Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथन‘माइंडफूल’ प्रवास

‘माइंडफूल’ प्रवास

  • दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

आपल्याला ताप येतो. अंग दुखते. डोकं दुखते. ही सारी लक्षणे जाणवल्यावर आपण डॉक्टरकडे जातो. औषधे घेतो आणि ठीक होतो. पण मनाच्या आजाराचे काय… नैराश्य, अस्वस्थता, एकटेपणा, रितेपण हे सगळं मनाला वाटत असताना आपण मनाच्या डॉक्टरकडे जातो का? हे सगळे मानसिक दुखणे आहेत आणि कोणी जर मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलेच, तर त्याला वेडाच समजलं जातं. समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी एक मानसोपचारतज्ज्ञ अनेक वर्षांपासून झटत आहेत. विशेषत: कोरोना काळात त्यांनी ‘द माइंडफूल हार्ट टॉक शो’च्या माध्यमातून त्यांनी राबविलेला उपक्रम मरगळलेल्या मनांना उभारी देणारा ठरला. मनाला उभारी देणाऱ्या या मानसोपचारतज्ज्ञ आहेत डॉ. आरती सूर्यवंशी.
आपल्या मातापित्यांचे संस्कार, शिकवण यातून आपली जडणघडण होते. याच जडणघडणीतून डॉ. आरती सूर्यवंशी यांचा प्रवास सुरू आहे.

कला, संस्कार, शिक्षण या त्रिसूत्रीने वाटचाल करणाऱ्या कुटुंबात आरतीचा जन्म झाला. आरतीचे पणजोबा वेदाचार्य होते. भोसला वेदशाळा सुरू करत त्यांचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, तर वडिलांनी आंतरराज्य स्तरावर खेळात प्रावीण्य मिळवले होते. हाच वसा घेऊन आरतीची वाटचाल सुरू झाली. आपला कल लक्षात घेऊन आरती मानसशास्त्रीय शिक्षणाकडे वळली. हे करत असताना दिग्गज मान्यवरांच्या सहवासात नाट्यप्रशिक्षण घेत कलेची आवडही जपली.

आईच्या आजारपणाने तिला एक वर्षे घरी राहावे लागले. त्यानंतर घरच्यांच्या आग्रहामुळे तिने पुन्हा एकदा शिक्षण सुरू केले. आईच्या आग्रहाखातर बी.एड. केले. याच वेळी ती इंटर्नशिपदेखील करत होती. हे सर्व करत असताना जळगावला आरतीने पहिलं ‘दिशा समुपदेशन केंद्र’ सुरू केलं. हे करत असताना त्यांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयावर पीएच.डी केली. त्यांनतर ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात ‘वर्कशॉप’ घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर नाशिकमध्ये समुपदेशन केंद्र सुरू केले. सायकॉलॉजीकल डिपार्टमेंटच्या एचओडी म्हणून महाविद्यालयात कार्यरत असताना आरती यांनी अनेक उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना जोडून ठेवले.

सारे जग कोरोनाच्या संकटाने वेढलेले असताना, अनेक जण आपापल्या पद्धतीने मदत करत होते. काहीजण व्यक्तिगत स्तरावर, तर काहीजण समूह म्हणून या मदतकार्यात उतरले होते. पण ही मदत जेव्हा व्यवस्थेशी जोडली जाते, तेव्हा तिचा परिणाम अधिक दुणावतो. या जाणिवेतून आरती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन कोरोना काळात आलेलं एकाकीपण आणि नैराश्य दूर करण्यासाठी कार्य करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या मॉड्युलसच्या माध्यमातून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले. यासाठी आरती यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांना ‘मेंटल हेल्थ संजीवनी अॅवॉर्ड’ आणि अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

फोर्ट परिसरात ‘माइंडफूल हार्ट रिसर्च कन्सल्टन्सी’ची उभारणी करत अनेकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य आरती अव्याहतपणे करत आहेत. हे सर्व करत असताना, रोज नवीन लोकांच्या नव्या अडचणी ऐकताना मानसोपचार तज्ज्ञांनाही मानसिक थकवा येतोच. स्वतःच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यायची जबाबदारी त्यांची स्वतःचीच असते. अशावेळी या सर्वांपेक्षा काही वेगळे करावे, यातून त्यांनी फेसबुकवर ‘ब्लॉग्स’ लिहायला घेतले. त्यांनी माणसांबद्दल लिहायला सुरुवात केली. अनुभवकथन ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या एका ‘फॅमिली ग्रुप’मध्ये सर्वांनी आपलं स्वतःचं काही लिहून पोस्ट करावं, असा उपक्रम सुरू झाला. व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवरच्या या कथा आणि कवितांचे पुस्तक झाले अन् लेखिका हा प्रवास ही त्यांनी साध्य केला. कोरोना काळात त्यांनी आणलेला ‘द माइंडफूल हार्ट टॉक शो’ चांगलाच यशस्वी ठरला. यानंतर आता ‘द माइंडफूल हार्ट टॉक शो’चे दुसरे पर्व आले आहे.

आयुष्य किती जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विचार करून आपल्यासोबत इतरांचं आयुष्यही सुरेख करताना आपल्यालाही जगण्याची ऊर्जा मिळत असते. हीच ऊर्जा घेऊन अनेकांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आरती यांना हेच आयुष्याचे अविस्मरणीय क्षण वाटतात. आज संवाद कुठेतरी कमी होतोय. त्यातून एकाकीपणा वाढतोय. तो कमी करायचा, तर शालेय स्तरापासून ‘भावनिक बुद्धिमत्ता’ संबंधी मार्गदर्शन करणारे अनेक उपक्रम अधिक प्रमाणात सुरू करण्याची गरज असल्याचं आरती सांगतात. आपल्या आयुष्याची दिशा ठरवताना इतरांच्याही आयुष्याला दिशा देणारे खऱ्या अर्थाने ‘बॉस’ ठरतात. मात्र आपणच आपल्या आयुष्याचं ‘बॉस’ व्हायला हवं. स्वत:ला लीड करता यायला हवं, असं सांगणाऱ्या ‘लेडी बॉस’ आरती यांचा हा प्रवास ‘माइंडफूल’ आहे.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -