- नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
जुनी गाणी इतकी अर्थपूर्ण का असत, या गोष्टीलाही एक वेगळी बाजू आहे. पूर्वी एकंदरच जगणे भावनात्मक होते. व्यवहारापेक्षा भावनांना माणूस जास्त महत्त्व देत होता. त्याचे प्रतिबिंब साहित्यात, सिनेमात, नाटकात, सगळीकडेच पडत असे.
औद्योगिक क्रांतीनंतर समाजाच्या मानसिकतेत जे भयानक बदल झाले त्याचा एक परिणाम म्हणून कलानिर्मिती हाही एक व्यवसाय बनला! कोणतीही कला हे आत्माविष्काराचे साधन न राहता, मनोरंजन जगाचा ‘कच्चा माल’ बनला! उत्कटपणे काही सुचण्याची वाट न पाहता, उद्योगाप्रमाणे ‘मागणीआधीच’ माल निर्माण केला जाऊ लागला! सिनेमा, नाटक, रेडिओ या व्यापारी तत्त्वावर मनोरंजन करणाऱ्या उद्योगांसाठी कलानिर्मिती ‘ऑर्डरप्रमाणे माल मिळेल’ सारखी होऊ लागली.
समाजावर हा प्रभाव जोवर पूर्णत: पडलेला नव्हता तोवर सकस, उत्स्फूर्त कलानिर्मिती होत होती. मोठ्या कवींच्या कवितांची ‘गाणी’ होऊ शकत. स्व. रवींद्रनाथ टागोरांसारख्या लेखकांच्या अभिजात कादंबऱ्या सिनेमांच्या कथा होत. अनेकदा आधीच लिहिली गेलेली एखादी कविता रेडिओसाठी भावगीत तर सिनेमासाठी गाणे बनायची.
आजची आपली गोष्ट आहे ती मात्र जुन्या काळाच्या एका उत्स्फूर्त गीताची! कविवर्य भरत व्यास यांचे हे अप्रतिम गीत होते १९५७ साली आलेल्या ‘जनम जनमके फेरे’ या सिनेमातील गाण्याला संगीत होते एस. एन. त्रिपाठी यांचे, तर स्वर होते महंमद रफी आणि लतादीदींचे.
गाण्यामागची सत्यकथा मोठी हृद्य आहे. एकदा व्यास यांचा शामसुंदर नावाचा काहीसा अतिसंवेदनशील मुलगा काही कारणाने रागावून घर सोडून निघून गेला. कविमनाच्या हळव्या व्यास यांना धक्काच बसला! ते फार दु:खी झाले. त्यांना काही सुचेना. नाव महाभारतातील मुनींप्रमाणे ‘व्यास’ असले तरी पुत्रवियोगामुळे ते रामायणातील दशरथासारखे खंतावले, कोसळले. त्यांनी मुलाला घरी परत येण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती आकाशवाणीवर आणि वृत्तपत्रात दिल्या. जागोजागी स्वत: फिरून भिंतींवर पोस्टर्स डकवले. शेवटी अगदी ज्योतिष्यांचा सल्ला घेऊन सगळीकडे शोध केला तरीही मुलगा परतला नाही.
नेमका त्यावेळी एक मोठा निर्माता त्यांच्याकडे गीत लिहून घ्यायला आला. अतिशय दु:खी आणि अस्वस्थ व्यास यांनी त्याला चक्क घरातून काढून टाकले. त्यांच्या पत्नीला हे पटले नाही. तिने त्या निर्मात्यांची माफी मागितली आणि त्यांना ‘दुसऱ्या दिवशी परत या’ म्हणून विनंती केली. नंतर तिने व्यास यांना समजावले. पण ते ऐकेनात. त्यावर व्यास यांच्या पत्नी म्हणाल्या, ‘ज्याच्या विरहाने तुम्ही इतके अस्वस्थ झाला आहात, निदान त्या तुमच्या प्रिय मुलावर तरी एक गाणे लिहा!’ झाले! व्यास यांनी त्या विमनस्क मन:स्थितीत शामसुंदरला उद्देशून ओल्या डोळ्यांनी काही ओळी लिहिल्या. एका दु:खी बापाचे ते आर्त शब्द होते –
“जरा सामने तो आओ छलिये,
छुप छुप छलने में क्या राज़ है,
यूँ छुप ना सकेगा परमात्मा,
मेरी आत्मा की ये आवाज़ है,
जरा सामने तो आओ छलिये।“
निर्मात्याने सिनेमात जरी ते गाणे प्रियकर-प्रेयसीच्या संदर्भात वापरले तरी त्यात पिता-पुत्राच्या वियोगाच्या ओळी तशाच राहून गेल्या –
हम तुम्हें चाहे, तुम नहीं चाहो,
ऐसा कभी ना हो सकता,
पिता अपने बालकसे बिछुड़के,
सुखसे कभी ना सो सकता,
हमें डरनेकी जग में क्या बात है,
जब हाथ में तिहारे मेरी लाज है,
यूँ छुप ना सकेगा परमात्मा,
मेरी आत्माकी ये आवाज़ है.
व्यास यांच्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून आलेले शब्द प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत होते. गाणे कमालीचे लोकप्रिय झाले! बिना का गीतमालात ते सरताज ठरले. लतादीदींच्या आवाजातील पुढचे कडवे सिनेमातील कथेशी
सुसंगत होते.
प्रेमकी है ये आग सजन जो,
इधर उठे और उधर लगे,
प्यार का है ये तार पिया जो,
इधर सजे और उधर बजे,
तेरी प्रीत पे बड़ा हमें नाज़ है,
मेरे सरका तूही रे सरताज है,
यूँ छुप ना सकेगा परमात्मा…
मेरी आत्माकी ये आवाज़ है,
जरा सामने तो आओ छलिये।
यातला वेदनादायक भाग म्हणजे गाणे इतके लोकप्रिय होऊनही व्यासजींच्या भावना शामसुंदरपर्यंत पोहोचल्याच नाहीत. तो सापडलाही नाही आणि स्वत:हूनही घरी परत आला नाही!
तोवर व्यास यांचे सर्वसाधारण काम सुरू झाले होते. वरून जरी ते नॉर्मल वाटत होते तरी आतून पुरते खचले होते. मग त्यांच्या लेखणीतून दुसरे एक गीत अवतरले. ‘रानी रूपमती’(१९५७) साठी त्यांनी लिहिलेले हेही गाणे त्यांनी आपल्या हरवलेल्या मुलालाच उद्देशून लिहिले होते. यावेळी मात्र चमत्कार घडला. पित्याचे आक्रंदन पुत्रापर्यंत पोहोचले आणि शामसुंदर घरी परत आला! कुणालाही हळवे करणारे, आतून साद घालणारे, मुकेशच्या आवाजातील ते
शब्द होते –
लौटके आ, लौटके आ, लौटके आ…
आ लौटके आजा मेरे मीत.
तुझे मेरे गीत बुलाते हैं,
मेरा सुना पड़ा रे संगीत,
तुझे मेरे गीत बुलाते हैं.
हे गाणे नाहीच. ते एका प्रेमळ मनाने आपल्या प्रिय व्यक्तीला उद्देशून केलेले प्रांजळ निवेदन आहे. अगदी आतून मारलेली आर्त हाक आहे! त्यामुळे डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत, मन बैचेन आहे, बाहेर सुटलेल्या मंद शीतल झुळूकाही सुख देत नाहीत, उलट मनात आगआग निर्माण करतात, अशी मन:स्थिती आहे.
बरसे गगन, मेरे बरसे नयन,
देखो तरसे है मन अब तो आ जा.
शीतल पवन ये लगाए अगन,
ओ सजन, अब तो मुखड़ा दिखा जा.
जसे हे परतून येण्याचे आवाहन आहे तशीच ती एका दुखावलेल्या मनाने सौम्यपणे केलेली तक्रार आहे. जीवनाच्या क्षणभंगुरतेवरचे अगतिक आक्रंदन आहे. मानवी संबंधातील अशाश्वततेबद्दलची व्यक्त केलेली खंत आहे.
तूने भली रे निभाई प्रीत.
तुझे मेरे गीत बुलाते हैं.
एक पल है हंसना, एक पल है रोना,
कैसा है जीवन का खेला,
एक पल है मिलना, एक पल बिछड़ना,
दुनिया है दो दिनका मेला.
ये घड़ी ना जाए बीत…
आज, जेव्हा भारतीय समाज सर्वच बाबतीत दुसरी अमेरिका होतो आहे, वृद्धाश्रमांची संख्या वेगाने वाढते आहे, प्रेमविवाहसुद्धा ६/६ महिन्यांत संपून घटस्फोट होत आहेत, तेव्हा चिरंतन प्रेमाची गाथा गाणारी अशी गाणी कधीकधी निदान ऐकायला तरी हवीतच ना! म्हणूनच
हा ‘नॉस्टॅल्जिया’!