Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेत, पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्की घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे‌. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.‌ त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे या फळपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली.

वनकुटे ग्रामदैवत मंदिरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे‌. नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल.

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते‌.

दरम्यान, राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. कालच मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते, त्यांनी देखील तिथे झालेल्या अवकाळी पावसाची पाहणी केली आणि पंचनामे करणार असल्याचे सांगितले. विदर्भात अवकाळी पावसामुळे ७,४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -