
मयांक मार्कंडे, राहुल त्रिपाठी विजयाचे शिल्पकार
हैदराबाद (वृत्तसंस्था) : मयांक मार्कंडेच्या भेदक गोलंदाजीसमोर शिखर धवन वगळता पंजाब किंग्जचे अन्य फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. त्यानंतर राहुल त्रिपाठीच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ८ विकेट राखून १४४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. हैदराबादचा यंदाच्या हंगामातील हा पहिला विजय ठरला. पंजाब किंग्जने दिलेल्या १४४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणे हैदराबादला म्हणावे तितके सोपे गेले नाही. हैदराबादने संयमी सुरुवात केली. संघाची धावसंख्या ४५ असताना हैदराबादची सलामीवीर जोडी तंबूत परतली होती. हॅरी ब्रुकने १३, तर मयांक अगरवालने २१ धावा केल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत कर्णधार मारक्रमच्या साथीने हैदराबादला विजय मिळवून दिला. राहुल त्रिपाठीने नाबाद ७४ धावा केल्या. मारक्रमने त्याला नाबाद ३७ धावांची साथ दिली. हैदराबादने ८ विकेट राखून १७.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. पंजाबच्या अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबची फलंदाजी ढासळली. कर्णधार शिखर धवनने एकाकी झुंज देत पंजाबला तारत सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. शिखर धवनच्या नाबाद ९९ धावांमुळे हैदराबादने २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १४३ धावा केल्या. धवनने आपल्या खेळीत १२ चौकार आणि ५ षटकार लगावले. सॅम करनने २२ धावांची भर घातली. पंजाबचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. या दोघांव्यतिरिक्त किंग्जच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने ४ षटकांत अवघ्या १५ धावा देत ४ फलंदाजांना माघारी धाडले. मार्को जेन्सेन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.