ज्ञानदेवांची दिव्य प्रतिभा काय वर्णावी! अठराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत अद्वैत विचार! साधना करता-करता परमेश्वराशी म्हणजे जे साध्य करायचे आहे, त्याच्याशी एकरूप होतो. मग भक्त – साधना व साध्य हे वेगळेपण राहात नाही. अर्जुनाला हा विचार सांगणारा ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण एकाहून एक सुरस व सरस उदाहरणं देतो म्हणजे श्रीकृष्णाच्या मुखातून ज्ञानदेवच बोलतात. हे दाखले अतिशय व्यापक, अफाट आहेत. जसे, एक दाखला –
आकाश हे जसे सर्वव्यापक आहे, त्यामुळे त्याला जसे ‘ढळणे’ माहीत नाही. (ते नेहमी असतं) तसा मी जो आत्मा, त्या माझीच व्याप्ती सर्वत्र झाली आहे. (आकाशाप्रमाणे मी सर्वत्र भरून आहे.) आणि
आकाश हें आकाशें। दाटलें न ढळे जैसें।
मियां आत्मेन आपणपें तैसें। जाले तया॥ ओवी क्र. ११६५
तर पुढच्या दाखल्यात म्हटले आहे की, कल्पांतकाली ओतप्रोत उदकच भरल्यामुळे उदकाचे वाहणे जसे बंद होते, तसे सर्व विश्व आत्मत्वाने कोंदले असल्याने त्याला आत्म्यावाचून दुसरा पदार्थच उरत नाही.
कल्पांतकाळी (जगबुडीच्या वेळी) पाणी हे सर्वत्र भरलेले असते, पाण्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. पाण्याचं स्वरूप हे जसं तेव्हा सर्वव्यापी असतं, त्याप्रमाणे भक्ताला सर्वत्र परमेश्वरच भरलेला दिसतो. असा प्रचंड दृष्टान्त दिल्यानंतर ज्ञानदेव अतिशय सूक्ष्म, तरल दृष्टान्त देतात. विशेष म्हणजे तो पाण्याचाच आहे, पण त्याचं रूप वेगळं आहे.
पाण्यावरील बुडबुडा जरी मोठ्या वेगाने धावत गेला, तरी तो पाण्याशिवाय भूमीवर धावत नाही. अर्थात त्याचे धावणे हे न धावण्याप्रमाणेच समजले पाहिजे. (ओवी क्र. ११६८)
म्हणून जे ठिकाण सोडायचे व ज्या ठिकाणी जायचे, चालणारा व चालण्याचे पाय हे सर्व पाणीच असल्यामुळे तो तरंग पाहिजे तितका धावत गेला, तरी हे पांडुसुता त्याचा एकपणा मोडत नाही. (ओवी क्र. ११७०, ११७१)
त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप झाल्यावर ‘मी’पणाने जरी त्याला स्फुरण झाले, तरी तो संपूर्ण माझेकडेच आला; अशी जी यात्रा, त्या यात्रेने तो माझा यात्रेकरूच झाला. पाण्याचा थेंब प्रवास करतो. पण तो पाण्यातून सुरू होतो व पाण्यापर्यंतच संपतो, त्याप्रमाणे हा भक्त माझ्याशी एक होऊन यात्रा सुरू करतो व यात्रेची सांगता माझ्यातच होते. माऊलींनी पाणी हा दृष्टान्त का योजला असेल? सच्च्या साधकासाठी! पाणी हे निर्मळ, प्रवाही, पारदर्शक असतं, त्याप्रमाणे हा भक्त असतो.
प्रलयकाळच्या अशा पाण्याचा प्रचंड आवेगातून ज्ञानदेव आपल्याला किती सहजतेने, पाण्याच्या एका थेंबाकडे, तरंगाकडे नेतात. त्या तरंगाला पाण्यावाचून पर्याय नाही. असे व्यापक व सूक्ष्म दाखले एकामागोमाग एक देऊन भक्त व परमेश्वर यांची एकरूपता वर्णितात व ही ज्ञानदेवांच्या प्रतिभेची कमाल आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं,
‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’!
manisharaorane196@gmail.com
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…