पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड
मुंबई : मालाड मधील मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक कट रचून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीमधून उघडकीस आली आहे. त्याप्रमाणे आता अटक आरोपींच्या विरोधात नव्याने वेगवेगळी कलम लावण्यात येत आहेत.
मालवणीत दरवर्षी राम नवमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र मिरवणूक ठराविक वस्तीजवळ आली असता मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक सुरू झाली होती. सर्व बाजूने दगडफेक होत होती.
यामुळे मिरवणूक तिथल्यातिथे थांबविण्यात आली आणि कोण दगडफेक करत आहे याचा कार्यकर्ते शोध घेऊ लागले. सोबत असलेले पोलीस ही शोध घेऊ लागले. यावेळी काही तरुण दगडफेक करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. त्या दिवशी पोलिसांनी वीस जणांना अटक केली व गुन्हा नोंदवला. यात एकूण २०० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी २० जणांना अटक करून बाकीच्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अटक आरोपीवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ही दगडफेक कट रचून केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले आहे.
दगडफेक करणाऱ्यांचे काही म्होरके आहेत. त्यांनी आधीच लोकांची जमवाजमव केली होती. दगड आणून ठेवले होते. याबाबत दोन पोलिसांनी महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. मालवणी पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे एक शिपाई आणि मालवणी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल यांनी हे पुरावे गोळा केले आहेत. त्या आधारावर आता आरोपींच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपात बदल करण्यात येणार असल्याचे समजते.