चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईवर रोमहर्षक विजय मिळवूनही राजस्थानच्या विजयाच्या आनंदावर विरजण पडले. संथ गतीने षटके पूर्ण केल्याबद्दल संघाचा कर्णधार संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघावर बसलेला हा पहिलाच दंड आहे.
बुधवारच्या सामन्यात राजस्थानने चेन्नईला ३ धावांनी पराभूत केले. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात संदीप शर्माने शेवटचा चेंडू यॉर्कर टाकत धोनीला मोठा फटका मारण्यापासून दूर ठेवले. या विजयानंतर राजस्थानचे खेळाडू आणि चाहते जल्लोषात होते. मात्र कर्णधार संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आल्याने या विजयी आनंदावर विरजण पडले आहे. स्लो ओव्हर रेट म्हणजेच संथ गतीने षटके पूर्ण केल्याबद्दल संजूला १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. राजस्थान संघाने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे आता कॅप्टन संजू सॅमसनला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.