भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी पावणे सहा वाजता कामगारांना घेऊन जाणा-या मिनी बसने कंटेनरला धडक दिली. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृ्त्यू झाला असून २ महिला कामगारांसह चालक गंभीर जखमी झाले आहेत
भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी पावणे सहा वाजता हा अपघात झाला. कामगारांना भिवंडीकडे घेऊन येणाऱ्या मिनी बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली.
भिवंडी तालुक्यातील वाहूली येथे असलेल्या ॲमेझॉन या कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या महिला कामगारांना पहाटे घरी सोडण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरून मिनी बस निघाली होती. सोनाळे गावातील साईधाम चौक या ठिकाणी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्ता दुभाजक ओलांडून मुंबई नाशिक या वाहिनीवरील कंटेनरला जाऊन धडकली.
या मिनी बसमध्ये सहा महिला कामगार, एक महिला सुरक्षा कर्मचारी, एक पुरुष सुरक्षा कर्मचारी व चालक असे नऊ जण होते. या अपघातात पुरुष सुरक्षा कर्मचा-याचा जागेवर मृत्यू झाला असून बस चालक व दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. तर इतर पाच महिलांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
याप्रकरणी बेदरकारपणे बस चालवणाऱ्या चालकाविरोधात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.