक्षकांबद्दल खूप आदर होता आणि शिक्षकांना उच्च स्थान देण्याचे त्यांचे समर्थन होते. सुदृढ आणि परिपूर्ण मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासात शिक्षकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, असे बाबासाहेबांचे मत होते. चांगल्या शिक्षकाचा समाजातील सर्व घटकांप्रती सकारात्मक आणि समतावादी दृष्टिकोन असायला हवा. शिक्षकांची शाळा किंवा विद्यापीठांमध्ये नियुक्ती करताना त्यांची पात्रता आणि इतर क्षमता तपासल्या पाहिजेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान हे प्राचीन आणि आधुनिक शिक्षणाचे मिश्रण आहे. त्यांनी भारतीय समाजातील एका मोठ्या वर्गाच्या शैक्षणिक विकासाची आवश्यकता अधोरेखित केली आहे, जी दीर्घकाळ शिक्षणापासून वंचित आहे. त्यांनी संविधान निर्मितीच्या वेळी शिक्षणाचे आणि दलित लोकांच्या सामाजिक मुक्तीसाठी अनेक कायदे तयार करण्यात मोठी भूमिका बजावली. समाजाचा मोठा भाग शिक्षणापासून वंचित राहिला, तर समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे आपल्या समाजात सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित व्हावी आणि आपला देश प्रगती करू शकेल, यासाठी प्रत्येक राज्याने लोकांना सार्वत्रिक गुणात्मक शिक्षण दिले पाहिजे आणि तंत्रशिक्षणही द्यावे, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिलेला होता.