दिल्ली (वृत्तसंस्था) : रोहित शर्मा, इशान किशन आणि तिलक वर्मा या तिकडीला सूर गवसल्याने आवाक्यात आलेल्या विजयाला ग्रीनच्या निर्णायक खेळीने अखेरच्या चंेडूवर मुंबई इंडियन्सला रोमांचक विजय मिळवून दिला. अखेर तिसऱ्या सामन्यात मुंबईने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. गोलंदाजीत पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईला ७१ धावांची भागीदारी केली. इशान किशन धावबाद झाला आणि मुंबईची सलामीवीर जोडी फुटली. त्यानंतर तिलक वर्माने रोहितला छान साथ देत मुंबईला विजयासमीप आणून ठेवले. परंतु तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे पाठोपाठ बाद झाल्यामुळे सामन्याने वळण घेतले. सामना पुन्हा रोमांचक स्थितीत आला. रोहित शर्माने संघातर्फे सर्वाधिक ६५ धावांचे योगदान दिले. इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अनुक्रमे ३१ आणि ४१ धावांची जोड दिली.
मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांना सूर गवसल्याने मुंबईने या सामन्यात बाजी मारली. निर्णायक षटकांमध्ये कॅमेरॉन ग्रीन आणि टीम डेविड यांनी अप्रतिम फलंदाजी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी अखेरच्या चेंडूवर दोन धावा पळून काढत मुंबईला हंगामातील पहिलावहिला विजय मिळवून दिला. मुंबईने ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयील लक्ष्य गाठले. दिल्लीच्या मुकेश कुमारला धावा रोखता आल्या नसल्या तरी त्याने २ बळी मिळवले.
दिल्लीची चौथ्या षटकातच पहिली विकेट पडली. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ १५ धावांवर बाद झाला. शोकिनने त्याची विकेट घेतली. नंतर वॉर्नरने मनीष पांडेसह डाव पुढे नेला. मनीष पांडेने २६ धावा करून साथ सोडली. पीयूष चावलाने त्याची विकेट घेतली. डेविड वॉर्नर एका बाजूने धावा जमवत होता, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ
मिळालीच नाही.
यश धूल, पॉवेल आणि ललित यादव हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. यश धूलला रिले मेरेडिथने माघारी पाठवले. त्यानंतर पीयूष चावलाने पॉवेल आणि ललित यादवला बाद केल्याने दिल्लीचा डाव अडचणीत सापडला. त्यानंतर वॉर्नरने अक्षर पडेलसह संघाची धावसंख्या पुढे नेली. अक्षरने २२ चेंडूंत अर्धशतक ठोकले. त्याने २५ चेंडूंत ५४ धावा तडकावल्या. वॉर्नर आणि अक्षरच्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे दिल्लीने १७२ ही सन्मानजनक धावसंख्या उभारली. दिल्लीचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद झाला. मुंबईच्या पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी ३ विकेट मिळवले. पीयूष चावलाने ४ षटकांत २२ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. तर जेसन बेहरेनडॉर्फने ३ षटकांत २३ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले. रिले मेरेडिथने २ विकेट मिळवल्या.