मोहालीत होणार टक्कर
- ठिकाण : आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली
- वेळ : संध्याकाळी ७.३० वाजता
मोहाली (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामात आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकलेल्या पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर गुरुवारी लढत होणार आहे. दोन्ही सामने तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघ मागील सामना पराभूत झाले असून विजयी मार्गावर परतण्यासाठी जीवतोड खेळतील यात शंकाच नाही.
रिंकू सिंगच्या संस्मरणीय खेळीमुळे गत सामन्यात गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात पराभवाला सामोरे जावे लागले, तर पंजाब किंग्ज संघ सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर कोसळला. पंजाब किंग्ज संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे ते गुरुवारचा सामना आपल्या होम पिचवर खेळणार आहेत. घरच्या मैदानाचा आणि प्रेक्षकांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न ते करतील. तसेच याच मोहालीच्या मैदानावर यंदा पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी (डीएलएस पद्धतीने) पराभव केला होता. त्या सामन्यात पीबीकेएसने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भानुका राजपक्षे आणि शिखर धवन यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. अर्शदीप सिंगने (३ षटकांत ३/१९) अप्रतिम गोलंदाजी केली होती. तर सॅम करन, नॅथन एलिस, राहुल चहर आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
दुसरीकडे, गुजरात टायटन्ससाठी, त्यांचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या पुनरागमन करेल, ज्यामुळे गत सामन्यात संघात राहिलेल्या उणिवा दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. राशीद खानने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. कर्णधार म्हणून त्याला आयपीएलमध्ये प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले होते. अहमदाबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला ३ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात केकेआरने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला असला तरी दोन्ही संघांसह आयपीएल चाहत्यांसाठी हा सामना नेहमीच संस्मरणीय असेल. कारण या सामन्यात कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंगने २०व्या षटकातील शेवटच्या ५ चेंडूंत सलग ५ षटकार ठोकत संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून जवळपास हरलेला सामना जिंकून दिला होता.
गुरुवारच्या सामन्यात सर्वांच्या नजरा पंजाब किंग्जचा सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवन आणि मुख्य वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यावर असतील. कारण दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, आयपीएल २०२३च्या लिलावात सर्वात महागडा अष्टपैलू सॅम करन देखील फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष असेल. प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मासारख्या काही युवा फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच अपेक्षा असेल.
मैदानाचा अंदाज घेता येथे उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. गत सामने पराभूत झाल्यानंतर हा सामना जिंकून पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.