- विशेष: नितीन सप्रे
अस्सल मराठी मातीतला कवी, गीतकार, नाटककार, चित्रकार म्हणता येईल, अशा अशोक परांजपे यांच्या ९ एप्रिल या स्मृतिदिनानिमित्त…
दारी पडणाऱ्या पावसाचे थेंब अंगणात नाचू लागले, मातीचा सुगंध दरवळला, दग्ध झालेले सर्व भाव पुन्हा फुलून आले, धुक्यातून कुणाचं भावगीत सुरू झालं, सांजवेळी पैल राहिलेलं गावं आठवलं किंवा पंढरपूर गर्जू लागलं, जीवाला चकोरा सम कैवल्याच्या चांदण्याची ओढ लागली आणि नाचणाऱ्या वैष्णवांच्या डोळी नीर वाहू लागलं की, जे जे काही आठवू लागतं, त्यात अशोक गणेश परांजपे हे नाव साठच्या दशकापर्यंत जन्मलेल्या मराठी रसिकाला अपरिहार्यपणे आठवणारच.
वडिलांच्या नावातलं इंग्रजी ‘G’ (जी) हे अद्याक्षर एक घर आधी सरकलं आणि ते अशोकजी परांजपे असं रूढ झालं. सुमन कल्याणपूर, अशोक पत्की, जितेंद्र अभिषेकी, प्रभा अत्रे, कमलाकर भागवत यांसारख्या गुणीजनांच्या संगतीनं, मनाला भुरळ पाडणाऱ्या, सरल, भक्तिरसात चिंब भिजलेल्या अशोकजींच्या कवितांनी, गीतांनी नादावला न गेलेला खरा चोखंदळ मराठी रसिक सापडणं अशक्य आहे. सांगली जिल्ह्यातलं हरिपूर हे नाटककार गोविंद बल्लाळ देवल (संगीत शारदा, मृच्छकटिक, संशय कल्लोळ) यांचं गाव ही अशोकजींची जन्मभूमी. देवलांचा जन्म जरी कोकणातला असला तरी त्यांचं बालपण हरिपूरमध्ये गेलं होतं. अशोकजींना याचा विशेष अभिमान होता. मुंबई ही त्यांची कर्मभूमी आणि औरंगाबाद हा विश्रांतीसाठीचा वानप्रस्थाश्रम. पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मुंबई मार्गे मराठवाड्याला मिळण्याची ही घटना दुर्मीळच म्हणावी लागेल. कदाचित प्रादेशिक समतोल साधण्याचा हा त्यांचा मार्ग असावा.
केतकीच्या बनी तिथे…
सांगलीचं वातावरण प्रथमपासून कलापोषक होतं. अशोकजींना लहानपणापासूनच गीत, संगीत, नाटक, लोकनाट्य, लोककला, चित्रकला अशा विविध कलाप्रांतात विशेष रस होता. मुंबईत आल्यावर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकारितेचं शिक्षण घेतलं. व्यक्तिमत्त्व जरी थोडं रांगडं असलं तरी ते कविमनाचे होते. त्यांची हीच कोमलता त्यांच्या काव्यातही प्रतिबिंबित झालेली दिसते. हरिपूरला कृष्णेचं पात्र, नीरव शांतता, दोन तटांदरम्यान ये-जा करणारी नाव हे अनुभवत असताना ‘नाविका रे, वारा वाहे रे… डौलाने हाक जरा आज नाव रे…’ यांसारखं, म्हटलं तर सुंदर कोळीगीत किंवा सांजवेळ (आयुष्याची) झाली आता पैल माझं गाव रे (हे जग ओलांडून नीजधामी जायचं आहे.) तेव्हा नाव डौलाने हाक (हा प्रवास डौलदार कर) असा गर्भितार्थ सुचावणारं तरल भावपूर्ण गीत त्यांना सुचतं. केतकीच्या वनातल्या मयूर नृत्यानं गहिवरून, मेघाचा धीर सुटतो अशी कवी कल्पना त्यांच्या लेखणीतून उगवते आणि बागेश्रीच्या अंगाने फुलतं ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर’
अवघे गर्जे पंढरपूर…
‘दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो,’ ‘एकदाच यावे सखया,’ ‘कुणी निंदावे कुणी वंदावे,’ ‘दारी उभी अशी मी गेली निघून रात,’ ‘पैलतिरी रानामाजी,’ ‘पाखरां जा दूर देशी,’ ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणू,’ ‘सहज तुला गुपित एक सांगते,’ ‘साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते’ अशी भावरसात सचैल न्हायलेली कितीतरी भावगीतं आपलं मन गाऊ लागतं. भक्ती मार्गावर विचरण केलं तर गोरा कुंभार नाटकातलं, अंगावर भक्ती रोमांच फुलावणाऱ्या ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या त्यांच्या गीतावर, हाती चिपळ्या घेऊन ताल धरावासा वाटू लागतो.
कैवल्याच्या चांदण्याला…
भैरवीचे सूर ल्यायलेलं ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ कोणी, कधी तरी विसरू शकेल का? संत गोरा कुंभार नाटकाचं लिखाण सुरू असताना पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी, नाटकाचा समारोप असा व्हावा की, रसिक तेच शब्द, सूर घेऊन घरी जावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. असं सांगतात की, बहुधा लोणावळ्यात बुवांचं गाणं सुरू असतानाच आकाशातला चंद्र पाहून अशोकजींना चंद्र व्हावे पांडुरंगा सुचलं.
दार उघडं बया… नाटकातलं ललतमध्ये बांधलेलं ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हेही असंच एक अविस्मरणीय पद. ‘पाहू द्या रे रूप मज विठोबाचे,’ ‘ब्रह्म मूर्तिमंत’ ही नाट्य भक्तिगीतं, महानंदा नाटकातलं ‘तुझिया गे चरणीचा,’ आतून कीर्तन वरून तमाशा या नाटकातली ‘रात्र श्रावणी आज राजसा’ ही अभिजात लावणी त्यांच्या चतुरस्र प्रतिभेची ओळख पटवून देते.
लहानपणी आकाशवाणीवरून अर्चना भक्ती संगीताच्या कार्यक्रमात ऐकलेल्या भक्ती गीतांनी मनात कायमची जागा मिळवली. खरं तर त्यावेळी या गीतांचे कर्ते कोण? हे माहीत देखील नसे. ते भान पुढे आकाशवाणीच्या सेवेत आल्यावर येत गेलं. यासाठी प्रसारमाध्यमातील, विशेषत: आकाशवाणीत सेवा करण्याच्या मिळालेल्या संधीबद्दल मी परमेश्वराचा अत्यंतिक ऋणी आहे. आकाशवाणीच्या नोकरीत मिळणाऱ्या वेतनामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा भागण्याच्या सोयीबरोबरच अभिजात जगण्याची चेतना ही जागृत झाली. लक्ष्मी अन्य कुठल्याही नोकरीतून प्रसन्न झाली असती, मात्र तिच्याबरोबर सरस्वतीही कृपावंत झालीच असती, असं नाही. आयुष्यभरासाठी मिळालेली ही मिळकत अनमोल ठरली. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रसंगात जणू काही आपणही उपस्थित होतो, अशी अनुभूती देणाऱ्या अशोकजींच्या अत्युत्तम गीताशी सविस्तर ओळख झाली, तीही आकाशवाणीतच. अर्थात ‘समाधी घेऊन जाई ज्ञानदेव’ या संजीवन समाधी सोहळ्याचा, भावसमाधी सदृश अनुभव देण्यात अशोकजींच्या शब्दकळेला तोलामोलाची साथ मिळाली ती भागवती संगीत (संगीतकार कमलाकर भागवत) आणि सुमन स्वरांची (गायिका सुमन कल्याणपूर) यांची.
‘नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चल
सज्जनांचे बळ समाधान।’
माऊली समाधिस्थ झाल्या त्या क्षणाला काय वातावरण असेल याची प्रचिती हे भावकाव्य ऐकताना प्रत्येक वेळी मिळते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना समाधी दिली. गुरूने सदेह, शिष्याला समाधी देण्याचं हे एक मात्र उदाहरण असेल. हे दुर्मीळ निरीक्षण अशोकजींनी बरोब्बर मांडलं आहे.
‘गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले?’
‘पैलतीरी हाक आली आज कानी
करूनि निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्तजन’
त्या सर्वेश्वराचा कौल मिळाला तरच या
प्रतीचं सृजन शक्य आहे.
नाटककार म्हणूनही अशोकजी परांजपे यांनी मराठी रंगभूमीसाठी दिलेलं योगदान उल्लेखनीय म्हटलं पाहिजे. संत गोरा कुंभार, संत कान्होपात्रा, बुद्ध इथे हरला आहे, अबक दुबक, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया…सारख्या नाटक, लोकनाट्यांनी रंगभूमीच्या वैभवात मोलाची भर घातली. अशोकजींना अभिजात वाङ्मयाप्रमाणेच लोकवाङ्मयही प्रिय होतं. शंकराचार्याचे श्लोक आणि पठ्ठेबापुरावांच्या लावण्या त्यांच्या ओठी एकाच वेळी भक्तिभावनेनं नांदत असत. लोककलांबद्दलची त्यांची प्रीती आणि व्यासंग हे दोन्ही वाखाणण्याजोगं होतं. इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्राचे ते संचालक होते. या केंद्रातर्फे १९८६ साली आनंदवन वरोरा येथे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात आदिवासी महोत्सव आयोजित केला होता. १९९२ साली पंढरपूर इथे भक्तिसंगीत महोत्सवही त्यांनी आयोजित केला होता. लोककला आणि लोककलावंतांना नागर रंगमंचावर उतरविण्याचं मोठं काम त्यांनी केलं. आय.एन.टी संशोधन केंद्राच्या खंडोबाचं लगीन, दशावतारी राजा, जांभूळख्यान, वासुदेव सांगती, अरे रे संसार, मातीचं स्वप्न या संशोधन नाट्यांची मूळ संकल्पना आणि लेखन मार्गदर्शन अशोकजी परांजपे यांचीच होती. विठ्ठलाचा ठाव ठिकाणा सांगताना ते म्हणतात, …‘शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग’ पुढे ते आणखी स्पष्ट करतात…, ‘देव नाही राऊळात नाही त्या आकार देव आहे तुमचा आमचा मानवी आचार’ अशा प्रकारे त्यांच्या संवेदनशीलतेला सामाजिकतेचा आणि कर्मप्रवणतेचा पदर होता. महाराष्ट्राच्या ग्राम्य जीवनाशी जुळलेली नाळ अभिमानाने मिळवणारा, मराठी लोकजीवन, लोक कलांचा अभ्यासक, संशोधक, असा खऱ्या अर्थानं मराठी मातीचा सुगंध पसरविणाऱ्या या साहित्यिकाची जीवन सांगता आत्महत्येनं व्हावी, ही बाब मात्र मनाला चटकन पटत नव्हती. या संदर्भात अशोकजी ज्यांना आपला मानस पुत्र मानीत ते महाराष्ट्रातल्या लोककळा प्रवाहांचे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे माझी विभाग प्रमुख प्रकाश खांडगे यांच्याशी बोललो. यांचं कथन पटण्यासारखंही वाटलं. त्यांनी सांगितलं की, अशोकजी हे काहीसे अवलिया प्रवृत्तीचे होते. आयुष्याच्या संध्याकाळी औरंगाबादला स्थाईक झाल्यावर त्यांनी वयाच्या साठीत जीवनसाथी निवडला होता. पांढरपेशी दांभिक आचार-विचारांशी त्यांचं कधीच सख्य जुळलं नाही. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राखलं होतं. ऐहिक जीवनाचा मोह त्यांना कधीच नव्हता. संपूर्ण आयुष्य ते निर्वाण मार्गाचे पांथस्थ या आविर्भावातच जगले. ९ एप्रिल २००९ रोजी औरंगाबादच्या घटनेआधी, गिरगावात नॅशनल हॉस्टेल येथे राहात असतानाही त्यांनी एकदा आत्महत्येचा असफल प्रयत्न केला होता. जगाच्या दृष्टीने जरी ही आत्महत्या असली, तरी ही ऊर्मी एक प्रकारे इच्छामरण, निर्वाणाच्या ओढीतून उत्पन्न झाली असावी.
लौकिक जीवन जगत असताना एका तरी अलौकिक कृतीसाठी नटराज नटेश्वरांनी आपली निवड करणं, हीच कुठल्याही अभिजात कलाकारासाठी कला जीवनाची कैवल्य परिसीमा असावी. हे साधलं तर मग देहालाही मुक्ती लाभावी, अशीच मनाची अवस्था होणं स्वाभाविकच नाही का? अशोकजी परांजपे यांनाही त्या कैवल्य चांदण्याची चाकोराप्रमाणे आस लागली असावी, वृद्धत्वात पैल तीर दिसू लागला असताना ऐहिकाचा बडिवार व्यर्थ वाटून चराचरा पार होण्यास आता अधिक उशीर होऊ नये म्हणून त्या बा पांडुरंगाला मन थोर करण्याची विनंती करत निर्वाण तर साधलं नाही?
‘चराचरा पार न्या हो, जाहला उशीर
‘पांडुरंग… पांडुरंग’
मन करा थोर’
(लेखक डी. डी. न्यूज नवी दिल्ली येथे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.)
[email protected]