Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यजांभूळ, करवंदाचे कोकण...!

जांभूळ, करवंदाचे कोकण…!

  • माझे कोकण : संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातला कोकण विभाग हा इतर प्रांतापेक्षा फारच निराळा आहे. समुद्राची किनारपट्टी माड, पोफळीची बागायत, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण अखंड कोकण प्रांतात पाहायला मिळते. कोकणात सर्व काही पिकते. ऊस कोकणात होईल की नाही, असा प्रश्न पूर्वी उपस्थित केला जायचा; परंतु राधानगरी आणि गगनबावडा येथील साखर कारखान्यांना ऊस जातो. कोकणात ऊस पिकेल आणि तोही एवढ्या मोठ्या प्रमाणावर असे कधीच कोणाला वाटले नव्हते; परंतु ते अलीकडे सत्यात उतरले आहे. कोकणात तयार होणारी आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंद ही कोकणातील संपत्ती आहे. जांभुळाची झाडं पूर्वीपासून कोकणातील शेतजमिनीत किंवा घराशेजारी एखाद-दुसरं तरी झाड असायचंच.

पूर्वीपासून एप्रिल, मे महिन्यात तयार होणारी जांभळं कोकणातून पुणे, मुंबईच्या मार्केटमध्ये जायला लागली आणि शेतकऱ्यांना चांगला दरही मिळायला लागला. जांभळाचा व्यवसाय होऊ लागला. त्यातून चांगला दरही मिळू लागला. यामुळेच कोकण कृषी विद्यापीठाने जांभळाचे संशोधन केले आहे. यामुळे जास्तीचे जांभूळ उत्पादन कसं होईल हे पाहिले जात आहे. जांभूळ आणि करवंद ही दोन्ही फळपिकं निसर्गावरच अवलंबून आहेत. कोकणातील जांभूळ आणि करवंदाला वेगळी टेस्ट आहे. यामुळे कोकणातील करवंद, जांभूळ याला मागणीही तशीच आहे. मधुमेहासाठी जांभूळ आणि जांभळामधील ‘बी’ ही देखील उपयुक्त असल्याने सध्यस्थितीत जांभळाला प्रचंड मागणी आहे. कोकणकृषी विद्यापीठाने संशोधन करून सिंधुदुर्गातील कुंदे १, कुंदे २, सावंतवाडी १, सावंतवाडी २, कोलगाव १, कोलगाव २, आंब्रड १, आंब्रड २, निरूखे १, निरूखे २, अशा स्थानिक कोकणातील जाती विकसित करण्यात आल्या आहेत. याची लागवडही आपल्या कोकणात होत आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी जांभळांची लागवडही मोठ्या प्रमाणावर करायला हवी. पारंपरिक जी जुनी जांभळांची झाडं आहेत, ही झाडं त्या झाडांना काहीही न देता दरवर्षी न चुकता ही झाडं उत्पादन देत असतात. कोकणातील शेतकरी एप्रिल, मेच्या हंगामात आपल्या परसातलं जांभळाचं झाड आपल्या परिवारातील लोकांना, शेजाऱ्यांना खाण्यापुरती जांभळ मिळतात. यातच आनंद मानायचा; परंतु याच जांभूळ उत्पादनाचेही पैसे मिळू शकतात. हे जेव्हा शेतकऱ्याला समजले तेव्हापासून जांभळाचे व्यापारी गणित मांडण्यात आले. आणि जांभळाच्या व्यवसायातही अनेकजण स्थिरावले. प्रत्येकवर्षी जांभूळ पिकाचा बहर येतोच असे नाही; परंतु शेतकऱ्यांना निश्चितपणे चार पैसे यातून मिळून जातात.

करवंदाचं पीक म्हणजे अळवावरचं पाणीच म्हणायला हवं. करवंदाची शाश्वती देता येत नाही. याचं कारण एक पाऊस पडला तरीही करवंद खराब होतात. मात्र, अलीकडे करवंदांचा लोणच्यासाठी उपयोग केला जातो. मोठ्या प्रमाणावर करवंद लोणच्यासाठी केला केला जातो. पाच-पन्नास वर्षांपासून करवंदाच्या झाळी आहेत. त्या आजही टिकून आहेत. करवंदांच्या झाळी कपाऊंडसाठी वापरल्या जायच्या. अलीकडे कपाऊंडसाठी करवंदांच्या झाळींचा उपयोग करायचंही सोडून देण्यात आलं. यामुळे करवंदाची मुद्दाम होऊन लागवड कोणी करत नाही. पूर्वांपार माळरानावर, डोंगरदरीत ही करवंद उपलब्ध असतात. म्हणूनच करवंदांना ‘डोंगरची काळी मैना’ म्हणतात. काळीभोर करवंद पाहिल्यावर कोकणातील सर्वांनाच बालपण आठवल्याशिवाय राहात नाही. शालेय जीवनात करवंदांच्या झाळीतून ओरबडून काढलेली कच्ची करवंदच मालवणीत ज्याला ‘खिरमाट’ म्हणतात. ते ज्यांने खाल्ल असेल निश्चितच त्याने स्वर्गसुख अनुभवले असे म्हणायला हरकत नाही. जांभूळ पूर्ण पिकल्याशिवाय जांभूळ खाण्याचा आनंद घेता येत नाही. जांभूळ खाल्यावर कोणीही ओळखावं की जांभूळ खाल्लं आहे. ते जांभूळ आपल्या रंगाचा गुणधर्म खाणाऱ्याच्या मुखात सोडून जातो. कोकणातील ही फळं खाण्याच सुख, आनंद हा फार वेगळा आहे.

कोकणच्या बाबतीत एक गोष्ट सत्य आहे. सर्व काही आहे; परंतु ‘असून काहीच नसल्यासारखी आपली स्थिती आहे’. त्याचं प्रमुख कारण जांभूळ, करवंद यावर प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे; परंतु दुर्दैवाने एका ठरावीक मर्यादेपलीकडे आपली धाव जात नाही. नवीन काही करण्याची, स्वीकारण्याची आपली मानसिकता नाही. छोट्या, मध्यम उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन, सहाय्य करणारी शासकीय यंत्रणा कोकणात उभी आहे. या यंत्रणेचा लाभ आपण उठवला पाहिजे. आंबा, काजू उत्पादक शेतकरी आंबा, काजू प्रक्रिया उद्योगातही येण्याची आवश्यकता आहे. आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंद यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचं जाळं तयार होईल. तेव्हाच कोकणातील या फळांच्या उत्पादनातून शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊ शकेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -