रोहित, सूर्यकुमार, वॉर्नर यांच्या खेळीवर लक्ष
- वेळ : संध्या. ७.३० वाजता
- ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलच्या १६व्या हंगामातील १६व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकलेले नाहीत. दोन्ही संघ विजयाचा श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. त्यातील कोणता संघ पहिलावहिला विजय मिळवून गुणांचे खाते उघडतो याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
दिल्ली कॅपिटल्सने पराभवाची हॅटट्रिक करत यंदाच्या हंगामात आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे, तर मुंबई इंडियन्सलाही पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी गुण तालिकेतील आपले खाते उघडलेले नाही.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांत एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मुंबईचा आठ गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सात गडी राखून धूळ चारली. दिल्लीप्रमाणेच मुंबईचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही अपयशी ठरले आहे
कर्णधार रोहित व्यतिरिक्त संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा अशा प्रभावी नावांचा समावेश आहे. पण तिलक वर्मा (आरसीबीविरुद्ध नाबाद ८४ धावा) वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला गेल्या दोन सामन्यांत किमान ३५ धावांचा आकडाही गाठता आला नाही. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मुंबईची वेगवान गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. भरवशाचा जोफ्रा आर्चर लयीत दिसत नाही. गत सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ, अष्टपैलू ग्रीन, आर्चर आणि अर्शद खान हे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना अडचणीत आणू शकले नाहीत, तर पीयूष चावला, हृतिक शौकीन आणि कुमार कार्तिकेय यांनाही फिरकी विभागात विकेट मिळविण्यासाठी झगडावे लागते आहे. मुंबईला पुनरागमन करायचे असेल, तर कर्णधार रोहित आणि इशान या सलामीच्या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू ग्रीन यांनाही त्यांच्या प्रतिष्ठेनुसार कामगिरी करता न आल्याने मुंबईच्या अडचणीत भर पडली आहे.
दुसरीकडे दिल्लीने गेल्या तिन्ही सामन्यांत आपल्या प्लेइंग ११ मध्ये वारंवार बदल केले आहेत. तरीही संघाला विजयाचा मार्ग सापडलेला नाही. दिल्लीला आपला करिष्माई कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची उणीव जाणवत आहे. दिल्लीला आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्यात त्यांना लखनऊ सुपरजायंट्सकडून ५० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पुढच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध सहा गडी राखून दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही संघाला ५७ धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (तीन सामन्यांमध्ये १५८ धावा) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पण तो त्याच्या आक्रमक शैलीनुसार फलंदाजी करू शकला नाही आणि त्याने आतापर्यंत केवळ ११७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याचा सलामीचा जोडीदार पृथ्वी शॉ (१२, ७ आणि शून्य) आतापर्यंत तीन सामन्यांत केवळ १९ धावाच करू शकला आहे. संघाने सरफराज, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, रिली रुसो, ललित यादव, मनीष पांडे आणि अमन हकीम खान यांसारख्या फलंदाजांना मधल्या फळीत सामील केले आहे; परंतु आतापर्यंत कोणीही मोठी खेळी खेळू शकलेले नाही. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर दिल्लीची अडचण आहे. हंगामाच्या पहिल्या सामन्यात खलील अहमद, मुकेश कुमार, चेतन साकारिया, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या पाचही भारतीय गोलंदाजांसह संघ मैदानात उतरला. पण ते प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले.
संघाने दक्षिण आफ्रिकेचा तुफान गोलंदाज एनरिक नॉर्कियाला त्यापुढील दोन सामन्यांमध्ये संधी दिली. पण तोही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. वेगवान गोलंदाजीत दिल्ली संघाकडे दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी आणि बांगलादेशचा मुस्तफिझूर रहमान यांचा पर्याय आहे. मात्र त्याकरिता संघाला परदेशी खेळाडूंच्या संयोजनात समतोल साधावा लागणार आहे