मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अयोध्येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांचे विरोधक विशेषतः मातोश्रीत बसणारे विरोधक अतिशय घायाळ झाले. कारण ठाकरे यांच्यात आणि शिंदे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक वारशाबाबत वाद आहे. ठाकरे हे बाळासाहेब यांचे जैविक पुत्र आहेत, तर शिंदे यांनी स्वतःला बाळासाहेबांचे आपण वैचारिक वारसदार आहोत, हे सिद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीनेच शिंदे यांच्या या शक्तिप्रदर्शनाकडे पाहिले पाहिजे.
महाराष्ट्रात आणि शिंदे यांच्याच ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्तीला न झालेल्या मारहाणीचे राजकीय भांडवल करण्याचा डाव ठाकरे गटाच्या प्रमुखांनी रचला होता आणि त्यासाठी कुठेही कधीही न फिरणारे प्रमुख स्वतः ठाण्यात कुटुंबासह जाऊन त्या महिला कार्यकर्तीची विचारपूस केली. पत्रकार परिषद घेतली आणि ठाण्याचे पत्रकार निर्भीड असल्याने त्यांनी थेट ठाकरेंनाच महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेल्या प्रकारांचे वर्णन केले. महिला कार्यकर्तीला मारहाण झालीच नसताना त्या विषयाचे राजकीय भांडवल करू पाहणाऱ्या ठाकरे गटाला शिंदे यांनी अयोध्येतील शक्तिप्रदर्शनाने जोरदार चपराक, तर दिलीच. पण यातून त्यांनी एकाच दगडातून अनेक पक्षी मारले आहेत. भावनेचे राजकारण कायम करू पाहणाऱ्या विरोधकांना शिंदे यांनी आपल्यामागे हिंदुत्वाची शक्ती उभी आहे, हे दाखवून दिले. ठाकरे गटाच्या प्रमुखांना भाषणात शालजोडीतून हाणले. ठाकरे गटाने हिंदुत्वाचे धोरण सोडले आणि तरीही ते आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही, असे ते सांगत राहिले. पण त्यांची ही ढोंगबाजी शिंदे यांनी सातत्याने उघड केली आहे. अयोध्येतही त्यांनी त्याचीच री ओढली. यंदाची निवडणूक हिंदुत्ववादी धोरणावरच होतील, हे स्पष्ट झाले आहे. त्याचेच प्रत्यंतर शिंदे यांच्या शब्दाशब्दांतून येत होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार हल्ला
शिंदे यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राष्ट्रीय स्तरावर जाऊन मविआवर जे हल्ले चढवले, त्यावरून राष्ट्रीय राजकारणातही एकनाथ शिंदे हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत, असे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न शिंदे गटाने केला आहे. शिंदे यांच्या स्वागताची जी जय्यत तयारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्यांचे भाषण ज्या धर्तीवर झाले, त्यावरून शिंदे यांना राष्ट्रीय नेते म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न दिसला. पण यामुळे ठाकरे गटाला मात्र जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, एकिकडे उद्धव ठाकरे यांना फक्त त्यांचे प्रवक्तेच पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असे सांगत आहेत. त्यांच्या या म्हणण्याला सर्वांनीच इतके हलक्यात घेतले आहे की, कुणालाही त्यावर प्रतिक्रियाही देणे महत्त्वाचे वाटले नाही. त्याच्या अगदीविरोधात शिंदे यांना राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून सादर केल्याने आपोआपच ठाकरे यांचे मनोबल ढासळले असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिंदे आणि त्यांच्या गटाच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. राज्यात शेतकरी दैन्यावस्थेत असताना हे अयोध्येला गेले आहेत, अशी टीका पवार यांनी केली. त्यावरून पवार यांनी आपला हिंदुत्वाला विरोध आहे, हेच सिद्ध केले असावे. पण पवार यांनी असे म्हणणे हे अव्वल दर्जाचे ढोंग आहे. कारण महाविकास आघाडीच्या काळातही शेतकरी संकटातच होते. त्यावेळी तर दोन-दोन वादळे आली आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. पण तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी नुकसान किती झाले, याचा एक थातूरमातूर दौरा केला आणि नुकसानभरपाई, तर आजही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तेव्हा पवार स्वस्थ बसून होते.
इतकेच नव्हे, तर त्यांच्या सरकारला राज्यातील बारमालकांचे नुकसान होते आहे आणि त्यापासून त्यांना वाचवायला हवे म्हणून त्यांनी टाळेबंदीच्या काळात मंदिरे बंद ठेवून बार मात्र सुरू केले होते. पवारांची ही ढोंगबाजी जनता विसरलेली नाही. पण शिंदे यांनी अयोध्येतील भाषणात एकिकडे ठाकरे गटावर जोरदार हल्ले चढवताना अयोध्येत राम मंदिर होणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि ते नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे, असे सांगून ठाकरे आपल्या वडिलांच्या वैचारिक वारशापासून कसे दूर गेले आहेत, हेच सांगितले. शिवसेनेच्या राजकारणात अयोध्येला एक विशेष महत्त्व आहे. त्यानुसारच शिंदे यांच्या या दौऱ्याकडे पाहता येईल. शिंदे यांनी एकाच वेळी अनेक पक्षी मारले आहेत, असे म्हटले ते यामुळे. पहिले म्हणजे त्यांनी स्वतःला बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार म्हणून आपली प्रतिमा उज्ज्वल केली, दुसरे म्हणजे त्यांनी राष्ट्रीय नेता म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि तिसरे म्हणजे उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा वारसा सांगणारे नेते नाहीत, हेही कृतीतून दाखवून दिले. कारण शिंदे आणि आमदारांनी पक्षप्रमुखांविरोधात बंड करण्याचे कारणच मुळी प्रमुखांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सौम्य झालेली भूमिका हेच होते. यापुढील निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होणार असल्याने शिंदे यांच्या या दौऱ्याला प्रचंड महत्त्व आले आहे आणि तेथे जाऊन त्यांनी राज्यातील विरोधकांना फटकारले, त्यावरून शिंदे यांनी आपण आता राजकारणात हळूहळू परिपक्व होत चाललो आहोत, याची ग्वाहीही दिली आहे.