कल्याण : डान्सबारच्या नादाला लागून पत्रकारानेच घरफोडी केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोशन जाधव असे या आरोपीचे नाव असून तो डोंबिवलीतील निळजे गाव येथे राहणारा आहे. या तरुणाने पत्रकारीतीचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. त्याच्याकडून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले असून ४७ तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन दोन घड्याळ असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहने परिसरात एका घरामध्ये अज्ञात आरोपीने दिवसा घरफोडी करुन सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच गेल्या महिनाभरात दिवसा घरफोडी आणि चोरीच्या घटना परिसरात सतत घडत होत्या, त्याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते.
परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक कौशल्याच्या आधारे प्राप्त माहितीनुसार गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ४८ तासात खडकपाडा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ८ एप्रिल रोजी शहाड, कल्याण पश्चिम परिसरात सापळा लावुन एका संशईत इसमास शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यात मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापुर परिसरात दिवसा घरफोडी चोरी केल्याचे त्याने सांगितले. तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असुन तो वॉचमन नसलेल्या इमारतीत एकटा घुसुन घरफोडी करत असे.
ही कामगिरी ही पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार कॅचे, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, व तपास पथकाचे अंमलदार सहाय्यक पोलिस निरिक्षिक मधुकर दाभाडे, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोहवा अशोक पवार, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, पोशि राहुल शिंदे, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील यांनी केली आहे.