Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती...आणि चित्तशुद्धी जाहली

…आणि चित्तशुद्धी जाहली

  • महिमा गजाननाचा: प्रवीण पांडे, अकोला

एक दिवस फिरत फिरत महाराज गावाच्या उत्तर दिशेला एक मळा होता, त्या मळ्यात एक शिवाचं मंदिर होतं, त्या ठिकाणी सावलीत येऊन बसले. हा मळा कृष्णाजी पाटलांचा होता. हे कृष्णाजी पाटील म्हणजे खंडूजी पाटील यांचे सगळ्यात लहान बंधू होते.

श्री महाराज कृष्णाजी पटलास म्हणाले, मी तुझ्या मळ्यात काही दिवस शंकरा सन्निध राहावयास आलो आहे. हा सर्व देवांचा राज राजेश्वर आहे. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा. तरी मला सावली करून दे. महाराजांचे एवढे वाक्य ऐकले मात्र आणि लगेच कृष्णाजी पाटलांनी सहा पत्रे आणविली आणि तत्काळ ओट्यावर छप्पर तयार करून दिले आणि समर्थ त्या मळ्यात राहू लागले. याचे सुंदर वर्णन खालील ओव्यांतून समजते.

गावाच्या उत्तरेला।
एक मळा सानिध्याला।
या मळ्यात भाजीपाला।
होत असे बहुवस ।। ८५।।
एक शिवाचे मंदिर।
तेथे होते साचार।
लिंबू तरूंची थंडगार।
छाया होती ते ठायी ।। ८६।।
समर्थ म्हणाले कृष्णाजीसी।
मी आलो तुझ्या मळ्यासी ।।
काही दिवस राहावयासी ।
या श्री शंकरा सन्निध ।। ८७।।
त्या मळ्यात महाराज आले ।
शिवालया सन्निध बसले।
एका ओट्यावरी भले ।
निंब तरूच्या छायेत ।
हा भोलानाथ कर्पूरगौर ।
नीलकंठ पार्वतीवर ।
हा राजे राजेश्वर ।
आहे अवघ्या देवांचा ।।९०।।
तो तुझ्या मळ्यात रमला।
म्हणून मीही विचार केला ।
येथे येण्याचा तो भला ।
दे साऊली करून ।। ९१।।
ते वाक्य ऐकीले ।
सहा पत्रे आणविले ।
ओट्यावरी छप्पर केले ।
कृष्णाजीने तत्काळ ।।९२।।
समर्थांनी वास केला।
म्हणून मळा क्षेत्र झाला।
राजा जाय जया स्थला।
तीच होती राजधानी।।९३।।

या मळ्यात महाराजांसोबत त्यांचे दोन निस्सीम भक्त भास्कर पाटील तसेच तुकाराम कोकाटे हे सेवाव्रती होते. राहण्याची आणि भोजन इत्यादी व्यवस्था कृष्णाजी पाटील स्वतः करत असत आणि बघा भक्ती कशी, श्री महाराजांचे जेवण झाल्यावरच कृष्णाजी पाटील जेवत असतं.

एकदा त्या मळ्यात दहा-वीस गोसावी आले. त्यांना महाराजांच्या येथील वास्तव्याबद्दल माहिती मिळाली होती. ते त्या ठिकाणी, राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था होईल म्हणून मळ्यात आले व कृष्णजी पाटील यांना सांगू लागले आम्ही तीर्थाटन करण्याकरिता निघालेले वैरागी गोसावी आहोत. गंगोत्री, जमनोत्री, हिंग्लज, गिरनार, डाकोर अशी अनेक क्षेत्रे पायी फिरून पहिली आहेत. आता भागीरथी घेऊन रामेश्वर येथे जात आहोत. आम्ही ब्रह्मगिरी महाराजांचे शिष्य आहोत. आमचे महाराज देखील सांप्रत आमच्याबरोबरच आहेत. तरी तुम्ही आम्हास शिरापुरीचे अयाचीत द्यावे. आम्ही तीन दिवस येथे राहू आणि चौथ्या दिवशी येथून निघून जाऊ. ही पर्वणी तुम्ही साधून घ्या. त्यावर कृष्णाजी त्यांना म्हणाले, शिरापुरी मी उद्या देईन. आज भाकरी आहेत, त्या घेऊन जाव्या. गोसावी म्हणाले, ‘आम्ही अवघा वेदांत जाणतो. तुमची मर्जी असेल, तर मळ्यात पोथी ऐकावयास या.’ दुपारच्या वेळी ते गोसावी विहिरीवर भोजनाकरिता बसले. छपरामध्ये समर्थांच्या समोर त्यांनी आपापली आसने लावली. त्यांचा जो ब्रह्मगिरी महंत होता, त्याने सायंकाळी भागवत गीतेचे वाचन
सुरू केले.

सर्व गोसावी पोथी ऐकण्यास बसले. गावतून देखील काही मंडळी पोथी ऐकण्यासआली होती. ब्रह्मगिरीने ‘नैनं छीदंती पावक’ हा श्लोक निरूपण करण्याकरिता घेतला होता. ब्रह्मगिरी हा पक्का दांभिक होता. त्यास अनुभवाचा लेश ही नव्हता असे वर्णन दासगणू महाराजांनी केले आहे. असो, या ब्रह्मगिरी गोसाव्याने निरूपण केले. ते काही गावकऱ्यांना पटले नाही. ते सर्व श्री महाराजांसमोर संतांचे दर्शन घेण्याकरता येऊन बसले.

लोक म्हणू लागले निरूपणाचा भाग छापरामध्ये ऐकला. स्वानुभवाचा पुरुष छपरात बसला आहे. तेथे इतिहास ऐकला. येथे प्रत्यक्ष पुरुष पहिला. हे बोलणे ऐकून गोसाव्यांस राग आला. ते सर्व गोसावी गांजा पिण्याकरिता बसले. चीलिमीत गांजा भरून पिणे सुरू झाले. श्री महाराज पलंगावर बसून होते. भास्कर महाराज मधून मधून चिलीम भरून महाराजांना देत होते. त्या चीलिमीच्या विस्तावाची ठिणगी महाराज ज्या पलंगावर बसले होते, त्यावर पडली. ती पडतांना कोणाच्याही नजरेस पडली नाही. काही वेळानंतर धूर निघू लागला व सागाची लाकडे असल्यामुळे त्या पलांगाने चहू बाजूंनी पेट घेतला. भास्कर महाराज महाराजांना म्हणाले, ‘महाराज पलंग शीघ्र सोडा. आता खाली उतरा. ही लाकडे सागाची आहेत. ती पाण्यावाचून विझावयाची नाहीत.’ त्यावर महाराज म्हणाले भास्करा अग्नी विझविण्याचे तुला कारण नाही. जल मुळीच आणू नकोस. महाराज ब्रह्मगिरी गोसाव्यास बोलले, ‘अहो ब्रह्मगिरी महाराज, आपणास भगवद् गीता संपूर्ण अवगत आहे. त्याच्या परीक्षेची वेळ हरिने तत्काळ आणली आहे. ब्रह्मा न जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा.’ भास्करास महाराज म्हणाले, ‘भास्करा लवकर जा आणि ब्रह्मगिरीचा हात धरून अत्यादराने त्यांना आणून पलंगावर बसव.’

अशी महाराजांची आज्ञा होताच भास्कर महाराजांनी ब्रह्मगिरीचा उजवा हात धरून त्याला महाराजांसमोर आणून उभा केला. भास्कर महाराज हे देहाने धिप्पाड होते. त्यामुळे त्यांच्यासमोर गोसाव्याचे काहीच चालू शकले नाही. या वेळात पलंग चौफेर पेटून ज्वाला निघू लागल्या होत्या. पण महाराज त्या जळत्या पलंगावर स्थिर बसले होते. ते जरादेखील हलले नाहीत. या ठिकाणी दासगणू महाराजांनी प्रल्हादास हिरण्यकश्यपूने अग्नीत उभे केले होते त्याचे वर्णन केले आहे :

प्रल्हाद कयाधूसुत।
उभा केला अग्नीत।
हे लिहिले पुराणात।
व्यासांनी भागवती।।३२।।

ब्रह्मगिरी भास्कर महाराजांना म्हणू लागला, मला पलांगापाशी नेऊ नका. मी महाराजांच्या अधिकारास जाणू शकलो नाही. पण भास्कर महाराजांनी हे काही ऐकले नाही. ब्रह्मगिरी गोसाव्यास ओढत आणून महाराजांसमोर आणून उभे केले. महाराज ब्रह्मगिरीस म्हणाले, ‘नैनं दहती पावक’ हे वाक्य खरे करून दाखवा. ऐसे महाराजांनी म्हणताच गोसावी कमालीचा घाबरला आणि महाराजांना भीत भीत बोलला, मी पोटभऱ्या संत आहे. शिरापुरी खाण्याकरिता गोसावी झालो. हे शांतिधामा माझ्या अपराधाची क्षमा करा. मी तुम्हाला पिसा म्हणालो, आता पस्तावा पावलो. आताई दाती तृण धरून आपणास शरण आलो आहे. मला आपण अभय द्यावे. शेगावच्या लोकांनी श्री महाराजांना विनंती केली:

शेगावच्या जनांनी।
केली समर्था विनवणी।
आपणा अग्नीपासूनी।
भय नाही हे खरे।
तरी महाराज आमच्याकरिता।
खाली यावे लवकर आता।
अशा स्थितीत पाहता।
तुम्हा! आम्हा धडकी भरे।। ४९।।

या लोक विनंतीस मान देण्याकरिता महाराज पलंगावरून खाली उतरले. तसा तो पलंग कोसळून पडला. तो पलंग जवळपास सर्वच जळला होता. त्याचा जो काही भाग शेस उरला होता तो इतरांना साक्ष दाखविण्या करिता लोकांनी विझविला. अजून देखील तो जळालेला पलंगाचा भाग मंदिरात (मळ्यात) या प्रसंगाची साक्ष देतो.

ब्रह्मगिरीने महाराजांना नमस्कार केला. त्याचा अभिमान या प्रसंगाने तर संपूर्णपणे गळून पडला होता. महाराजांच्या कृपा स्पर्शाने त्याची चित्तशुद्धी झाली. मग मध्यरात्री महाराजांनी ब्रह्मगिरीला बोध केला :

मग मध्यरात्रीच्या समयाला ।
ब्रह्मगिरीस बोध केला ।
आजपासून चेष्टेला।
तू या सोडून देई रे।।४६।।
ज्यांनी राख लावावी ।
त्यांनी उपाधी दूर ठेवावी ।
अनुभवावीण न सांगावी ।
गोष्ट कोण निरर्थक ।। ४७।।

माऊली अतिशय कनवाळू आहेत. एवढे ब्रह्मगिरीने वागून, बोलून अपमानित करून देखील श्री गजानन महाराजांनी त्याच्यावर देखील कृपा करून बोध दिला व सन्मार्ग दाखवला.
श्री महाराजांचा असा बोध ऐकून काय झाले पाहा :

ऐसा बोध ऐकला।
ब्रह्मगिरी विरक्त झाला ।
प्रात:काळीच उठोन गेला।
कोणा न भेटता शिष्यांसह ।। ५३।।

(क्रमशः)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -