
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले नाणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने १९९० मध्ये चलनात आणले होते. मात्र २३ वर्षानंतर सदर नाणे आज चलनातून गायब झाले असल्यामुळे पुन्हा ते नाणे बाजारात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता आंबेडकरी जनतेमधून केली जात आहे.
भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ. बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त १९९० मध्ये भारत सरकारने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने या निमित्ताने १९९० साली काढलेले ते एक रुपयांचे नाणे आता बाजारातून गायब झाले आहे.
डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त काढलेले ते एक रुपयाचे नाणे बाजारात आले तेव्हा, कवी राजानंद गडपायले यांचे रुपया बंदा निगाला यंदा, नव्या जमान्यात भीमराव माझा बघून घ्यावा आणि मन माझं गेलय आनंदून, माझा भीम यात पाहून, हे नाणं दिसतंया शोभून, बाबा साहेबांच्या फोटून... अशी अनेक गीतं संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वत्र प्रचंड गाजली.
घराघरात ही गाणी आजही वाजतात. अनेकांच्या ओठावर हे गाणे सहज येऊ लागल्याने याचा जोरदार प्रचार झाला. अनेकांना नाण्याविषयी उत्सुकता लागली आणि डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति असलेली श्रद्धा म्हणून आंबेडकर अनुयायांनी हे चलनी नाणे संग्रही ठेवले. अनेकांनी त्याची फोटो फ्रेम करून देव्हाऱ्यात ठेवल्याने हे नाणे बाजारात गेले नाही. त्यामुळे हे चलनी नाणे बाजारात दिसेनासे झाले.
त्यामुळे पुन्हा यांची निर्मिती करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक रुपयाचे नाणे बाजारात उपलब्ध करून घ्यावेत, अशी मागणी आंबेडकरी जनतेतून केली जात आहे.