
मुंबई: भारताच्या सार्वभौमत्वाचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील अशोकस्तंभाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामजिक न्याय (राज्य) मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार चंद्रकांत हांडोरे, विश्वभूषण भारतरत्न प्रतिष्ठानचे सुनील रामराजे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही आंबेडकरी अनुयायांसाठी श्रध्देचे ठिकाण आहे. देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेल्या दादरच्या चैत्यभूमी येथे उभारण्यात आलेल्या अशोकस्तंभाप्रमाणे, चेंबूरच्या डॉ. आंबेडकर उद्यान समोर देखील अशोकस्तंभ उभारावा, अशी स्थानिकांची आणि आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. यानुसार सुमारे २००८ साली याठिकाणी अशोकस्तंभ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काही कारणास्तव मागील १३ वर्षे हे काम रखडले. मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करून अखेर हे काम पूर्णत्वास नेले होते. त्याचे अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले .