प्रख्यात लेखक आणि नाटककार इब्सेन याचे एक सुप्रसिद्ध वचन आहे. त्यानुसार जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ही नेहमी एकटीच असते. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत हे वचन शंभर टक्के सार्थ वाटते. कारण मोदी यांनी भ्रष्टाचाराला लगाम घातला आहे. त्यांनी न खाऊंगा न खाने दूँगा हे वचन तंतोतंत पाळले. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत त्यांच्यावर किंवा त्यांच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे शिंतोडेही उडालेले नाहीत. सर्व विरोधकांमध्ये मोदी यांची प्रतिमा म्हणूनच उत्तुंग वाटते. मोदी यांनी नुकताच तेलंगणाचा दौरा केला आणि तेथे ११ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच वंदेभारत या सिकंदराबाद ते तिरूपती एक्स्प्रेसला हिरवा कंदीलही दाखवला. यावेळी बोलताना मोदी यांनी विरोधकांचे कान चांगलेच उपटले. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधक एकत्र आले आणि एक याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले. आपल्यावर कारवाईचे निर्देश दिले जाऊ नयेत, अशी त्यांची मागणी होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका ऐकूनही घेतली नाही, हे फार चांगले झाले.
मोदी यांचे म्हणणे तंतोतंत रास्त आहे. कारण ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यापैकी काही जण तुरुंगात आहेत. तर काही गजाआड जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तेच हे विरोधक होते आणि त्यात काँग्रेसही होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनियाही सध्या जामिनावर आहेत. तेव्हा मोदी यांच्याविरोधात हे सारे एकत्र आले आणि थेट सर्वोच्च न्यायालयातच गेले. पण न्यायालयाने त्यांची याचिका सुनावणीसही न घेता टाकून दिली. मोदी यांनी तेलंगणातील सरकारला म्हणजेच चंद्रशेखर राव यांना विकासकामात अडथळे आणू नका, असेही बजावले आहे. कारण त्यामुळे नुकसान जनतेचे होते. विकासकामे केली तर लोकांमध्ये केंद्र सरकारची प्रतिमा चांगली होईल आणि यामुळे लोक आपल्याला मते देणार नाहीत, अशी भीती विकासकामांत अडसर आणणाऱ्यांच्या मनात असते. त्यामुळे ते असा रडीचा डाव खेळत असतात. नेमके हेच पंतप्रधानांनी भाषणात पकडले आहे.
आणखीही एक वचन प्रसिद्ध आहे की, जेव्हा अनेक जण राजाविरोधात एकत्र येतात तेव्हा असे समजावे की, राजा अतिशय चांगले काम करत आहे. सध्या भारतातील विरोधकांची स्थिती अशी अवघड झाली आहे. त्यांना मोदी यांची राजवट सहन होत नाही. कारण त्यांना मोदींविरोधात रान उठवण्यास काहीच मिळत नाही. म्हणून खोटे आरोप करत मोदींविरोधात एकत्र यायचे, असे उद्योग त्यांनी चालवले आहेत. पंतप्रधानांनी यावरही निशाणा साधला आहे.
मुळात विरोधकांची गोची अशी झाली आहे की, त्यांना मोदींविरोधात एकत्र येता येत नाही. कारण एकत्र आले तरीही मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना सतावतो. कोणत्याही नेत्याला दुसऱ्याला मोठा होऊ द्यायचे नाही. त्यामुळे विरोधक आपसातच चरफडत बसले आहेत. त्यांना मोदी तर नको आहेत पण पंतप्रधान तर प्रत्येकालाच व्हायचे आहे. आणि मग आपला प्रतिस्पर्धी पंतप्रधान होत असेल, तर मग मोदीच का नकोत, अशी भूमिका घेऊन वेगळीच भूमिका घेतात. यावरून विरोधकांना आपल्याच अहंगंडाने कसे घेरले आहे, हे लक्षात येईल. असले विरोधक काय मोदींना विरोध करणार आणि काय त्यांचा पराभव करणार, हे दिसतेच आहे.
काँग्रेसची राजवट असताना नेमकी अशीच स्थिती होती. त्याही काळात काँग्रेसवाल्यांपेक्षा कितीतरी उच्चमूल्यांचे आणि उदात्त असे नेते जसे की. एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे, मधू लिमये, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, वाजपेयी आणि आडवानी असे दिग्गज होते. पण तेही एकत्र येत नसत ते आपसातील वैचारिक मतभेदांमुळे. पण सध्याचे विरोधक त्यावेळच्या विरोधकांप्रमाणे उदात्त आणि उच्च मूल्ये जपणारेही नाहीत. ते केवळ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. अत्यंत खुजे असे हे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांचे एकत्र येणे, न येणे सारखेच आहे आणि मोदींना त्याचा काहीही फरक पडत नाही. तेलंगणात मोदी यांची झालेली सभा म्हणजे एक प्रकारे त्यांनी लोकसभा निवडणुकीचा वाजवलेला बिगुलच होता. त्यांनी विरोधकांवर भाजप कोणत्या मुद्द्यांवर हल्लाबोल करणार आहे, याची रूपरेषाच सांगितली आहे.
भाजप विकासाचा अजेंडा घेऊन आगामी निवडणूक लढवणार आहे, हेच मोदी यांनी वेगळ्या शब्दांत सांगितले आहे. मोदी यांच्या हस्ते तेलंगणात ११ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन झाले. पण विरोधक खासकरून तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते चंद्रशेखर राव इतके क्षुद्र मनोवृत्तीचे की मोदी यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते हजर राहिले नाहीत. ही विद्या त्यांनी कदाचित तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याकडून मिळवली असावी. साधे शिष्टाचाराचे पालनही विरोधी नेते करत नाहीत. खरे तर त्यांच्या तेलंगणातील काँग्रेसचे शक्तिशाली नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी हे नुकतेच भाजपमध्ये सामील झाले आहेत. राज्यातील काँग्रेसला हा मोठाच झटका आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक एकत्र येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राव यांच्यासारख्या इतरही नेत्यांनाही हा झटका आहे. त्यांच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांवर हल्ला चढवून विरोधकांच्या संभाव्य आक्रमणातील धारच काढून घेतली आहे, असे म्हणावे लागेल. मोदी यांची जनमानसात असलेली पकड आणि त्यांची उजळ प्रतिमा यामुळे अगोदरच गलितगात्र झालेले विरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मोदी यांनी जो हल्ला चढवला, त्यामुळे अधिकच नेस्तनाबूत झाले आहेत.