Categories: कोलाज

निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर

Share
  • कोकणी बाणा: सतीश पाटणकर

मंदिरात होणारा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा. माघ कृष्ण दशमी ते अमावास्येपर्यंत उत्सव असतो.

कोकणातील देवगड तालुक्यात ‘वाडे’ गावचे श्री देव विमलेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एक कोरीव लेणेच आहे. साधारणत: पंधरा मीटर उंच व शंभर मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेले आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी भगवान शंकराची संपूर्ण काळ्या दगडाची पिंडी आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे. या मंदिराचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. बाराही महिने हा ओहोळ वाहत असतो. या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, पावसाळ्यात ज्यावेळी ओहोळाचे पाणी गढूळ होते. त्यावेळी, मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायथ्याजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. या झऱ्याचे पाणी स्वच्छ, मधुर व थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. स्थानिक लोक या झऱ्याला प्रेमाने ‘गंगा आली’ असे म्हणतात.

या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव सात दिवस चालतो. माघ कृष्ण दशमी या दिवशी श्री विमलेश्वर पालखी मंदिरात आणली जाते. दशमीपासून अमावस्येपर्यंत रोज रात्री पालखीसोबत भक्तगण मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घातल्यावर कीर्तनाचा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. मंदिरात दिवसभर भजनाचे कार्यक्रम सुरू असतात. अमावस्येच्या दिवशी सर्व भक्त पालखीसोबत समुद्रस्नानाला जातात. अशा रीतीने महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न होतो. असे हे सुंदर शिवमंदिर प्रत्येकाने एकदा तरी पाहण्यासारखे आहे. मुंबईहून जाताना मुंबई-विजयदुर्ग एस.टी. बसने वाडे गावात आंबेडकर चौक येथे उतरून पाच मिनिटांत पोहोचता येते. विमलेश्वराचे मंदिर तेथील कोरीव  लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे ‘संस्कृतीकोशा’चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद काळे व अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे मूळ गाव होय. विमलेश्वराच्या मंदिराभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी  झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी, तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा  आहेत. मंदिराच्या जवळून, वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव  शिल्पे आहेत. ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. मंदिराच्या पायऱ्या चढताच भली मोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच सभामंडप लागतो. मंदिरात  अंधार असल्याने तेथे वटवाघळांचा वावर बराच असतो. त्यांच्या चित्काराने दचकायला होते. तेथून काही पायऱ्या चढल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची मूर्ती लक्ष वेधून घेते. तेथील गाभाऱ्यात उंचावर असलेले शिवलिंग हे भारतातील दुर्मीळ वैशिष्ट्य!

मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेले ते प्राचीन मंदिर त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी गढूळ होत असले, तरी झऱ्याचे पाणी मात्र स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो. मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूला प्रदक्षिणेसाठी चिऱ्यांनी घाट्या बांधून काढल्या आहेत. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व गणेश मंदिर आहे. धर्मशाळा व गावात पूर्वी होऊन गेलेल्या नेने नामक सत्पुरुषाचे समाधीस्थळही आहे. मंदिरात होणारा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा. माघ कृष्ण दशमी ते अमावास्येपर्यंत उत्सव असतो. एकादशीला  जत्रा  भरते. त्या दिवशी ग्रामदैवत रवळनाथाचे  तरंग  मंदिरात आणले जातात. मंदिराभोवती  पालखी  प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात  आरती, कीर्तन, प्रवचन व भजने होतात. चाकरमान्यांच्या आगमनामुळे गावातील उत्साहाला उधाण आलेले असते. अमावास्येच्या दिवशी सकाळी पालखीसह लोक समुद्रस्नानासाठी जवळ असलेल्या फणसे येथील समुद्रकिनारी जातात. रात्री लळिताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. नयनरम्य परिसर आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विमलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात मंदिर कायमचे कोरले जाते. अलीकडच्या काळात, त्या परिसरात चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. विमलेश्वर मंदिरात जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेने कणकवली स्थानकावर उतरावे. तेथून विजयदुर्गला जाणारी गाडी वाडा गावातून जाते. तेथून थेट गाडी न मिळाल्यास देवगडला जाऊन तेथून विजयदुर्गची गाडी पकडता येते. स्वतःच्या वाहनाने जाताना मुंबई-गोवा महामार्गावर तरळा या गावातून एक फाटा वाड्याला जातो. त्या रस्त्याने देखील वाडा गावात पोहोचता येते.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

19 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

28 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

51 minutes ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

1 hour ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

2 hours ago