चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे स्पष्टीकरण
चेन्नई (वृत्तसंस्था) : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव झाला. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फटकेबाजी केली. परंतु तरही चेन्नईच्या पदरी निराशाच पडली. या सामन्यानंतर चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या दुखापतीबाबत खुलासा केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनीच्या धावण्याच्या क्षमतेवर परिणाम आल्याचे फ्लेमिंग यांचे म्हणणे आहे.
पुढे फ्लेमिंग म्हणाले की, धोनीला गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागत आहे. या दुखापतीमुळे त्याच्या धावण्याच्या क्षमतेवर परिणाम दिसून येत आहे. विकेट्स दरम्यान धावण्यात त्याला अडथळे येत आहेत. याच कारणामुळे धोनी बुधवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पूर्ण क्षमतेने धावा काढू शकला नव्हता. धोनी आयपीएल सुरू होणापूर्वी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त दिसून आला आहे. चेन्नईतील प्री-सीझन कॅम्पमध्ये धोनी गुडघ्यावर पट्टी बांधलेला दिसला होता.
दरम्यान, फ्लेमिंग यांनी धोनीबाबत विश्वास व्यक्त करत सांगितले की, ”चेन्नई संघाचा कर्णधार त्याच्या दुखापतीचा सामना करेल आणि संघाचे नेतृत्व करत राहील. तो सामन्यात फॉर्ममध्ये परतण्यासाठी काम करतोय आणि तो चांगला खेळत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे तो स्वत:ला सांभाळून योग्य व्यवस्थापन करतो याबद्दल आम्हाला नेहमीच आत्मविश्वास आहे.
सिसांडा मगालाच्या बोटाला दुखापत
दुखापतींचे ग्रहण चेन्नईची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनचा झेल घेताना सिसांडा मगालाच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे तो पुढील दोन आठवड्यांसाठी बाहेर असेल. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही या बातमीला पुष्टी दिली आहे. फ्लेमिंग म्हणाले की, मगालाच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि तो पुढील दोन आठवड्यांसाठी बाहेर असेल.
पत्रकार परिषदेदरम्यान स्टीफन फ्लेमिंग यांनी सीएसकेच्या इतर खेळाडूंबद्दल अपडेट देखील दिली. ते म्हणाले की, बेन स्टोक्सवर लक्ष ठेवले जात आहे. तो लवकरच सीएसकेकडून खेळण्यासाठी उपलब्ध होईल. दीपक चहर काही आठवडे मैदानाबाहेर राहणार आहेत. पुढील सामन्यासाठी ११व्या क्रमांकावर असलेल्या सिसांडा मगालाच्या जागी श्रीलंकेचा मथिशा पाथिराना खेळण्याची शक्यता आहे.