सीसीटीव्ही फूटेज दिल्यानंतरही आरोपीला शोधण्यात पोलिसांना अपयश
मुरबाड : मुरबाड मधील सरळगाव-किन्हवली रोड येथील श्री कृष्ण हॉस्पिटलचे डॉक्टर रविशंकर हरीनाथ पाल यांच्या इर्टिका कारला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने परिसरात खळबळ उडाली असून डॉ. पाल व त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.
डॉ. रविशंकर पाल यांचे सरळगाव किन्हवली रोडवर श्री कृष्ण नावाचे हॉस्पिटल आहे. त्यांची पत्नी श्रद्धा रविशंकर पाल यांच्या नावावर मारुती कंपनीची इर्टिका गाडी असून नेहमीप्रमाणे सदरची गाडी हॉस्पिटलसमोर रोड लगत लावली होती. मात्र शनिवार, ८ एप्रिलच्या रात्री दोनच्या सुमारास अज्ञात इसमाने गाडीच्या बोनेटवर ज्वलनशील पदार्थ टाकून गाडीला आग लावली. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तेथील लोकांनी कशीबशी आग विझवली.
यानंतर डॉक्टर पाल यांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही पाहिले असता एक अज्ञात इसम गाडीला आग लावून पळाल्याचे दिसून आले. याप्रकरणी डॉक्टर पाल यांनी तात्काळ मुरबाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटने संदर्भात मुरबाड पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र घटना घडून आज तीन दिवस झाले तरीही आरोपी सापडत नसल्याने मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिशय दुर्दैवी घटना असून संबंधित घटना ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. सदर सीसीटीव्ही फुटेज मुरबाड पोलिसांकडे दिले आहे. त्यानुसार गुन्ह्याचा तपास मुरबाड पोलीस करत आहेत. परंतू पोलिसांना अजूनही गुन्हेगार सापडलेला नाही. हे जे दुर्दैवी कृत्य आज माझ्या गाडीसोबत झाले ते उद्या माझ्यासोबत, माझ्या कुटुंबासोबत तसेच रुग्णांसोबत घडू शकते. त्यामुळे मला खात्री आहे लवकरच मुरबाड पोलीस गुन्हेगाराला बेड्या घालून मला न्याय देतील – डॉ. रविशंकर पाल