Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाIPL 2025राजस्थानविरुद्ध चेन्नई मारणार आज बाजी?

राजस्थानविरुद्ध चेन्नई मारणार आज बाजी?

धोनी विरुद्ध सॅमसन मध्ये कोण ठरणार वरचढ?

  • वेळ : संध्या. ७.३० वा.
  • ठिकाण : एम. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक

चेन्नई : चेन्नईतील चेपॉक येथील एम. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये बुधवारी सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमात चेन्नईचा घरच्या मैदानावरील हा दुसरा सामना आहे. चेपॉक स्टेडियमवरील लखनऊ विरुद्धच्या मागील सामन्यात चेन्नईचा विजय झाला होता. या हंगामात रॉयल्स व सुपर किंग्ज या संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईचा महेंद्रसिंह धोनी आणि राजस्थानचा संजू सॅमसन अशा दोन यष्टीरक्षक कर्णधारांमधील ही लढाई आहे.

चेन्नईने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्स राखून पराभव केला. रवींद्र जडेजाने चार षटकांत २० धावा देत तीन बळी घेतले होते, तर अजिंक्य रहाणेने चेन्नई सुपर किंग्ज संघातील आपला पदार्पणाचा सामना खेळताना फक्त २७ चेंडूंत तब्बल ६१ धावा कुटल्या. या खेळीने त्याने राजस्थान विरुद्ध आपली जागा पक्की केली आहे.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी फलंदाजीचा आणखी एक मास्टरक्लास दाखवला. आरआरकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या दोघांनीही धमाकेदार अर्धशतक झळकावले. फॉर्मात असलेले राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर बटलर आणि जयस्वाल हे चेन्नईचा गड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर सुपर किंग्जचा सामना करतील, तेव्हा त्यांना चेन्नईच्या फिरकीपटूंना सामोरे जाण्याचे आव्हान सोपे नसेल. रॉयल्सने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने त्यांच्या होम ग्राऊंड गुवाहाटीमध्ये खेळले आहेत, जेथे त्यांना पाटा खेळपट्टी मिळाली होती. शिवाय हैदराबादची खेळपट्टीही फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली होती. आता चेन्नईतील खेळपट्टी संथ गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल, असे चित्र आहे. अशा स्थितीत नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असेल. कारण या खेळपट्टीवर १७० किंवा १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे राजस्थानला सोपे जाणार नाही. विशेषत: जेव्हा समोर मोईन अली, रवींद्र जडेजा आणि मिचेल सँटनरसारखे गोलंदाज असतील. तिघांनीही आतापर्यंत तीन सामन्यांत ११ बळी घेतले असून त्यांचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट राहिला आहे. मोईनने दोन सामन्यांमध्ये ६.५० च्या सरासरीने गोलंदाजी केली, तर जडेजा आणि सँटनर यांनीदेखील प्रति षटकात सातपेक्षा कमी धावा दिल्या. फूड इन्फेक्शनमुळे मोईन शेवटचा सामना खेळू शकला नव्हता. पण आता तो सिसांडा मगालाच्या जागी परतणार आहे.

रॉयल्सच्या फिरकीपटूंनाही हलके घेता येणार नाही. तंदुरुस्त नसल्यास बेन स्टोक्सची जागा ड्वेन प्रिटोरियस घेऊ शकतो. शिवाय राजस्थानचा गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे हे घरचे मैदान आहे आणि युझवेंद्र चहलही जबर फार्मात असून सामना जिंकवणारा गोलंदाज आहे. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांसमोरही राजस्थानच्या गोलंदाजांचे तगडे आव्हान असणार आहे. रॉयल्सकडे कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरसारखे अव्वल फलंदाज आहेत. त्याचबरोबर ट्रेंट बोल्ट आणि जेसन होल्डर यांना गोलंदाजीचा अनुभव आहे. या सामन्यात सीएसके संघ मगाला, तिक्षणा किंवा पाथिराना यांच्या जागी एका गोलंदाजाला संधी देऊ शकतो, तर राजस्थान रॉयल्स जेसन होल्डरच्या जागी जो रूटला संधी देऊ शकतो.

चेन्नईला दीपक चहरची उणीव भासणार आहे. जो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. राजवर्धन हंगरगेकर आणि सिमरजीत सिंग यांच्यापैकी धोनी कोणाची निवड करतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने चेन्नईकडून पदार्पण करताना आपली योग्यता सिद्ध केली आहे. ऋतुराज गायकवाड सलामीवीर म्हणून सातत्याने चांगला खेळत आहे. दोन्ही संघांची फलंदाजी भक्कम आहे, त्यामुळे हा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -