Monday, May 12, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

राज्यात अवकाळी; गारपिटीमुळे नुकसान, शेतकरी हतबल

राज्यात अवकाळी; गारपिटीमुळे नुकसान, शेतकरी हतबल

राज्यात आजही अवकाळी पावसाचा अंदाज; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक


मुंबई : राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट काही केल्या कमी होत नाही. गुरूवारपासून गेले पाच दिवस पाऊस, गारपिटी आणि वादळ वा-यांनी शेतक-यांना बेजार केले आहे. शेतीसोबतच अनेकांच्या घरांचे छप्परही उडाले आहे. त्यात मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सर्व मंत्री वारंवार पंचनामा करुन शेतक-यांना तातडीने मदत करा, असे सांगितले जात असतानाही ढिम्म प्रशासनाकडून पंचनामे होत नसल्याने आणि कोणताही मदतीचा हात मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे.


राज्याच्या अनेक भागांत पुन्हा एकदा अवकाळीने अवकृपा केली आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण, ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.


दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, आणि पावसाचे पाणी घरात शिरले. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होत आहेत. ना नुकसानभरपाई मिळत आहे. अशा परिस्थितीत करायचे काय, जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत आज मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. सह्याद्री अतिथी गृह येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि अधिकारी उपस्थित असणार आहेत.

Comments
Add Comment