- इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात ‘फायटर नंबर १’ अशी प्रतिमा असलेले नारायण राणे यांचा शिवसेनेचा शाखाप्रमुख ते केंद्रीय मंत्री असा प्रवास विलक्षण आहे. पंचावन्न वर्षांची त्यांची राजकीय वाटचाल ही संपूर्ण संघर्षमय आहे. नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी जी चढत्या क्रमाने पदे मिळत गेली, ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावती आहे. सामान्य जनतेसाठी जीवन अर्पण केलेला हा नेता आहे, अहोरात्र कार्यकर्त्यांची काळजी घेणारा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारा नेता ही त्यांची ओळख आहे. प्रत्येक राजकीय पक्षात भाई, दादा, असतात. पण कोकणची शान असलेले नारायण राणे यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत दादा म्हणून ओळख आहे.
दैनिक ‘प्रहार’चा संपादक म्हणून काम करताना त्यांच्याशी माझ्या गाठीभेटी होत असतात, नियमित संवाद होत असतो. प्रत्येक वेळी त्यांच्यातला नवा गुण मला जाणवतो. ते जागरूक नेते आहेत, पण उत्तम संपादक आणि उत्तम वाचक आहेत. प्रत्येक घटनेची त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असते. उद्याच्या प्रहारमध्ये कोणत्या ठळक बातम्या येणार आहेत, कोणत्या विषयावर अग्रलेख आहे, विशेषत: पहिल्या पानावर कोणत्या घटनांना स्थान आहे, याची ते नियमित माहिती घेत असतात. केंद्रीय मंत्री म्हणून काम करीत असताना दिल्ली, मुंबई, कोकणात व देशात अनेक ठिकाणी सतत दौरे, कार्यक्रम, बैठका, सरकारी कामकाज, पक्षाचे कार्यक्रम या वेळापत्रकात ते खूप व्यस्त असतानाही प्रहारमध्ये काय प्रसिद्ध झाले आहे व होणार आहे? याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यांच्याकडून मिळणारा सल्ला नेहमीच मौल्यवान व अचूक असतो.
दर वर्षी १ जानेवारीला नववर्षाच्या पहिल्या दिवशी मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतो. या वर्षी १ जानेवारीला मी त्यांना भेटण्यासाठी जुहू येथील अधिश बंगल्यावर पोहोचलो, तेव्हा दुपारचा एक वाजला होता. स्वागतकक्षात बसलेल्या वैयक्तिक सचिवाने साहेब वरच्या मजल्यावर गेले, आता कोणाला भेटणार नाहीत, असे सांगितले. त्या क्षणाला काय करावे मला कळेना. मी भेटीचा आग्रह धरला, तेव्हा त्याने त्यांना फोनवरून मी आल्याची कल्पना दिली. मी कळवतो, एवढेच त्यांनी सांगताच मी काही काळ हादरलो. दादा नाराज आहेत का? का बरे भेटले नाहीत? आजच्या प्रहारमध्ये काही मोठी चूक झाली आहे का? असा विचार करू लागलो. रविवार असूनही तेथून थेट वांद्र्याला ऑफिसमध्ये आलो व अन्य कामात गढून गेलो. दुपारी चार वाजता अधिशवरून फोन आला की, दादांनी बोलावले आहे. मला खूप हायसे वाटले. मी लगेच टॅक्सी करून अधिशवर पोहोचलो. दादा माझी वाट बघत होते. ते स्वत:च म्हणाले, अरे तू येऊन गेलास, मला समजले. पण अन्य तातडीच्या कामांत खूपच व्यस्त होतो, सकाळपासून नववर्षाच्या शुभेच्या देणाऱ्यांची रिघ लागली लागली होती. दादांनी मिठाई मागवली व मला दिली. जवळपास पाऊणतास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. नवीन वर्षात प्रहारमध्ये काय करायचे? यावर ते आवर्जून बोलले. प्रहारच्या नाशिक आवृत्तीविषयी काय प्रगती? याची त्यांनी विचारणा केली. नंतर बोलताना नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात एकनाथ शिंदे यांची कामगिरी प्रभावी झाली, असे मी त्यांना सांगताच त्यांनी थेट शिंदे यांना फोन लावून त्यांची प्रशंसा केली व त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दादांच्या मनात राग कधीच नसतो. ते नेहमीच रोखठोक बोलतात. एखादी बाब आवडली नाही, तर तसे स्पष्ट सांगतात. नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या भेटीने व त्यांच्या दिलखुलास बोलण्याने चैतन्य मिळाल्याचा अनुभव मला मिळाला. त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर कामाचा उत्साह आणखी वाढतो. याच वर्षी मला पीएच.डी. मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने तसे कळवताच मी जुहूच्या बंगल्यावर जाऊन राणेसाहेबांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी लगेच मिठाई मागवली व मला भरवली. माझा संपादक डॉक्टरेट झाला, असे म्हणत त्यांनी मला शाबासकी दिली.
१ एप्रिल २०२३. मी ऑफिसमधून घराकडे निघालो. रात्रीचे दहा वाजले होते. रत्नागिरीहून प्रहारमधून अनघा निकमचा फोन आला. नारायण राणेसाहेबांना अलिबाग कोर्टाने दोषमुक्त केले, बातमी आहे का? मी लगेचच अलिबागचे आमचे ब्युरो चीफ सुभाष म्हात्रे यांना फोन लावला. त्यांनीही तत्परतेने बातमीची सत्यता पडताळली. मुंबई ऑफिसमध्ये प्रियानी पाटील, सिंधुदुर्ग ऑफिसमध्ये संतोष वायंगणकर आणि रत्नागिरीला नरेंद्र मोहिते यांनाही फोन करून जागा ठेवा व पान १ वर बातमी ठळकपणे घ्या, असे सांगितले. प्रहारचे कला विभाग प्रमुख नीलेश कदम यांनाही रात्री उशिरा येणाऱ्या बातमीची कल्पना दिली. त्यानंतर लगेच मी नारायण राणे साहेबांना फोन लावला. त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी लगेच थँक्स म्हटले. त्यावेळी ते म्हणाले, “अरे परवा मी सांगायचे विसरलो. प्रहारमध्ये राष्ट्रपतींची बातमी नेहमी पहिल्या पानावर यायला हवी. दोन दिवसांपूर्वी ती पान नऊवर प्रसिद्ध झाली होती. आपण राजशिष्टाचार पाळला पाहिजे….”
अलिबाग कोर्टाने त्यांना दोषमुक्त केले, कारण त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याइतपत सबळ पुरावाच नव्हता. केंद्रात मंत्री झाल्यावर मुंबई, कोकणात जनआशीर्वाद यात्रेची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपवली होती. मुंबईत त्यांचे जंगी स्वागत झाले. कोकणातही सर्वत्र अफाट प्रतिसाद होता. महाडला पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला दादांनी राणे स्टाईलने उत्तर दिले. त्यावरून ठाकरे सरकारने राणे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी शेकडो पोलिसांची फौज तैनात केली होती. राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात टीका करणारे वक्तव्य केले म्हणजे मोठा गुन्हा केला, असे तत्कालीन ठाकरे सरकारने चित्र निर्माण केले. चिपळूणला तर जेवणाच्या ताटावरून त्यांना उठविण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी तर “उचला त्यांना, माझे वरती बोलणे झाले आहे”, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देताना टीव्हीच्या पडद्यावरून लाखो लोकांनी पाहिले. केवळ राजकीय सुडापोटी राणेसाहेबांवर कारवाई करण्यासाठी ठाकरे सरकार कसे आसुसलेले होते, हेच जनतेला दिसून आले. एकाच वेळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले. पण शेवटी काय झाले? ज्यांनी एका केंद्रीय मंत्र्याला पोलीस बळावर अटक करण्याचे षडयंत्र रचले, ते कोर्टाच्या निकालानंतर तोंडावर आपटले….
२३ जानेवारी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्या दिवशी राणेसाहेबांनी प्रहारमधून स्वत: शिवसेनाप्रमुखांना भावपूर्ण शब्दसुमनांजली अर्पण केली. गुरुस्मरण असा उल्लेख करून शब्दांजली वाहताना त्यांनी म्हटले, “तुम्ही हवे होतात. तुम्ही असता, तर हिंदुत्वाची गद्दारी झाली नसती. बाळासाहेब हे मला सदैव गुरुस्थानी आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शेवटच्या दिवसात मला भेटता आले नाही, याची खंत राहणार आहे. मला स्वत:ला साहेबांचे खूप प्रेम मिळाले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी आज जो आहे, तो त्यांच्यामुळेच. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला तो त्यांच्यामुळेच…. साहेब, मी आपल्याला शेवटचा नमस्कार करू शकलो नाही, मला क्षमा करा. तुम्ही हवे होतात” असे शिवसेनाप्रमुखांविषयी निष्ठा, आदर, प्रेम हे राणेसाहेबांच्या रोमारोमांत भिनले आहे. त्याच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार आले, अनेक वळणे आली. पण “मी आज जो आहे तो शिवसेनाप्रमुखांमुळेच…” हे सांगायला ते कधी विसरत नाहीत आणि कचरतही नाहीत.…
गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचे मुंबईत शिवतीर्थावर मनसेच्या मेळाव्यात भाषण झाले. मैदान खचाखच भरले होते. राज यांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडलीच नसती असे सांगताना एक आठवण सांगितली. ते म्हणाले, राणे पक्ष सोडणार असे कळत होते, तेव्हा मी त्यांना फोन केला. मी त्यांना म्हटले, बाळासाहेबांशी मी बोलतो. मी बाळासाहेबांना फोन केला. बाळासाहेब म्हणाले, नारायण राणेंना घेऊन ये…. पाचच मिनिटांनी त्यांचा मला परत फोन आला, की त्यांना आणू नकोस…. मला त्यांच्या मागून कुणीतरी बोलते आहे, असा आवाज आला. तेव्हा मला राणेंना सांगावे लागले की, मातोश्रीवर येऊ नका.… नको असलेल्या लोकांनी पक्षातून बाहेर पडावे, यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली, त्याचा शेवट एकनाथ शिंदे यांच्या बंडाने झाला…. मला त्यांच्या राजकारणाशी काही देणे-घेणे नाही. पण या सर्व कारस्थानांना उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, मी सुद्धा पक्षातून कधी बाहेर जातोय, याची ते वाट बघत होते?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले होते, नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती, तर आजचे राजकारण वेगळ्या दिशेला गेले असते. नारायण राणे शिवसेनाप्रमुखांचे ऋण कधीच विसरले नाहीत. त्यांनी पक्ष बदलला तरी बाळासाहेबांविषयीचा आदर आणि सन्मान कायम ठेवला. ठाकरे सरकारला पायउतार होऊन ९ महिने झाले. राज्यात महाआघाडीचे सरकार असताना सर्वात मोठे हादरे दिले, ते नारायण राणेंनी. भाजपशी केलेल्या गद्दारीवरून अडीच वर्षांत त्यांनी मातोश्रीवर सर्वाधिक तोफा डागल्या. ठाकरे सरकारनेही त्यांच्याविरोधात पोलीस व प्रशासनाचा वापर करून त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे कधी डगमगले नाहीत. ‘माघार’ हा शब्द त्यांच्या शब्दकोषातच नाही. शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारातून व सहवासातून घडलेले ते महायोद्धा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर करूनच केंद्रात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.