मुंबई : बेस्ट बसच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकाचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुज येथील न्यू मॉडर्न स्कूल जवळ, वाकोला मस्जिद येथे सकाळी ९च्या सुमारास बेस्ट बस क्रमांक MH01TR4685/ BEST बस रूट क्रमांक-392 च्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने तेथून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कर्तव्यावर निघालेल्या पोलीस निरीक्षक प्रवीण अशोक दिनकर (४३) यांच्या मोटरसायकलला धडक दिली.
प्रवीण दिनकर हे दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या पुढे असलेल्या बसने प्रवासी उतरविण्यासाठी गाडी थांबविली होती. यावेळी मागून येणाऱ्या बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या दोन्ही बसच्या मध्ये ते चिरडले गेले.
या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अधिक उपचाराकरता व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा सव्वा अकरा वाजता मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाकोला पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नारायणकर यांनी ही माहिती दिली. निधनाचे वृत्त समजताच सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था श्री सत्यनारायण चौधरी, पोलीस उपायुक्त परिमंडळ ८, सपोआ काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकोला पोलीस ठाणे तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार रुग्णालयात पोहचले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.