चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्ज संघाला बॅन करा, अशी विचित्र मागणी चेन्नईच्या आमदाराने केली आहे. चेन्नईच्या संघात तामिळनाडू राज्यातील खेळाडूंचा समावेश नाही. चेन्नई संघ मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. पण राज्यातील खेळाडूच या संघात नाहीत. त्यामुळे या संघावर बंदी घायलायला हवी, अशी मागणी आमदार एसपी वेंकटेश्वरन यांनी केली आहे. एसपी वेंकटेश्वरन हे धर्मपुरी येथील आमदार आहेत.
एसपी वेंकटेश्वरन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सीएसके संघ जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधींचा नफा कमवत आहेत. तसेच या संघाला तामिळनाडूचा संघ म्हणून सर्वांसमोर आणले जात आहे. पण या संघात तामिळनाडूचे किती खेळाडू आहेत. तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहे, त्यांना संघात स्थान मिळत नाही. जर स्थानिकांना याचा फायदा होत नसेल तर यावर बंदी घालण्यात यावी.
एसपी वेंकटेश्वरन हे पट्टाली मक्कल काची या पक्षाचे आमदार आहे. पीएमके या पक्षाने २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर यश मिळवले होते. त्यामध्ये एसपी वेंकटेश्वरन यांचाही समावेश आहे.