वेंगुर्ले येथील मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे प्रतिपादन
वेंगुर्ले ( प्रतिनिधी ): केंद्र व राज्य शासनामार्फत आज विविध योजना राबविल्या जात आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.
भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा पं.स. मतदारसंघ व वेंगुर्ले शहराचा लाभार्थी मेळावा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी आयुष्यमान भारत योजना, सुकन्या समृद्धी योजना, ई श्रम कार्ड योजना च्या २०० लाभार्थीना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत कार्ड वाटपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी सचिव शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायगणकर, सोमनाथ टोमके, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, सुषमा प्रभुखानोलकर, सुरेंद्र चव्हाण, पूनम जाधव, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, दादा केळुसकर, पपु परब, सारीका काळसेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना तेली म्हणाले, विविध योजना केंद्र सरकार मार्फत राबविल्या जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये मिळत आहेत.
राज्य सरकार कडून आता त्यात वाढ करण्यात आली असून एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. महिलांना एस टी मध्ये ५० टक्के सवलत, गोपीनाथ मुंडे अपघात योजना यासह अन्य योजना आहेत. त्यांचा अभ्यास करा व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी दिला आहे. तसेच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रिपद असल्याने त्याचा येथील विकासासाठी फायदा होणार आहे. त्यासाठी आवश्यक रस्ते विकासकामांची यादी बनवा व ती राज्यस्तरापर्यंत मंत्री चव्हाण यांच्याकडे द्या, असेही तेली यांनी सांगितले.