-
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
आपल्यामधील वादाचा अथवा मतभेदाचा विषय जो आहे फक्त त्यावरच चर्चा होऊन त्यावर सकारात्मक उपाययोजना काढणे, ते शक्य नसल्यास तो वाद बाजूला ठेवून त्या व्यक्तीशी असलेली इतर कामे, इतर संबंध, इतर संवाद अतिशय व्यवस्थित सुरू ठेवणे, इतर काहीही त्या ऐका मतभेदामुळे अथवा वादाच्या विषयामुळे बिघडू न देणे अशी विचारसरणी प्रत्येकाने अंगीकरणे अत्यंत आवश्यक आहे.
माणूस म्हटलं की वादविवाद, मतभेद, ऊहापोह, मनस्ताप, संताप, त्रागा, अहंकार हे आलेच. कोणत्याही दोन व्यक्ती अथवा समूह ते कोणत्याही नात्यातील असोत, कोणत्याही वयोगटातील असोत आणि कोणत्याही कारणास्तव त्यांच्यात संभाषण असो, विषय भरकटत जाणे, एका वादामधून दुसरा वाद, एका गैरसमजामधून दुसरा गैरसमज लांबतच जातो. एका विषयावर एकमेकांबद्दल असलेला राग किंवा एखाद्या मुद्द्यावर मतभेद आहेत पण त्याचा सगळ्याच विषयावर परिणाम करून, सगळंच एकत्र करून सर्वच बाबतीत आपला दृष्टिकोन चुकीचा ठेवून आपणच आपली चांगली परिस्थिथी, चांगली नाती, जवळची चांगली माणसं, हितसंबंध, चांगले चाललेले आयुष्य बिघडवून टाकत असतो हे आपल्या ध्यानी-मनी नसते.
प्रत्येकाला कुठे न कुठे दुसऱ्याचे काहीतरी आवडत नसते स्वभाव असेल, वागणूक असेल, निर्णय असतील अथवा सवयी असतील त्यात तफावत असतेच. कारण प्रत्येकजण वेगळा असतो. खूप ठिकाणी असं लक्षात येतं की लोकं मनात अढी धरून बसण्यात खूप पटाईत असतात. कोणाशी एका मुद्द्यावरून भांडण असेल तरी त्याला सर्वच बाबतीत शत्रू किंवा दुश्मन समजून वागवतात. आयुष्यभर त्याच्याशी अबोला धरणे, त्याचा तिरस्कार करत राहणे, त्याच्या बाबतीत सगळाच चुकीचा विचार करणे अशा वागणुकीमुळे माणसं दुरावतात, त्यांच्यापासून मिळणारे इतर सहकार्य, इतर काही मदत, मार्गदर्शन, सहाय्य, त्यांचे इतर चांगले विचार, त्यांच्याकडून शिकण्यासारख्या इतर काही गोष्टी या पण आपण अशा स्वभावामुळे दूर करतो.
आपल्याला आयुष्यात हेच समजणे आणि हेच जमणे खूप महत्त्वाचे आहे की, घरातील सर्व वस्तू जशा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित रचना करून ठेवतो आणि तसं केलं नाही तर घरात पसारा होतो आणि कोणतीच वस्तू वेळेवर कामी येत नाही, सापडत नाही. आपल्या मनातील, डोक्यातील प्रत्येकाबाबतचे विचार, अनुभव, मत पण आपल्याला स्वतंत्र ठेवून त्यानुसार वागता आले पाहिजे. घरातील सामानात जसा पसारा झाल्यावर त्रास होतो तसाच त्रास मनातील डोक्यातील सर्व चुकीच्या भावना, नकारात्मक विचार एकत्र केल्यावर होतो. एखाद्याचे चांगले अनुभव, चांगली वागणूक, त्याच्या व्यक्तिमत्त्वामधील योग्य पैलू याचा साठा वेगळा ठेवावा. त्याच व्यक्तीशी काही बिनसलं, खटकलं तर ती कटुता, तो वाईटपणा, तो गैरसमज या चांगुलपणाच्या साठ्यात अजिबात एकत्र करू नये.कोणतीही व्यक्ती पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर कधीच नसते. पण आपण त्याला किंवा त्याच्या कृतीला चूक आणि बरोबर ही दोनच संबोधनं देऊन मोकळे होतो. चूक आणि बरोबरच्या मध्ये खरं आणि खोटं यांच्यामध्ये खूप मोठे अंतर असते. कोणतंही नातं, ओळख, संबंध टिकवताना ऐका व्यक्तीत दहापैकी नऊ चुकीच्या गोष्टी जरी असतील तरी त्यातील एक सकारात्मक गोष्ट पाहणे, त्या अानुषंगाने त्याच्याशी वागणे याला आयुष्य समजणं आणि जगता येणं असं म्हणता येईल. एखाद्या चुकीच्या गोष्टीवरून, सवयीवरून कोणालाही पार शून्य आणि वाईटात वाईट जाहीर न करता त्या व्यक्तीबाबत, त्याच्याशी आपल्या वागणुकीबद्दल, आपल्या बुद्धी आणि मनाचा ताळमेळ आपल्याला घालता येणे आवश्यक असते.
आपल्या संपर्कात अनेक व्यक्ती असतात, असंख्य लोकांशी आपला संबंध येत असतो. जर प्रत्येक व्यक्तीशी असलेला एक एक मतभेद, एक एक वाईट विचार आपण ताणून धरला तर आपल्याच मनात आणि डोक्यात किती नकारात्मक कचरा जमा होईल आणि त्याचा आपल्याला स्वतःला किती त्रास होईल याची जाणीव आपल्याला असणे आवश्यक आहे. आपल्या संपर्कातील प्रत्येकाच्या फक्त चुका, चुकीचे अनुभव हेच आपण संग्रही ठेवले तर त्याचा परिणाम आपल्या मनात सगळ्यांबद्दलच्या फक्त चुकाच साठवल्या जातील. आपल्याला स्वतःला फक्त लोकांच्या चुकांचं ओझं बाळगत बसावं लागेल, तेच लक्षात ठेवावं लागेल.उलटपक्षी सर्व लोकांचे फक्त चांगले गुण, चांगली वागणूक, हसून-खेळून राहण्याचे प्रसंग, सकारात्मक संभाषण, चांगले विचार, प्रत्येकातील एक जरी चांगली गोष्ट आपण मनात आणि डोक्यात साठवली तर आपण किती चांगल्या गोष्टींचा साठा आपल्याकडे करू शकतो आणि त्यातून आपल्याला किती चांगली ऊर्जा मिळू शकते, आपला स्वभाव किती निर्मळ होऊ शकतो, आपण किती आनंदी राहू शकतो यावर विचार करणे अपेक्षित आहे.
आपल्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने जर आपल्याबद्दल फक्त चुकीचं वागणंच लक्षात ठेवायचे ठरवले आणि आपल्याला त्यांच्याकडून तसाच प्रतिसाद मिळत गेला तर आपण एकटे पडणार, एकाकी होणार हे निश्चित. चूक- बरोबर, चांगलं-वाईट, खरं-खोटं, तुझं-माझं याही पलीकडे विचारांची कक्षा खूप मोठ्या प्रमाणात रुंदावणे, उथळ, वैचारिक पातळी सोडून अतिशय अचूक विश्लेषण करता येणे आपल्याला आवश्यक आहे. हे जर आपल्याला जमत नसेल तर किमान चुकीचे वागणे आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे.
आपले कोणाशीही कितीही मतभेद असतील, वाद असतील, एखादी व्यक्ती कितीही आपल्या मनाविरुद्ध वागत असेल, आपल्याला रागवायला, चिडायला, संतापायला भाग पाडत असेल तरीही आपण त्यातून किती घ्यायचे, काय घ्यायचे हे आपल्या हातात असते.
आपल्या मनात, डोक्यात, स्मरणात ठरावीक चांगल्या गोष्टीनाच जागा असणे आवश्यक आहे. जसं कपडे, अन्नपदार्थ, वापरायची कोणतीही वस्तू घेताना आपण निवडून चांगलीच वस्तू घेतो, तसेच कोणाबद्दल, कोणाकडून काहीही घेताना चांगलंच घेणं, चांगलंच लक्षात ठेवणं, वाईट घटना त्याच ठिकाणी विसरून अंतरमन तिथेच साफ करणं, डोक्यातील राग, द्वेष, मत्सर ताबडतोब त्यागून देणं आपल्याला जमवाव लागेल. आपल्याला कोणी अपशब्द बोललं, आपली निंदा केली तरीही ते आपण घेतलंच नाही, प्रतिक्रिया दिलीच नाही तर ते तसंच देणाऱ्याकडे परत जात हा सिद्धांत आपण अमलात आणावा.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी जसं आपण शरीर स्वच्छ ठेवतो, आपल्या घरातील कचरा, आजूबाजूचा परिसर वेळोवेळी साफ करतो, आपल्या उपयोगी वस्तू आपण साफ करतो, त्या योग्य जागेवर ठेवतो, स्वच्छ ठेवतो तसंच आपलं मन, बुद्धी, विचार ज्यावर आपलं व्यक्तिमत्त्व अवलंबून आहे, आपली मानसिकता अवलंबून आहे, आरोग्य अवलंबून आहे ते पण योग्य दिशेने योग्य पद्धतीने जात आहेत का? हे वेळच्या वेळी ओळखणं, तपासणं त्याप्रमाणे निरुपयोगी चुकीचे विचार, चुकीच्या गोष्टी बाहेर काढून साफ करणे आवश्यक आहे. आपल्याला हवी असलेली मनःशांती, सुदृढ वैचारिक जीवनशैली, निकोप मानसिकता ही फक्त इतरांचे दोष, आवगून, वादविवाद, क्लेश, मतभेद हे विसरूनच मिळू शकते. आपल्याकडे असलेली स्मरणशक्ती ही दैवी शक्ती असून तिचा वापर फक्त इतरांच्या चांगल्या गोष्टी, इतरांचे गुण, चांगुलपणा हेच स्मरणात ठेवण्यासाठी करणे आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे.