Wednesday, May 7, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार जवान शहिद

भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार जवान शहिद

सर्च ऑपरेशन सुरू


जयपूर : पंजाबच्या भटिंडा मिलिट्री स्टेशन मध्ये आज पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतू भटिंडा मिलिट्री स्टेशन वरील हा प्रकार दहशतवादी हल्ला नाही त्यामुळे यावरून कोणत्याही अफवा पसरवल्या जात असतील तर त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


खबरदारीचा उपाय म्हणून कॅम्प परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.


आर्मी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच ४.३५च्या सुमारास क्विक रिअ‍ॅक्शन टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. त्यानंतर भटिंडा मिलिट्री स्टेशन सील करण्यात आले. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. सध्या या भागाला छावणीचे स्वरूप आले आहे.





सैन्याकडून पंजाब पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नाही. फायरिंग ८० मीडियम रेजीमेंट आर्टिलरी ऑफिसर्स मेसमध्ये झाली आहे. काही दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या खोलीतून एक असॉल्ट रायफल गायब झाली होती. त्याच रायफलने फायरिंग झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्याचा तपास सुरू आहे.


भटिंडा मिलिट्री कॅम्प हा देशातील सर्वात मोठा लष्कराचा तळ म्हणून ओळखला जातो. हे स्टेशन जयपूरच्या दक्षिण पश्चिम कमांडच्या अधिकार क्षेत्राखाली येते. चंदीगड-फजिलका हायवेच्या शेजारी असलेल्या या कॅम्पला सध्या सील करण्यात आले आहे. आता हा हल्ला कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला आहे याची तपासणी सुरू आहे.


दरम्यान, अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर संध्याकाळपर्यंत घटनेबाबत अधिक तपशील जारी केला जाईल. या घटनेबाबत लष्कराने आधीच आपली भूमिका मांडली आहे, यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. असे लेफ्टनंट कर्नल अमिताभ, पीआरओ दक्षिण पश्चिम कमांड जयपूर यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment