Thursday, July 25, 2024

श्रद्धा

  • कथा: रमेश तांबे

दीपावलीची धामधूम सुरू होती. घरेदारे रोषणाईने नटली होती. दरवाजांसमोर सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. विविध पदार्थांचे खमंग वास सर्वत्र दरवळत होते. फटाक्यांच्या विविधरंगी आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता. साऱ्या आबालवृद्धांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. मी माझ्या बैठकीच्या खोलीत निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात ‘काका, तुम्ही येथे राहाता?’ अशी गोड हाक कानी आली. पुस्तकातून डोकं बाहेर काढून पाहिलं, तर समोर दोन छोट्या मुली. आमच्या संस्कार वर्गात येणाऱ्या वय वर्ष अवघ्या सहा-सात!

त्यातलीच एक श्रद्धा. इयत्ता दुसरीत शिकणारी. निरागस चेहऱ्याची, गोरीगोमटी अन् चुणचुणीत मुलगी. संस्कार वर्गात नित्यनेमाने हजेरी लावणारी, नेहमी एखादी कविता वा गोष्ट सांगणारी. तिचं बोलणंदेखील इतकं छान असतं की, श्रोत्यांनी फक्त ऐकतच आणि बघतच राहावं. छान हावभाव करीत, मानेला किंचित झटका देऊन बोलण्याची तिची लकब, तिच्या गालावर पडणारी छानशी खळी. तिचं एकंदरीतच वागणं साऱ्यांचं लक्ष वेधून घेईल असं. थोडीशी चंचल, थोडीशी अवखळ अन् बोलकी श्रद्धा माझी मात्र चांगलीच मैत्रीण झाली होती.

अशा या माझ्या बालमैत्रिणीची फिरकी घ्यावी, तिला थोडंसं चिडवावं या उद्देशाने मी तिला म्हणालो, ‘काय श्रद्धा, दिवाळी आहे ना तुझ्याकडे! मज्जा आहे ना तुझी. नवेनवे कपडे, खूप सारे फटाके, लाडू, करंज्या. मला देणार की नाही तुझ्या घरचा फराळ? की एकटीच खाणार!’ मस्तपैकी एक गुगली चेंडू टाकून मी श्रद्धाच्या उत्तराची वाट पाहू लागलो. पण श्रद्धाने असा काही फटका लगावला की, तो माझ्या अगदी काळजालाच छेद देऊन गेला. श्रद्धा सांगू लागली, ‘नाही हो काका, आमच्याकडे नाही दिवाळी! माझे बाबा आमच्याबरोबर राहात नाहीत. ते तिकडे गावाला असतात, मग दिवाळीला पैसे कोण देणार?’ ती निरागसपणे सांगत होती. खरं तर, मी समजून उमजून गप्प बसायला हवं होतं. पण तरीही मी पुन्हा विचारले, ‘का?’ तर म्हणाली, ‘माझे बाबा माझ्या मम्मीला रोज मारायचे. मलासुद्धा एकदा झाडूने खूप मारलं होतं. मग मी आईसोबत आमच्या आजीकडे राहायला आलो. तेव्हापासून आम्ही एकटेच राहातो.’ तिच्या निरागस अन् गोड चेहऱ्यामागे एवढा मोठा दुःखाचा डोंगर उभा असेल याची मी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती. तिचा एक एक शब्द कसा काळजाला घरं पाडीत होता. मजेने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र सुन्न करणारं होतं. पण आता श्रद्धा थांबायला तयार नव्हती. तिचं बोलणं भरभर सुरूच होतं. ‘पहिले आई-बाबा भांडायचे, आता आजी-मम्मी भांडतात. मी कधी कधी न जेवताच शाळेत जाते. फक्त चहा-बिस्कीट खाऊन!’ श्रद्धा बोलत होती. तिचं बोलणं मला अगदी असह्य वाटू लागलं! एवढ्या छोट्या वयात तिच्या कोवळ्या मनावर किती आघात झालेत व होत आहेत या कल्पनेनेच अंगावर काटा आला. मी म्हटलं, ‘थांब हं श्रद्धा’ असं म्हणून घरात गेलो अन् तिच्यासाठी एक लाडू घेऊन आलो. तिच्या पुढे हात करीत म्हणालो, ‘हा घे लाडू… माझ्याकडून तुला दिवाळी भेट’ माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच, ‘नको काका, नको! आई ओरडेल’ असं म्हणाली अन् क्षणार्धात माझ्यासमोरून पळूनदेखील गेली. तिच्यासाठी आणलेला लाडू हातात धरून मी कितीतरी वेळ तसाच शून्यात बघत होतो.

श्रद्धा! एक निरागस बालमन. ‘बाप नसणे’ ही खरं तर, कुणालाही कळू न देण्याची गोष्ट. पण श्रद्धा कशी बिनधास्त, किती सहजपणे मला सांगून गेली. मोठ्यांच्या भांडणात, छोट्या-मोठ्या कुरबुरीत लहानग्यांचा कसा बळी जातो, याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे श्रद्धा! खरं तर, श्रद्धा तिची आई, आजी, आजोबा यांच्याबरोबर राहाते आहे. पण ‘बाबा’ आमच्याबरोबर राहात नाहीत, असं सांगून ‘आम्ही एकटेच राहतो’ असे ती चिमुरडी सहज सांगून जाते. हे सांगता सांगता तिच्या जीवनातलं ‘बाबांचं’ स्थान ती अधोरेखित करून जाते. एवढं मात्र नक्की की, दुःखानं, निराशेने जरी जीवन काळवंडलेले असले तरी सदैव हसतमुख कसं राहावं, याची शिकवण श्रद्धा या प्रसंगातून मला देऊन गेली होती!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -