नवी दिल्ली : यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे.
देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान ८३५ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं.
दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.